18 June, 2024

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जून महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. दि. 23 जून ते 26 जून, 2024 पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची दिंडी, संत नामदेव महाराज संस्थान नसी नामदेव व इतर लहान मोठ्या संस्थानच्या दिंड्या हिंगोली जिल्ह्यातून जाणार आहेत. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 14 जून, 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 29 जून, 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. *******

ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न - केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आढावा बैठकीत केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी क्रीडा व नेहरु युवा केंद्राचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत उपस्थित होते. जिल्हास्थित क्रीडा विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा, आवश्यक सुविधा यांची माहिती त्यांनी घेतली. तसेच सध्या सुरु असलेली कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी त्यांनी विविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा करुन क्रीडा व नेहरु युवा केंद्रातील रिक्त पदे, विविध खेळांसाठी आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. भारतातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलबध करुन देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत आहे. यासाठी सर्व क्रीडा प्रेमी संघटनांनी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी समन्वयाने लोकांचा सहभाग वाढवून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नेहरु युवा केंद्रांनीही जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून युवकांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आणि नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कामांची माहिती सादर केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, नेहरु युवा केंद्राचे संघटक उपस्थित होते. *******

17 June, 2024

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आज हिंगोली जिल्हा दौ-यावर

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आज हिंगोली जिल्हा दौ-यावर हिंगोली (जिमाका), दि. १७ : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या उद्या, मंगळवार (दि. १८) रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. १८ जून, २०२४ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि. हिंगोली येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते किसान सन्मान योजना हप्ता वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी १८.३० वाजता शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे त्यांचे प्रयाण होईल. ***

14 June, 2024

महिला लोकशाही दिनाचे 18 जून रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 14 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे जून, 2024 च्या तिसऱ्या सोमवारी ईदची सुट्टी येत असल्याने महिला लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार,दिनांक 18 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

13 June, 2024

मुबलक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• ट्रॅक्टर पेरणी करताना शक्यतो दिवसाच पेरणी करा - राजेंद्र कदम हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात आज अखेर सरासरी 63.10 मि.मी. पाऊस झाला आहे. पेरणीसाठी साधारणपणे 100 मि.मी. पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य तसेच मुबलक पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल ओळंबे, जिल्हा अग्रणी बँकेचे अमित नाकाडे, निखील पांडे, कृषि विभागाचे नितीन घुगे, जिनिंग इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी सांगितले. आगामी हंगामातील कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्समधील उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्सनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्यूजी) कपाशीची लागवड करणे. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर मात्रेचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात कापूस पिकात विविध ठिकाणी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत. सरकीतील अळ्या व कोष नष्ट कराव्यात, फेरोमन सापळ्यातील ल्यूर्स वेळचेवेळी बदलणे व कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. वरीलप्रमाणे कार्यवाही होत असल्याची खात्री करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिनिंग व प्रेसिंग मिल्स व कापूस साठवणूक गोडाऊन करिता कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांचे पथक करुन त्यांना जबाबदारी सोपवावी. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व माध्यमांव्दारे व्यापक प्रसिध्दी करून शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. पुरेशा प्रकाशात, शक्यतो दिवसाच पेरणी करावी - राजेंद्र कदम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी ट्रॅक्टरने पेरणी करताना शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पेरणी करण्याचे टाळावे. शक्यतो पेरणी ही दिवसाच आणि पुरेशा प्रकाशात करण्याचे आवाहन केले. जेणेकरून रात्री बियाणे जमिनीत किती खोल जात आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे बियाणे खोलवर गेल्यास त्याची उगवणक्षमता घटते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे श्री. कदम यांनी सांगितले. *****

जादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्राचा परवाना निलंबित

हिंगोली (जिमाका), दि. 13 : पावसाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खते, बी, बियाणे खरेदी सुरु आहे. कृषि केंद्रधारकाकडून कापूस बियाणे विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून संपर्क करुन कापूस बियाण्याच्या विक्री किमतीबाबत शहानिशा करण्यात येत आहे. याच दरम्यान कळमनुरी पंचायत समितीचे कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी काही शेतकऱ्यांना संपर्क करुन कापूस बियाणे विक्री किमतीबाबत शहानिशा केली असता काही कृषि केंद्रांकडून कापूस बियाण्याच्या मागणी असलेल्या काही वाणाची जादा दराने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने भरारी पथकातील जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी आखाडा बाळापूर येथील साईकृपा कृषि केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान कापूस बियाणे विक्री बिलाची तपासणी करुन कापूस बियाणे खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क करुन पडताळणी करण्यात आली. यामध्ये संबंधित कृषि केंद्र धारकाने जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची रितसर सुनावणी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी साईकृपा कृषि केंद्र आखाडा बाळापूर यांचा कापूस बियाणे विक्रीचा परवाना सात दिवसासाठी निलंबित केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार, अडचण असल्यास तात्काळ कृषि विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ********

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जागतिक बाल कामगार दिनानिमित्त येथील आनंद नगर येथील जिल्हा परिषद शाळा व विवेकानंद नगर येथील इन्स्पायर कोचिंग क्लासेस येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाल कामगार कायदा, बाल हक्क व संरक्षण, बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, दुकाने निरीक्षक अधिकारी एन. एस. भिसे, बाल संरक्षण अधिकारी जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 बाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपणास गर्दीच्या ठिकाणी किवा इतर ठिकाणी बाल कामगार आढळल्यास किंवा बालकासंबंधी जे काही अडचणी, समस्या उद्भवल्यास किंवा मदत लागल्यास, जेव्हा एखादे बालक हरवलेले आहे किंवा घरातून निघून गेलेले आहे, बालविवाह होत असल्यास, बालकाला बालमजुरीने काम करून घेणे, एखाद्या बालकाला वैद्यकीय मदत लागल्यास, रस्त्यालगत भीक मागणारे बालके, निराधार बालके, निवाऱ्याची गरज असणारी बालके, एखाद्या बालकास समुपदेशनाची गरज असल्यास किंवा बालकास शैक्षणिक मदत लागल्यास आपण चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संबंधित बालकांची मदत करता येईल. टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती ही पूर्णत: गोपनीय असते. त्यामुळे अडचणीत असणाऱ्या बालकांची मदत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कामगार विभागाचे कर्मचारी पंकज ढगे, गजानन पवार, चंद्रकांत मुंडे, गोविंद दहिफळे, बालाजी साळवे, राजरत्न पाईकराव, सूरज इंगळे, तथागत इंगळे, सुमित सरोदे, गोपाल भोस, हार्दिक घुमनर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ******