20 February, 2023

 

हिंगोली येथील रोजगार मेळाव्यात 483 बेरोजगार उमेदवारांची केली प्राथमिक निवड

 

        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

            या मेळाव्यात जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 715 उमेदवार उपस्थित होते. यापैकी 483 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

            या मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे (महिंद्रा ॲन्ड महिंद्रा पुणे, एन्डयुरन्स औरंगाबाद), धूत द्रान्समिशन औरंगाबाद, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, आर्मस इ.प्रा.लि. वाळूज औरंगाबाद, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस प्रा.लि.पुणे, बन्सल कोचिंग क्लासेस, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, रक्षा सिक्युरिटी फोर्स हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स हिंगोली, क्लॉउड इंम्पॅक्ट, हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते .

*****  

 

महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासन आपल्या दारी

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

  • पात्र उमेदवारांना जागेरच नियुक्ती पत्राचे वितरण

 




        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासन आपल्या दारी रोजगार घेऊन आले असून याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले यावेळी केले .

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. पापळकर बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजानन घुगे, रामदास पाटील, वसंतराव पालवे, शिवाजीराव मुटकुळे, फुलाजी शिंदे, हमीदभाई प्यारेवाले, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांची उपस्थिती होती. 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोंदणीसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडवर एकदा नोंदणी केल्यावर आपणास रोजगार उपलब्ध होईपर्यंत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची तसेच रिक्त पदाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपणास रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योजक कंपन्या या रोजगार मेळाव्यात येऊन आपली निवड करणार आहेत. या रोजगार मेळाव्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून देण्याचा उद्देश आहे. तसेच ज्यांना स्वयंरोजगार करावयाचा आहे त्यांनाही स्वयंरोजगार उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपणाकडे असलेल्या कौशल्याचा वापर करुन रोजगार व स्वयंरोजगार मिळवून स्वावलंबी व्हावे आणि आपला व जिल्ह्याचा कायापालट करावा, असे आवाहनही श्री. पापळकर यांनी यावेळी केले.

            याप्रसंगी बोलताना शिवाजीराव मुटकुळे यांनी पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यामुळे बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. यापुढेही असे मेळावे आयोजित करावेत, असे सांगून उपस्थित बेरोजगार उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.  

            पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्याचे प्रथमच जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. तसेच मुलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी क्यूआर कोड विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला रोजगार उपलब्ध होईपर्यंत या ॲपच्या माध्यमातून रोजगार (जॉब)चे  संदेश मिळणार आहेत. तसेच आपल्याला रोजगार मिळाला का नाही याचे ट्रॅकींग करण्यात येणार आहे. या संधीच्या माध्यमातून आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे. तसेच हिंगोलीच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रामदास पाटील यांनी सांगितले.

            प्रत्येक बेरोजगार उमेदवाराला रोजगार मिळाला पाहिजे ही प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांची सकल्पना आहे. त्यामुळे राज्य शासनाने कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शासन आपल्या दारात येऊन नोकऱ्या देण्यासाठी येथे आले आहे. या मेळाव्यात आपल्या कौशल्यानुसार रोजगार स्वीकारुन स्वावलंबी बनावे, असे सांगून उपस्थित सर्व बेरोजगार युवकांना माजी आमदार गजानन घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.

            सध्या शासनाने कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. देशातले उत्पादन वाढवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आपल्या कौशल्यानुसार आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा, असे सांगून माजी खासदार शिवाजीराव माने यांनी उपस्थित युवकांना शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे यांनी महारोजगार मेळावा आयोजनाची भूमिका विशद करताना लोकप्रतिनिधी  आणि शासन यांच्या पुढाकारामुळे या रोजगार मेळाव्याला भव्य प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले.

            या महारोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना जागेवरच प्राथमिक नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जागेवर नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे व रोजगार उपलब्ध करुन दिल्यामुळे शासनाचे आभार मानले .

या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे (महिंद्रा ॲन्ड महिंद्रा पुणे, एन्डयुरन्स औरंगाबाद), धूत द्रान्समिशन औरंगाबाद, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशन एमआयडीसी चिंचवड पुणे, अभिनव इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट मुंबई, ठाणे, नाशिक, आर्मस इ.प्रा.लि. वाळूज औरंगाबाद, इम्पेरेटीव्ह बिझनेस वेंन्चर्स प्रा.लि.ठाणे, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस प्रा.लि.पुणे, एक्साईड इंडस्ट्रीज लि.औरंगाबाद, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, रक्षा सिक्युरिटी फोर्स हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स हिंगोली, बन्सल कोचिंग क्लासेस अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाले होते .

या रोजगार मेळाव्याचे सूत्रसंचालन ए. बी. भुसारे यांनी केले तर आभार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व स्वागत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार उमेदवार उपस्थित होते.

*****

 

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 


        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  येथील जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत कारभारी, आशाताई बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे, चंद्रकांत गोधने हे उपस्थित होते.  

*****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 


            हिंगोली, (जिमाका) दि. 20 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांच्यासह  विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

19 February, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

 

  • ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या गीताचे सामुहिकरित्या गायन

 

 



        हिंगोली (जिमाका), दि. 19 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण व  अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली .

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मधुकर खंडागळे, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह  विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच आराध्या राठोड या चिमुकलीनेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’  या गितास नुकतेच राज्य शासनाने राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. राज्यगीत म्हणून घोषित केलेल्या ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या गीताचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिकरित्या मोठ्या उत्साहात गायन करण्यात आले.

*****

17 February, 2023

 महिला लोकशाही दिनाचे  20 फेब्रुवारी रोजी आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

माहे फेब्रुवारी, 2023 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार,दिनांक 20 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे.

            समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

 

बाल विवाहास पाठींबा दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील लग्नविधी पार पाडणाऱ्या भटजी काजी, भन्ते, ब्राह्मण, मंगल कार्यालय, प्रिंटीग प्रेस, फोटो ग्राफर, व्हिडीओ ग्राफर, आचारी इत्यादीनी वधुवराच्या वयाची पडताळणी न करता बालविवाहास पाठिंबा दिल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दि. 22 मे, 2023 रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहांमध्ये जिल्ह्यात कोठेही बाल विवाह होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील लग्नविधी पार पाडणाऱ्या भटजी, काजी, भन्ते, ब्राह्मण, मंगल कार्यालय, प्रिंटीग प्रेस, फोटो ग्राफर, व्हिडीओ ग्राफर, आचारी इत्यादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते.  

या बैठकीत बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 नुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे असे निर्देशीत करण्यात आलेले आहे. जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी शालेय निर्गम उताऱ्यावरुन वधुवरांच्या वयाची पडताळणी करुनच विवाहाची कामे करावीत. वयाची पडताळणी न करता विवाहात सामील झाल्यास, तो विवाह बाल विवाह असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कडक कारवाई करावी. तसेच जिल्ह्यात इतरत्र कोठेही बाल विवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास बाल विवाहात सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशी कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसूचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्यांची नोंद करुन ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे माहिती देण्यात यावी, असे आदेश श्री. पापळकर यांनी दिले.

या बैठकीस शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी नितिन नेटके, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. व्ही. वाय. करपे, विकास प्रिंटर्स, स्वयंवर मंगल कार्यालयाचे स्वप्नील सोनपावाडे, सुरभी ऑफसेटचे आशिष राठोड, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी सी. एस. कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे उपस्थित होते.

*******