26 September, 2023

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्यामुळे

बेरोजगार अशोक जाधव झाले यशस्वी व्यवसायिक

 


            हिंगोली येथील एनटीसी भागात राहणारे अशोक जाधव हे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होते. त्यानंतर त्यांनी पदवी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण घेत असताना त्यांनी नोकरीच्या संधी शोधत वेगवेगळ्या विभागात अर्ज सादर करीत होते. त्यामध्ये श्री. जाधव यांना नियमितपणे अपयश येत होते. पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतानाच श्री. जाधव यांना अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळत असल्याचे समजले. त्यानंतर श्री. जाधव यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे धाव घेतली व माहिती मिळवली. त्यांना महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे महामंडळाकडे अर्ज केले. त्यानंतर त्यांना पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे श्री. जाधव हे इतर कागदपत्रे घेऊन युको बँकेकडे गेले. बँकेने सांगितल्याप्रमाणे हिंगोली येथील कळमनुरी रोडवडील खटकाळी बायपास येथे गजानन ट्रेडर्स या नावाने छोटा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर युको बँकेकडील कर्मचारी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या व्यवसायाची पाहणी केली. त्यानंतर बँकेने श्री. जाधव यांना 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले. त्यामुळे श्री. जाधव यांच्या व्यवसायाला चांगली सुरुवात झाली. बँकेने दिलेल्या कर्जाचा व्याज परतावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने 2 लाख 10 हजार रुपये व्याज परतावा रक्कम मंजूर केले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांने केलेल्या अर्थसहाय्यामुळे मे. गजानन ट्रेडर्स या नावाने श्री. जाधव यांचा व्यवसाय नावारुपाला आला. या व्यवसायातून त्यांनी ज्या ठिकाणी जागा भाड्याने घेतली होती, ती जागा विकत घेतली व त्या जागेचे ते मालक झाले. अशाप्रकारे श्री. जाधव यांचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरु झाला असून या यशाचे सर्व श्रेय  श्री. अशोक जाधव यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला दिले आहे. महामंडळाने त्यांना एका विद्यार्थ्यांपासून व्यवसायिक बनविल्यामुळे त्यांनी सदैव महामंडळाचा ऋणी असल्याचे सांगितले.

 

                                                                                                                                                - चंद्रकात स. कारभारी

                                                                                                                                                   माहिती सहायक/उपसंपादक,

                जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*******   

25 September, 2023

 

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात दिपावली-2023 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी दि. 03 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.       

तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके  विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने  एकमेकांपासून  कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत  बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत. केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत  बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना  परवानगी देण्यात येणार नाही. व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

****

 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या

विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

           हिंगोली (जिमाका), दि. 25 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, बीज भांडवल कर्ज योजना व एक लाख रुपये थेट कर्ज योजना या विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1)  वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)  :  या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन आहे. यासाठी आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मूळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.

2) गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-2) :  यासाठी कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा, गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्याचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमिलेअरसाठी 8 लाखाच्या मर्यादित असावी. ही योजना ऑनलाईन असून यासाठी सदस्याचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, आधारकार्ड, शाळेचा दाखला, संबधित व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

3) एक लाख रुपये थेट कर्ज योजना : या योजनेमध्ये महामंडळाकडून एक लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत व बोझा नोंद करुन देणे महत्वाचे आहे. यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत मर्यादा), रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे फॉर्म महामंडळातून जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करुन अर्जदारास मिळेल.

4) बीज भांडवल योजना :  बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जात आहे. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड. रहिवाशी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयास दाखल करणे महत्वाचे आहे. यापूर्वी लाभार्थीनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

मागील वर्षी दाखल केलेल्या प्रकरणांचे नुतणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. उदि्दष्टापेक्षा जास्त अर्ज  प्राप्त झाल्यास पात्र लाभार्थीची निवड संगणकीय रॅन्डमायझेशन निवड पध्दतीने (लॉटरी) करुन लाभार्थी निश्चित केले जातील. वरील योजनेचे सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-1) – 50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-2) -02 व बीज भांडवल कर्ज योजनेचे- 50, एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचे 100 असे उदिष्ट प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थीनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या WWW.VJNT.IN  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हिगोली. फोन 9834549056 व 8668246920 येथे संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी.एम. झोंबाडे यांनी केले आहे.

******

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी 27 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबाना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास प्रती वर्ष 6 हजार रुपये रकमेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने या योजनेचा लाभ पुढे सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदीनुसार माहिती अद्यावत करणे बंधनकारक केलेले आहे. ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी कृषि विभागातर्फे मागील एक वर्षापासून आवाहन करण्यात येत आहे. परंतु हिंगोली तालुक्यातील 3 हजार 921 लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही व 1 हजार 146 लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार सलग्न केले नाही. अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी दि. 27 सप्टेंबर, 2023  पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. यानंतर ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न न केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यापासून अपात्र होणार आहेत.

हिंगोली तालुक्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी दि. 27 सप्टेंबर, 2023 पर्यंत ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 666 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 38.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 665.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 83.72 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 52.30 (704.80) मि.मी., कळमनुरी 41.10 (733.80) मि.मी., वसमत 31.20 (673.80) मि.मी., औंढा नागनाथ 56.40 (695.50) मि.मी, सेनगांव 14.40 (525.50) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 665.80 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयात स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी


 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयात कष्टकऱ्यांचे कैवारी स्व.अण्णासाहेब पाटील यांची 90 वी जयंती साजरी करण्यात आली.

            यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रा. म. कोल्हे, जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे, अल्ताफ शेख यांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी, महामंडळाचे लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे यांनी स्व.अण्णासाहेब पाटील यांचे जीवन कार्य तसेच मराठा समाजासाठी त्यांचे असलेले मोलाचे योगदान याविषयी माहिती दिली. 

*******

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज योजनेत

 जिल्ह्यातील 515 लाभार्थ्यांना 31 कोटी 80 लाख 83 हजाराचे कर्ज मंजूर

 

  • आतापर्यंत 445 लाभार्थ्यांना 4 कोटी 3 लाख 80 हजार 415 रुपयाचा दिला व्याज परतावा
  • जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांचे व्याज शासन भरत आहे. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे.

या महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेत आतापर्यंत एकूण 2 हजार 439 नोंदणीकृत अर्जदारापैकी पात्रता प्रमाणपत्र प्राप्त 1 हजार 359 अर्जदार आहेत. यापैकी 515 लाभार्थ्यांना 31 कोटी 80 लाख 83 हजार 843 रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या 515 लाभार्थ्यापैकी 448 लाभार्थ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा मंजूर झालेला असून आतापर्यंत 445 लाभार्थ्यांना 4 कोटी 03 लाख 80 हजार 415 रुपये व्याज परतावा केला आहे.

            तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 30 गटांनी अर्ज केला आहे. यापैकी 11 गटांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे. तर बँकेने 13 लाभार्थी गटांचे कर्ज मंजूर केले आहे. या सर्व 13 गटांना आजपर्यंत 23 लाख 49 हजार 509 रुपयाचा व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

            अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही तोपर्यंत कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजना :

            1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेची मर्यादा 10 लाखाहून 15 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आलेली असून महामंडळामार्फत साडेचार लाख रुपयाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. याचा व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. 12 टक्के असेल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. मात्र दि. 20 मे, 2022 पूर्वीच्या लाभ धारकांना नियमानुसार 10 लाख रुपयाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्यासाठी 3 लाख रुपयाची मर्यादा असेल.

            2) गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकज्र येऊन लाभ घेता येणार आहे. यामध्ये दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रुपयांच्या मर्यादेत, तीन व्यक्तींसाठी 35 लाख रुपयांच्या मर्यादेत, चार व्यक्तीसाठी 45 लाख रुपयांच्या मर्यादेत तसेच पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 रुपयापर्यंतच्या व्यवसाय/उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास व हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये एफपीओ गटानी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ भरेल.  

            लाभासाठी अटी व शर्ती : उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशांकरिता आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांसाठी कमाल 60 वर्षे आहे. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. यासाठी तहसीलदाराचे प्रमाणपत्र किंवा पती व पत्नीचे वैयक्तीक आयअीआर, लाभार्थी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये कमाल वयाचे बंधन नसेल. गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत भागिदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एलएलपी, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट/संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वरील योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक बालाजी शिंदे यांनी केले आहे.

*******