19 November, 2024
हिंगोली जिल्ह्यात 9 आदर्श मतदान केंद्र, लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत नोंदवा -जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल
• महिला, दिव्यांग आणि युवा कर्मचारी संचालित आदर्श मतदार केंद्र
हिंगोली (जिमाका), दि. 19: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024मध्ये जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिली आहे.
या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्र
हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 190-बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, पूर्व विंग रुम नं. 2 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 81-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1 येथे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र
हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 252-बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत खोली क्रमांक 1 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 260-कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
आदर्श युवा मतदान केंद्र
हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 267-जिल्हा परिषद प्रशाळा वसमत, नवीन इमारत खोली क्रमांक- 3 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 183-ग्रामपंचायत, औंढा नागनाथ खोली क्र. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे अशाप्रकारे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
*****
लोकशाहीच्या महोत्सवासाठी .... चला करू मतदान -जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल
• आज दिवस तुमचा; मतदानाचा हक्क बजावण्याचा
• मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज
• गृहभेटीतून 989 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
• ज्येष्ठ व दिव्यांगांनी सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करून ने-आण सुविधेचा लाभ घ्यावा
हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी केली आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी कोणतेही कारण न देता मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभाग गृहभेटी घेत निवडणूक विभाग मतदारांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचत 835 ज्येष्ठ व 154 दिव्यांग असे एकूण 989 मतदारांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.
निवडणूक विभागाने निवडणूक पथकांनाच मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या सोहळ्यात आपल्या मतांचे दान केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 328 मतदान केंद्र असून त्यापैकी किन्होळा-185 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. तर 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात 352 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 मतदार केंद्र असून या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने उद्या बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
******
18 November, 2024
जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य पथक होणार दाखल
• आरोग्य यंत्रणा सतर्क : तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील बूथवर दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. हिवाळा ऋतू असूनही वातावरणातील बदलाची दखल घेत मतदान बूथवरील सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार किटसह आशा वर्कर उपस्थित राहणार आहेत. यांची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे.
तसेच तातडीच्या उपचारासाठी व संदर्भ सेवेसाठी 102 व 108 रुग्णवाहिका जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध राहणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतदान पूर्ण होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
******
विधानसभा निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यात 387 वाहने
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या, मतदान कर्मचारी, तसेच आवश्यक असेल तेथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्यासाठी 387 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 122 क्रुझर, 65 एसटी बस, 41 मिनीबस, 17 जीप, 27 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी 115 जीप वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय वाहनाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 54 क्रुझर, 16 एसटी बस, 18 मिनीबस, 12 जीप, 12 राखीव जीप तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 38 जीप अशी 150 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 40 क्रुझर, 24 एसटी बस, 17 मिनीबस, 5 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 36 जीप अशी 122 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 94- हिंगोली विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 28 क्रुझर, 25 एसटी बस, 6 मिनीबस, 5 जीप, 10 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 41 जीप वाहने अशी 115 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी दिली आहे.
***
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म निरीक्षकांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत, 93- कळमनुरी,94- हिंगोली विधानसभा मतदार संघात नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे द्वितीय प्रशिक्षण आज दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात घेण्यात आले.
सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना करायची कामे, परिशिष्ट 28 सूक्ष्म निरीक्षकांच्या अहवालाचे स्वरूप, सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान सुरू होण्यापूर्वी करावयाची कामे, मतदान केंद्रावरील तयारीचे निरीक्षण करणे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मॉक पोल पार पाडणे, मॉक पोल नंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी कंट्रोल युनिट (CU) मधील मते clear झाली आहेत का ? हे पाहणे तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आदी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली.
यावेळी सोबत Annuxuar 28, Checklist For Micro Observer Manual यांच्या प्रतीही सूक्ष्म निरीक्षकांना देण्यात आल्या.
यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व सूक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन करून येणाऱ्या अडचणी व त्यावरील करायवयाच्या उपाययोजना याविषयी अवगत केले. तसेच विविध फॉर्म जसे 17 C, 17A, Annuxare No 28 यांची पण माहिती दिली .
तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी उपस्थित सूक्ष्मनिरीक्षकांसोबत संवाद साधला.
प्रशिक्षण व्यवस्थापन समिती नोडल अधिकारी डॉ. दीपक साबळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांसी संवाद साधताना निवडणुकीचे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याच्या सूचना देऊन उपस्थितांसोबत संवाद साधला.
यावेळी निवडणूक प्रशिक्षण टीमचे सदस्य वरिष्ठ अधिव्याख्याता निळेकर,अधिव्याख्याता जाधव तसेच बालाजी काळे, विजय बांगर आणि दीपक कोकरे हे उपस्थित होते.
*******
निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत तिसरी सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतिक्षा भुते, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही तिसरी सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात मतदानाच्या ठिकाणी कोणता अधिकारी-कर्मचारी मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, हे निश्चित करण्यात आले. तसेच दहा टक्के अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बुथनिहाय 4 व्यक्तीचे एक मतदान पथक याप्रमाणे 1137 पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी 328 पथक निश्चित करण्यात आले असून 37 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 352 पथक निश्चित करण्यात आले असून 39 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 343 पथक निश्चित करण्यात आले असून 38 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय निवडणूक कामी नियुक्त करण्यांत आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते.
*****
शाळा, महाविद्यालयामध्ये 'बालहक्क सप्ताह आणि बाल अधिकार'वर मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील श्री स्वामी समर्थ बालगृह व हिंगोली येथील सरस्वती मुलीचे निरीक्षणगृह या दोन स्वयंसेवी संस्था कार्यरत असून येथे बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन बालकाना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान बालहक्क सप्ताह व आंतरराष्ट्रीय दत्तक महिना साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये बालहक्क सप्ताह आणि बालअधिकार या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तसेच पॉक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार इत्यादीबाबत जिल्ह्यातील शाळेमध्ये बाल कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बाल हक्क सप्ताहनिमित्त व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त 18 वर्षांखालील बालकांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येत आहे. या प्रश्नमंजुषेच्या आधारे बालकांना ऑनलाइन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे कर्मचारी सहभागी होणार आहेत.
*****
Subscribe to:
Posts (Atom)


