24 March, 2022

 

परभणी येथे उती व पाने तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : मराठवाडा विकास मंडळाच्या 2020-21 अंतर्गतच्या विशेष निधीतून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी यांच्या अधिनस्त जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, परभणी यांच्या प्रयोग शाळेत उती व पाने तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेत उती व पाने परिक्षणांतून पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सर्व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाणपत्र काढण्यात येते. जेणेकरुन ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारे पानावर फवारणी करुन किंवा विद्राव्य खताद्वारे सिंचनातून देणे शक्य होते. ज्यामुळे रासायनिक खताचा कार्यक्षम व समतोल वापर करुन उत्पादन खर्चात बचत करणे तथा उत्पादकता वृध्दी, उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे साध्य होते.

या प्रयोगशाळेत उती व पाने नमुन्यांची तपासणी करुन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या नत्र, स्फूरद, पालाश, लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, गंधक, कॅलशियम, मॅग्नेशियम या 11 अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण काढले जाते. यासाठी प्रती नमुना तपासणी शुल्क 1100 रुपये आकारले जातात.

उती व पाने परिक्षणासाठी नमुना घेताना चारही दिशेने तथा सूर्यप्रकाशात असलेल्या पानांचाच समावेश असावा. माती लागलेल्या , कीडग्रस्त, रोगग्रस्त तथा ओलाव्याचा अभाव असलेल्या पानाचा नमुना घेण्यात येऊ नये. नमुना काढल्यानंतर स्वच्छ कागदी किंवा कापडी पिशवीमध्ये 12 तासाच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणावा. निर्यातक्षम भाजीपाला, फळपिके, फूलपिके तसेच हरितगृह व पॉली हाऊसमध्ये उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष करुन उती व पाने नमुने तपासणी करणे गरजेचे आहे.

नमुना घेताना कांही अडचण आल्यास ग्रामपातळीवरील संबंधित कृषि सहायक किंवा उती व पाने तपासणी प्रयोगशाळा द्वारा जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी परभणी यांचे कार्यालय, जानकी बिल्डींग, योगक्षेम कॉलनी, विसावा फाटा, जिंतूर रोड, परभणी-431401 यांच्याशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या तपासणीसाठी

गठीत समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 च्या कलम 54 नुसार बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर तपासणी करण्यासाठी समिती गठीत करावयाची आहे. या समितीमध्ये एका अशासकीय व्यक्तीची तीन वर्षासाठी नियुक्ती करावयाची आहे.

अशासकीय सदस्य पदासाठी संबंधित व्यक्ती किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच बाल हक्क, काळजी व संरक्षण आणि बाल कल्याण क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यांचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. ही नेमणूक नेमणुकीच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत राहणार आहे.

वरील अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, बायोडाटा व अनुभवाच्या पुराव्यासह दि. 4 एप्रिल,2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे स्वत: सादर करावेत. या तारखेनंतर आलेले प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

23 March, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यानी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****


 

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे केंद्रा बु. येथील ऐनवेळी होणारा बालविवाह थांबविण्यात यश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : सेनगाव तालुक्यातील मौजे केंद्रा (बु.) येथे आज दि. 23 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच बालविवाह निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार गोरेगाव पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांचा स्टाफ यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीबखॉन पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत आदींनी विवाहस्थळी भेट देऊन बालिकेचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करुन होणारा बालविवाह थांबविला.

यावेळी ग्राम बाल सरंक्षण समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तथा सदस्य सचिव, गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष इत्यादी व्यक्तींच्या समक्ष कुटुंबियांकडून आम्ही बालिकेचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब घेण्यात आला.     

            जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह प्रतिबंध समिती स्थापन आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे व मुलांचे वय 21 वर्षे  ठरविले आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मुलांचे कमी वयात लग्न लावून देत आहेत असे चित्र पहावयास मिळत आहे. बालविवाह होत असल्यास गोपनीय माहिती कोणताही नागरिक 1098 या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.   

*****

 राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव

25 मार्च रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : औरंगाबाद येथील राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव हे दि. 25 मार्च, 2022 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.     

            शुक्रवार, दि. 25 मार्च, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता हिंगोली येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातील सर्व राज्य सेवा हमी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयाचे जिल्हा प्रमुख यांच्या बैठकीस उपस्थिती. तसेच आपले सरकार सेवा केंद्रास भेट. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.   

*****  

 


शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.    

            यावेळी नायब तहसीलदार  डी. एस. जोशी, जी. एस. जिडगे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

*****

21 March, 2022

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही

 

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यानी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****