22 October, 2024
मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य
हिंगोली (जिमाका), दि. 22 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणत्याही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
******
निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान घेणार यंत्रणेचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाली असून, आजपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री व स्विकृतीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. गुजरात केडरचे असलेले निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान हे उद्या बुधवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात यंत्रणेचा आढावा घेणार असून, सर्व पथक प्रमुखांनी या बैठकीला अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी संबंधितांना दिले आहेत.
सर्व जिल्हा नोडल अधिकारी, आयकर अधिकारी, एल. आय. सी. अधिकारी, वस्तु व सेवा कर अधिकारी, सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक, एफएसटी, एसएसटी पथक प्रमुख यांनी अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली खर्च विषयक कामकाजाच्या अनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीमध्ये निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. प्रधान यांच्याकडून निवडणूक खर्चविषयक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
******
निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल
• निवडणुकीच्या राजकीय जाहिरात प्रसारीत/प्रसिद्धीसाठी पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
• जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक
• मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक
• अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने 7 दिवस आधी अर्ज करावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे आहेत. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे श्री.गोयल यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या कक्षात कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.
राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस संदेश, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती ह्या देखील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज 48 तासात निकाली काढेल. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णयाविरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे.
जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था - ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करण्यात येत असल्याची दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा, त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्कींप) साक्षांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलद्वारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे, त्याचे प्रस्तावित केलेले दर, त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी सविस्तर माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे.
आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टीका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य याचे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमतीशिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. अनुमतीशिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
******
संकल्प है हमारा, मतदान करायचं...! 'संकल्प आमुचा, मतदान करण्याचा...!' शालेय विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याचा पालकांना आग्रह
हिंगोली (जिमाका), दि 22 : जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहे. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करणार आहेत. आपल्या पालकांकडून मतदान करण्याचा संकल्प करून घेणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना संकल्पपत्र वितरित करण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबरपर्यंत हे संकल्प पत्र विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जमा करून देणार आहेत.
पालक संकल्प पत्र वाचून त्यावर स्वाक्षरी करणारा आणि मतदान करण्याचा संकल्प करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान करून लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी आपले योगदान द्यावे, यासाठी स्वीप समितीमार्फत मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
निवडणुकीच्या संदर्भाने यावेळी बहुसंख्य मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, मतदारांमध्ये आपल्या मतदानाबाबत जागरूकता निर्माण होऊन जिल्हाभरात मतदानाची एकूण टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्विप समिती तसेच वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा स्तरावरील स्विप समिती वेगवेगळे उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये जागृती निर्माण करत आहे.
जिल्हाभरातून विधानसभानिहाय सर्वात जास्त संकल्पपत्र भरून देणाऱ्या पहिल्या तीन केंद्रप्रमुखांचा जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरव देखील करणार आहेत.
यामुळे अधिक संकल्पपत्र भरून देण्यासाठी केंद्रनिहाय चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवून प्रत्येक मतदाराला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वीप समिती प्रयत्नशील आहे.
यापुढील काळात मतदार जनजागृतीसाठी चुनाव पाठशाला, आशा ताई, बालवाडी अंगणवाडी ताई, महिलाबचत गट, बीएलओ इत्यादीमार्फत प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी गृहभेटीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत डिग्रसकर व संदीपकुमार सोनटक्के यांनी कळविले आहे.
*******
हिंगोली जिल्ह्यात खर्च निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांची नियुक्ती
• राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिक किंवा मतदाराची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्जुन प्रधान यांची निवडणूक खर्च निरीक्षक (Expenditure Observer) म्हणून नियुक्ती केली आहे.
अर्जुन प्रधान हे 2014 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 9900845990 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. गुजरात केडरचे अधिकारी असलेले अर्जुन प्रधान हे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 68 इच्छुकांकडून 153 अर्जांची उचल
• एकही अर्ज दाखल नाही
हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी 21 इच्छूक उमेदवारांनी 43 अर्ज, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 18 इच्छूक उमेदवारांनी 44 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 29 इच्छूक उमेदवारांनी 66 अर्ज असे एकूण जिल्ह्यात 68 इच्छुक उमेदवारांनी 153 नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी एकानेही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 68 इच्छुक उमेदवारांनी 153 नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.
यावेळी 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, 94-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
******
युवराज पवार अथवा त्यांच्या कुटुंबियांनी निवृत्तीविषयक लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली दि. 22 (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयात दाखल अवमान याचिका क्रमांक 878/2023 नुसार तत्कालीन हजेरी सहाय्यक युवराज पवार यांना सेवा ग्राह्य निवृत्तीविषयक लाभ द्यावयाचे आहेत.
याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागाकडून माहिती घेतली असता युवराज पवार अथवा त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे याद्वारे युवराज पवार अथवा त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांनी तात्काळ लेखा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक खंडेराव पोटे यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9307737575 वर अथवा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Posts (Atom)

