24 November, 2023

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या सर्व गावातील जनतेनी

नियमानुसार क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळ पेरा करावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) बुडीत क्षेत्रात गेलेल्या सर्व गावांतील जनतेनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका सहावी आवृत्ती मधील परिशिष्ट 17 (परिच्छेद 248) अन्वये तलावाच्या  (Tank Bed) जमिनींचा विनियोग करण्यासाठी नियम देण्यात आलेले आहेत व यामधील दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार मा. जिल्हाधिकारी यांच्याद्वारे जमिनीचा विनियोग करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले  आहेत. परंतु बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांमार्फत रितसर मागणी न करता बुडीत क्षेत्रात अनाधिकृतपणे पेरा केला जातो. यामुळे स्थानिक लोकांमध्ये वादविवाद, उपोषणे, जमिनीचे परस्पर हस्तांतरण इत्यादी प्रकार घडत आहेत.

नियमपुस्तिकेनुसार जलाशयाखालील दरवर्षी उघडी पडणारी जमीन जास्तीत जास्त 12 वर्ष कमीत कमी 5 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात यावीत अशा प्रकरची जास्तीत जास्त 1.2 हेक्टर जमीन एका कुटूंबासाठी देता येईल असे नियम पुस्तिकेत नमुद आहे.

या जमिनी विनियोग करताना अग्रक्रम देण्यात आलेला असून यानुसार प्रथम प्राधान्य ज्या व्यक्तिच्या जमिनी तलाव बांधण्यासाठी संपादीत करण्यात आलेल्या आहेत,अशा व्यक्तींना प्रथम प्राधान्य आहे. जलाशयाखालील गाळे पेरासाठी जमिनीचा विनियोग जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांद्वारे करणेबाबत नमुद आहे. अशा जमिनी पोटभाड्याने देणे किंवा हस्तांतरीत करण्यात किंवा पडीत ठेवण्यात मान्यता देण्यात येणार नाही असे नियमात उल्लेख आहे. असे शासनास आढळले तर शासनाला अशा जमिनी परत घेता येतील आणि योग्य त्या पद्धतीने वापरात आणता येतील.

 बुडीत क्षेत्रातील गाळपेऱ्यासाठीच्या जमिनी वाटप करण्यासाठी यावर्षी उपलब्ध होणाऱ्या जमिनीच्या क्षेत्राचा आढावा घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करुन, रास्त पद्धतीचा अवलंब करुन जाहीर प्रगटनाद्वारे पुढील अनुषंगीक कार्यवाही अनुसरण्यात येईल.

सद्यस्थितीत ज्या अर्थी सदरील जमीन जलसंपदा विभागाच्या मालकीची असून नियम पुस्तीकेतील परिशिष्ट 17 मधील तरतुदीनुसार संपादित क्षेत्रावर कोणत्याही अर्जदारांचा तसेच नियमबाह्य ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांचा गाळपेऱ्यासाठी अधिकृत अधिकार ठरणार नाही. त्यामुळे गाळपेऱ्यासाठी नियमानुसार संपूर्ण कार्यवाही होऊन क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळपेरा करण्यात यावा, असे सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे. नियमबाह्य व अनाधिकृतपणे गाळपेरा केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, याची सर्व जनतेनी नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी कळविले आहे.

*****

 

छत्रपती शिवाजी महाराज-सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजनांतर्गत

खाजगी वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांनी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थाकडून महाविद्यालयातील मुले-मुलींसाठीचे वसतिगृह चालविण्यास अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करणारी इच्छूक संस्था ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच अशा संस्थेचे किमान तीन वर्ष लेखा परिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल.

संस्था निवडीसाठीचे पात्रता, निकष, अटी व शर्ती या सारथी संस्थेच्या https://sarthimaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. यासाठी परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी विभागीय कार्यालय, शासकीय अध्यापक महाविद्यालय सभागृह, पदमपुरा स्टेशन रोड, देवगिरी कॉलेजजवळ, छत्रपती संभाजीनगर पिनकोड-431005 येथे कार्यालयीन वेळेत दि. 15 डिसेंबर, 2023 पर्यंत दाखल करावेत. उशिराने प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी श्रीमती पंकजा देशमुख, संशोधन अधिकारी दूरध्वनी क्रमांक-0240-2990997 व divaurangabadsarthi@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज-सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजना यांनी केले आहे.

**********

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत

ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत उमेदवारांना ट्रॅक्टर खरेदीवर ओईएम संस्थेकडून विशेष सवलत देण्यात येत आहे. याबाबतचे प्रस्ताव ओईएम संस्थेने महामंडळास दिले आहेत. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर ही  विशेष सवलत देण्यात येणार आहे, असे महामंळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

या योजनेतर्गत लाभार्थी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करु शकतो. मात्र लाभार्थ्यांला ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक असणारे कर्ज कोणत्याही बँके मार्फतच घ्यावे लागेल. नॉन बॅकींग फायनान्स कॉपोरेशन एनबीएफसी मार्फत मंजूर कर्ज व्याज परताव्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही. तसेच उमेदवाराने ट्रॅक्टर प्रकरणावरील कर्ज हे पात्रता प्रमाणपत्र एलओआय निर्माण केल्याच्या दिनांकानंतरच घेणे अनिवार्य राहील.

कोणत्याही ओइएम संस्थांनी किंवा त्यांच्या डिलर्सने ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी नकार दिल्यास अथवा अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास, त्वरीत आपल्या जिल्ह्याच्या महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. समन्वयकांच्या संपर्काची यादी www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर उपलब्ध आहे, असे अण्णासाहेब पाटील विकास मागास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आहे.

******

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय शुभारंभ बळसोंड येथे

केंद्रीय सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते फित कापून केला

 

  • केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या व अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत योजना पोहचविणे हा 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा मुळ उद्देश- कौस्तुभ गिरी

 

  • जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन-जिल्हाधिकारी श्री. पापळकर

 







हिंगोली (जिमाका), दि. 24 :  केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम आजपासून दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथे केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.  

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे, महिला व  बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, बळसोंडचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केंद्रीय सचिव कौस्तुभ गिरी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा मुळ उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यावेळी बोलताना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे. माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जनजागृती करणे. नागरिकांशी संवाद-वैयक्तिक कथा/अनुभव सांगुन सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे. आणि यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे हे या विकसीत भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने या यात्रेच्या यशस्वीतेसाठी योग्य नियोजन केले आहे. जिल्ह्यात 5 एलईडी चित्ररथाद्वारे दररोज 2 गावात विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसिद्धी आणि शासकीय योजना व त्यांच्या उपलब्धतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्रुटी दूर करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री पोषण अभियान, आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे आणि पीआर कार्ड काढण्याचे मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी  केले आहे.

            यावेळी उमेदच्या लाभार्थी यांनी ज्योती गांजरे यांनी बचतगटाच्या माध्यमातून मला फायदा झाला आहे. त्यांना मिळालेल्या 15 हजाराच्या फिरत्या निधीतून शिलाई मिशन घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्याकडे 40 गटाचा समुह केला असून या समुहाच्या माध्यमातून माझ्यासह गटातील कुटुंबाचा आर्थिक विकास झाला आहे. तसेच मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळाल्यामुळे ते आज स्वाभिमानाने जगत असल्याचे सांगितले.

            या कार्यक्रमात महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सर्व शिक्षा अभियान, कृषि विभाग, महिला बचत गट यासह विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी सचिव कौस्तुभ गिरी व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेतली व आपणाकडे असलेल्या सर्व योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्या टीम कडून गावागावात मोठ्या ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून या ड्रोनला वीस लिटर एवढ्या क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून या द्वारे अत्यंत कमी वेळात आणि कमी रसायनात फवारणी होते. याची सर्व माहिती सचिव कौस्तुभ गिरी व जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी घेतली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.

            या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**********

 

विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करुन

शासनाच्या विविध योजनांचा लाभ वंचित असलेल्या सर्व घटकापर्यंत पोहोचवावेत

                  - कौस्तुभ गिरी

 

       विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत- जिल्हाधिकारी श्री. पापळकर

 

  • विकसित भारत संकल्प यात्रेस जिल्ह्यात आजपासून प्रारंभ




 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हिंगोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या यात्रेला प्रारंभ होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे अव्वर सचिव कौस्तुभ गिरी यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने आज आयोजित आढावा बैठकीत श्री. गिरी बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे, महिला व  बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ आदींची उपस्थिती होती.

यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा नगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जाणार असल्याने प्रत्येक तालुकास्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात यावी. तसेच  समन्वय अधिकाऱ्याची देखील नियुक्ती  करण्यात यावी. जिल्ह्यात ही यात्रा दि. 26 जानेवारी, 2026 पर्यंत राबविण्यात येणार असल्याने प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायती यानुसार यात्रेचे दैनंदिन वेळापत्रक तयार करुन योग्य नियोजन करावे.  या यात्रेत केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी योग्य कार्यवाही करावी. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचे लाभ देण्याचे देखील नियोजन सर्व विभागांनी करावे. तसेच यात्रेच्या दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे किंवा लाभार्थ्यांना लाभ देण्यासंबंधी शिबीराचे आयोजन करण्यात यावे. तसेच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संकल्पव यात्रेची माहिती, फोटो, व्हिडीओ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी असेही श्री. गिरी यांनी सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते दि.26 जानेवारी, 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात आज दि. 24 नोव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत संकल्प यात्रा होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते आज या संकल्प यात्रेला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील नगरपालिका क्षेत्र आणि सर्व 563 ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या माध्यमातून  अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करत त्यांना लाभ देण्यात येणार आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. यात्रेची दैनंदिन माहिती, फोटो आणि व्हिडीओ इत्यादीं केंद्र शासनाच्या वेबपोर्टलवर दररोज अपलोड करावी. तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

यावेळी सर्व तहसीलदार, सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर पालिकाचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

******

23 November, 2023

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त सेनगाव येथे जनजागृती

                                                                                                           


 

  हिंगोली (जिमाका), दि. 23 :  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालय, बस स्थानक, आठवडी बाजारामध्ये दि. 22 नोव्हेंबर, 2023 रोजी माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.

यावेळी सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विनय बगाटे, डॉ.सचिन राठोड, सेनगाव बस स्थानकाचे कर्मचारी, प्रवासी व सेनगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील कुमारी माता व विधवा मातेस नुकतेच जन्मलेले पण नको असलेल्या बाळाचे सुखरुप समर्पण करण्याविषयी व बालकांच्या कायद्याविषयीची माहिती संस्थाबाह्य बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण यांनी दिली. कनिष्ठ संरक्षण अधिकारी नितेश मकासरे यांनी कौंटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,2005 विषयी माहिती दिली. राहूल सिरसाट यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 व बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि बाल संगोपन योजनेची माहिती दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे यांनी दिली. राजरत्न पाईकराव यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.   

*****    

 

हिंगोली शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 

 हिंगोली (जिमाका), दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा व युवक सेवा, संभाजीनगर, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 5 डिसेंबर] 2023 रोजी डॉ. शिवाजीराव देशमुख सभागृह, नगर परिषद, हिंगोली येथे करण्यात आले आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. यासाठी प्रतीवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा दिनांक 01 एप्रिल 2023 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सहभाग घेणारे युवक व युवतींसाठी  वय 15 ते 29 वर्ष असावे याची नोंद घ्यावी.

संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने या निमित्ताने युवकांना तृणधान्याचे महत्व पटवून देवून विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपयोजना यावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य उत्पादन वाढ या संकल्पनेवर विविध प्रदर्शन, युवासाठी रोजगार व व्यवसाय संधी, यशोगाथा, पर्यावरण संरक्षण, भौगोलिक परिस्थितीवर आधारीत वाढीसाठी उपाययोजना, समस्यांचे निराकरण, संशोधने, देश-विदेशात तृणधान्य आयात, निर्यात बाबत माहिती, विविध योजनांची माहिती, पाककला इत्यादीबाबत युवकासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्त्र उद्योग, अॅग्रो प्रोडक्ट इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे. युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकारामध्ये समुह लोकनृत्य (सहभागी संख्या दहा.), वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या पाच), लोकगीत (सहभाग संख्या दहा), वैयक्तिक सोलो लोकगीते (सहभाग संख्या पाच) स्पर्धा होईल. कौशल्य विकास प्रकारात कथा लेखन (सहभाग संख्या तीन), पोस्टर स्पर्धा (सहभाग संख्या दोन), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या दोन) फोटो ग्राफी (सहभाग संख्या दोन) या प्रकाराचा समावेश आहे. तसेच संकल्पना आधारीत स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या 35), सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या पाच) आणि युवा कृतीमध्ये हस्तकला (सहभाग संख्या सात) वस्त्रो उद्योग (सहभाग संख्या सात), अग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या सात) इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना / संघांना प्रमाणपत्र व रोख बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.

या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदी संस्थेतील युवक व युवती सहभागी व्हावे, यासाठी दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात व dsohingoli01@gmail.co  या ई-मेल आयडी वर नावे नोंदवावीत, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, मो.नं. 9561760878 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

*******