23 June, 2023

 

औंढा बस स्थानकात प्रवाशांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती 
 नशा मुक्त भारत पंधरवडा 


         हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील औंढा नागनाथ येथील बस स्थानकात प्रवासी- नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती जनजागरण उपक्रम शुक्रवार, दि. 23 जून रोजी पार पडले.

यावेळी बस स्थानकात स्थानक नियंत्रक शिवाजी बांगर, जेष्ठ कर्मचारी दिलीप जोगदंड, नशा मुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 26 जून, 2023 या कालावधीत नशा मुक्त भारत पंधरवडा राबविण्यात येत आहे.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कृत राज्यस्तरीय व्यसनमुक्ती प्रदर्शनीचे आयोजन स्थानक परिसरात करण्यात आले होते. यावेळी प्रवासी नागरिकांना जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प दिला.

*****

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी

15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 23 :  दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त  गुण प्राप्त घेऊन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

            हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज भरुन कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.हिंगाली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली-431513 (मो. क्र. 9309151060, 9822628469) येथे दि. 15 जुलै, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच उशिरा आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. हिंगोली यांनी केले आहे.   

****  

 

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत दिनांक 26 जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिन असल्याने प्रतिवर्षी  सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

            प्रतिवर्षो प्रमाणे दिनांक 26 जून, 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.     त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय दिना निमित्त हिंगोली येथे समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले  आहे. या समता दिंडीचे उद्घाटन हिंगोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे सकाळी 8.30 वाजता लोकप्रतिनिधी (मा.आमदार व मा.खासदार), जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर मान्यवरांच्या हस्ते समता दिंडीस हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.  

ही समता दिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महात्मा गांधी पुतळा-संविधान कॉर्नर-इंदिरा गांधी पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली येथे समता दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे.

            तद्नंतर राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अंतर्गत सुरु असलेल्या मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती निमित्त तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार, पालक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक कार्येकर्ते, विविध लोकप्रतिनिधी व विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुखांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

 

*****

22 June, 2023

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 22 :  जिल्ह्यात दि. 29 जून, 2023 रोजी देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा व मुस्लीम समाजाची बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच विविध संघटनेतर्फे हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाई यामुळे मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 22 जून, 2023 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 06 जुलै, 2023 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.      

****

 

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 :  राज्य शासनाच्या महिला  व बालविकास विभागाच्या  दि. 2 फेब्रुवारी, 2023 च्या शासन निर्णयानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प हिंगोली या कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त असलेल्या नगरपालिका हिंगोली-12, नगरपालिका वसमत -02 व नगरपालिका कळमनुरी-05 याप्रमाणे मदतनीस पदाची मानधनी पदे भरण्याबाबत जाहिरात दिली आहे.

वरील नमूद पदासाठी दि. 26 जून, 2023 ते दि. 10 जुलै, 2023 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अंबिकानगर, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.

*****



 

कृषि विज्ञान केंद्रात राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 :  फलोत्पादन विकासाला चालना देण्याच्या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नागपूर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम दि. 21 जून 2023 रोजी तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे नागपूर विभागाचे संचालक डॉ. एस के शर्मा, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत, एचडीएफसी बँकेचे बेले उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना बागवानी मंडळाचे संचालक डॉ. एस. के. शर्मा यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे अनेक उपक्रम असून त्या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि फळबागाच्या विकासासाठी अनेक योजना देण्यात येत असतात, या योजनांमध्ये भाग घेऊन शेतकरी आपल्या फळबागेचा विकास चांगल्या प्रकारे करु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या विविध योजनांमध्ये भाग घेऊन आपल्या शेतीचा विकास करावा, असे सांगितले.

नवीन फळबागा लावण्यासाठी मंडळाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के अनुदान कसे मिळू शकते, ज्याची कमाल रक्कम 30 लाख रुपये प्रती प्रकल्प करु शकतो. त्याचप्रमाणे पॉली हाऊस आणि शेड नेटच्या आत फळे, फुले व फुले लागवडीसाठी 50 टक्के अनुदान मिळू शकते, ज्याची कमाल रक्कम प्रत्येक प्रकल्पासाठी 56 लाखांपर्यंत असू शकते आणि शीतगृह सारखे पीएचएम घटक, पूर्व कुलिंग युनिट. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून 50.75 लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत, पॅक हाऊस इत्यादी उभारण्यासाठी 35 टक्के अनुदान देखील मिळू शकते. याशिवाय उभारणीसाठी मंडळाकडून 35 टक्के अनुदान देखील घेता येईल. मोठे शीतगृह ज्यांची क्षमता 5 हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली, पहिल्या दोन टप्प्यांसाठी अर्ज करण्याऐवजी एका टप्प्यात GOC (मंजुरी) कशी घेता येईल, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबद्दल सविस्तर माहिती डॉ. एस. के. शर्मा यांनी  दिली.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या योजने सारखे राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. यामध्ये पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांच्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती पत्रके सुद्धा त्यांनी दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा त्यांनी  दिली.

आपल्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या सोबत आपले विविध अनुभव स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाला प्रस्ताव सादर करत असताना राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या सर्व अटी आणि शर्ती व्यवस्थितपणे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विविध बँका सोबत आपला चांगला समन्वय ठेवून आपला क्रेडिट स्कोर आणि सिबिल उत्कृष्ट कसा राहील त्या संदर्भातही सातत्याने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे म्हणजे त्यांना राष्ट्रीय बागवानी मंडळासारख्या अनेक योजनांमध्ये भाग घेता येईल आणि बँकांचे सहकार्य सुद्धा प्राप्त करता येईल, असे सांगितले.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांनी ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पीक कर्ज वेळेत फेडून त्याचप्रमाणे इतर बँकांचे किंवा बँक समक्ष संस्थांचे कर्ज परतफेड वेळेवर करुन आपला सिबिल स्कोर उत्तम ठेवावा असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांचे सहकार्य नियमितपणे आणि चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नरत असावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले.

शेतकऱ्यांच्या वतीने नारायण गोरे यांनी त्यांचे फळबाग लागवडीचे विविध अनुभव स्पष्ट केले. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या माध्यमातून फार पूर्वी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव सादर करुन त्याद्वारे आपल्या फळबागेचा विकास केल्याची यशोगाथा सांगितली. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उद्यानविद्या तज्ञ अनिल ओळंबे, राष्ट्रीय बागवानी आयोगाच्या शाहनवाज अहमद, मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ साईनाथ खरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय बागवानी मंडळाचे संचालक एस. के. शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ राजेश भालेराव, अजय कुमार सुगावे, सौ.रोहिणी शिंदे, डॉ.कैलाश गीते, शिवलिंग लिंगे, सौ.मनीषा मुंगल, विजय ठाकरे, ओम प्रकाश गुडेवार, संतोष हनवते, प्रेमदास जाधव यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाला आबासाहेब कदम, मुजाहेद सिदिकी, धनंजय सूर्यवंशी, गोरखनाथ हाडोळे, निंबाळकर, हाके, जोगदंड, राहुल कदम तसेच अनेक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते .

*****

वर्षपूर्ती निमित्त विशेष लेख 

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 

बळीराजा हा राज्यातील महत्वाचा घटक आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार बळकट करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, या बाबीसाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत आहे. राज्याच्या 2023-24 या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत योग्य पाठपुरावा करुनही विमा कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने या योजनेमध्ये सुधारणा करुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास दि. 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यासाठी शासनाने यावर्षी 120 कोटी रुपयांची तरतूद केली  आहे.

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात  तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघाग्रस्त शेतकऱ्यांस, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.   

या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा  समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण 2 जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देय आहे.

देय लाभाचा तपशील :

अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देय आहे.

लाभासाठी पात्रता :

या योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या 24 तासांसाठी ही योजना लागू आहे. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हांही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.

या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.

अपघाताचे स्वरुप :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी, मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगळ व अन्य कोणतेही अपघात अशा या अपघाताचा समावेश आहे.

तसेच नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्णक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा या योजनेत समावेश असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे :

सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6-क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसे ज्या कागदपत्राआधारे ओळख, वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आत सादर करावेत. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.

हिंगोली जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 56 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. औंढा नागनाथ तालुक्यात 13 प्रस्ताव, वसमत-8, हिंगोली-19, कळमनुरी-09 व सेनगाव तालुक्यात -7 असे एकूण 56 प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन पात्र असलेल्या विमा प्रस्तावातील संबंधित शेतकरी, शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेऊन संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, वारसदारांच्या बँक खात्यात इसीएसद्वारे निधी अदा करण्यात येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

- चंद्रकांत कारभारी

                          माहिती सहायक,

   जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

****