23 July, 2022

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 542 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 6.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 541.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.02  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 23 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 6.60 (567.40) मि.मी., कळमनुरी 9.20 (647.50) मि.मी., वसमत 6.50 (553.90) मि.मी., औंढा नागनाथ 6.20 (492.50) मि.मी, सेनगांव 3.30 (425.60) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 541.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

22 July, 2022

 

जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट अधिनियमानुसार लावण्यासाठी

आरोग्य विभागानी दक्षता घ्यावी

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : वैद्यकीय आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट "जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016" प्रमाणे लावण्यात येईल, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी,  असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी- म. प्र. नि.मंडळ परभणी, पोलीस उपअधीक्षक हिंगोली इत्यादी उपस्थित होते.

या  बैठकीमध्ये  जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, डिस्पेंसरी, पॅथॉलॉजी लॅब, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र व प्राधिकारपत्र घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले.  सर्व वैद्यकीय आस्थापना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीपत्र व प्राधिकारपत्राशिवाय चालू राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

*******

 

हिंगोली जिल्ह्यातील 40 बेचिराख गावांना पिक विमा भरण्यासाठी पोर्टलवरील अडचणीचे निराकरण

 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 : प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 40 बेचिराख गावांचा सातबारा व आठ अ यांचे पिक विमा पोर्टलवर पडताळणी (Verification) होत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी अडचण येत होती. या समस्येचे राज्यस्तरावरुन निराकरण झालेले आहे.

या 40 बेचिराख गावातील सातबारा व आठ अ ची पिक विमा पोर्टलवर पडताळणी (Verification) होत आहे. त्यामुळे या गावातील तसेच इतर गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******  

 

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 : दिव्यांग व्यक्ती व संस्था यांनी सन 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी दि. 28 ऑगस्ट, 2022 पर्यंत अर्ज व नामांकन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.

            केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सुचनेनुसार दिव्यांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2021 व 2022 साठी अर्ज व नामांकन मागविण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी दि. 28 ऑगस्ट,, 2022 पूर्वी आलेल्या अर्ज व नामांकनाचा विचार करण्यात येणार आहे. यासाठी स्वंतंत्ररित्या अर्ज, नामांकने फक्त गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL.www.award.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन सादर करावे. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्याची माहिती उल्लेखित करुन प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज, नामांकन स्वीकारले जाणार नाहीत.

            या पुरस्कारासाठी निकष व इतर सविस्तर तपशील नमूद विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्ज, नामांकन विचारात घेण्यात येईल.

            जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व संस्था यांनी विहित कालावधीमध्ये आपले अर्ज संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन पुणे येथील राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या सूचनेवरुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.   

*****

 भारतीय डाक विभागातर्फे सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी फिलाटेली स्कॉलरशीप

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 22 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी दीनदयाल स्पर्श योजना ही फिलाटेली स्कॉलरशीप सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीटे जमविणे आणि तिकिटाचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्याची डाक विभागातर्फे फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प या आधारावर निवड करुन मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती  देण्यात येणार आहे. निवडक विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी सहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती  देण्यात येणार आहे.

            जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, डाक अधीक्षक, परभणी यांनी केले आहे.

******  

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 535 मिमी पावसाची नोंद

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 0.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 535.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 62.27  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

        जिल्ह्यात आज दिनांक 22 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

        हिंगोली 1.10 (560.80) मि.मी., कळमनुरी 1.10 (638.30) मि.मी., वसमत निरंक (547.40) मि.मी., औंढा नागनाथ 0.10 (486.30) मि.मी, सेनगांव 1.10 (422.30) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 535.30 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******  

21 July, 2022

 

हर घर तिरंगा उपक्रमात स्वंयस्फुर्तीने सहभाग घ्यावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  • 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान


            हिंगोली, (जिमाका) दि. 21 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद घेता यावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.विशाल राठोड, ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त भोसले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी, संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वंयस्फुर्तीने करणे अपेक्षित आहे. तिरंगाच्या निर्धारित केलेल्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करावा. झेंडा खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत https://harghartirangahingoli.in  संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर पुरवठादारांनी व नागरिकांनी आपली नोंदणी करावी. झेंडा विक्रीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वितरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तिरंगा हा 20:30 इंच साईजमध्ये 25 ते 30  रुपयांमध्ये पुरवठादाराकडून प्राप्त करुन घ्यावा. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितचे पालन करावे. तिरंगा झेंडा फडकावितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. तिरंगा झेंडा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. तसेच या कालावधीत आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबवावेत, आवाहनही  यावेळी केले.

******