26 January, 2025
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तहसीलदार आश्विनकुमार माने, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
25 January, 2025
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
हिंगोली, दि. २५ (जिमाका):- भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय
ध्वजारोहणाचा कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वा. हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर होणार आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
***
24 January, 2025
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींचे आई-वडिलांना भावनिक पत्र
हिंगोली (जिमाका), दि. 24 : दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळेतील 6 वी ते 10 वीच्या सर्व विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांना भावनिक पत्र लिखाणाचा उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पत्र लिखाण उपक्रम राबविण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थिनींनी ‘माझ लग्न वय होण्याआधी, शिक्षण पूर्ण होण्याआधी करु नका, मला शिक्षण घेऊ द्या’ असे भावनिक पत्र आपल्या आई-वडिलांना लिहिले आहे.
*****
नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारत सरकारच्या खेल व युवा क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संप्पन्न झाल्या.
हिंगोली तालुका क्रीडा संकुलात दि. 22 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचा आदर्श युवा पुरस्कार प्राप्त पत्रकार डॉ.विजय निलावार, तालुका क्रीडा अधिकारी ए.आर. बोथीकर, कबड्डीपटू दत्तराव बांगर आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामुळे जिल्ह्यातील खेळाडूमधे उत्साह वृद्धिंगत झाल्याने नेहरू युवा केंद्राची संकल्प सिध्दी झाली आहे. सर्व सहभागी खेळाडू , पंच, क्रीडाप्रेमी, अन् सहभागी मान्यवरांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे . यावर्षी 15 ते 29 वर्ष वयोगटातील सहभागी विजयी खेळाडू आणि संघाना जिल्हास्तरावरून थेट राज्य स्तरावर खेळण्याचे सौभाग्य प्राप्त असल्याने या सुवर्ण संधीचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूनी घ्यावा. हिंगोली जिल्ह्याचे नाव आता राज्यस्तरावर लौकिक करावे, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक आशिष पंत यांनी केले.
तालुका क्रीडा संकुलावर आवश्यक त्या सुविधा नसल्याने खेळाडूंची कुंचबना होत असून, पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यात लक्ष घालण्याबाबत मागणी डॉ.विजय निलावार यांनी याप्रसंगी केली.
क्रीडा अधिकारी बोथीकर यांनी क्रीडा विभागाकडून सर्व सहकार्य मिळेल. काही अडचण आल्यास थेट संपर्क करावा, असे आवाहन करून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. दिवसभर सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या तांत्रिक व नियमांच्या अधीन राहून खेळाडूंनी प्रदर्शन करावे, याची माहिती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू गजानान आडे यांनी देत मोलाचे मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरावरील स्पर्धांमध्ये 100 मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम क्रमांक चंद्रभान नामदेव घ्यार, द्वितीय क्रमांक अक्षय विष्णू वानखेडे व तृतीय क्रमांक शुभम संजय पाईकराव यांनी प्राप्त केला आहे. मुलीमध्ये प्रथम क्रमांक पायल सुरेश राठोड, द्वितीय क्रमांक शुभांगी दिलीप राठोड, तृतीय क्रमांक प्राची दीपक कठाळे यांनी प्राप्त केला आहे. गोळा फेक मुलांच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तेजस राजेश काकडे, द्वितीय क्रमांक भगवान शंकर, तृतीय क्रमांक अभिषेक रामकिशन शिंदे यांना मिळाला आहे. मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वाती गजानन कोरडे, द्वितीय क्रमांक पायल सुरेश राठोड, तृतीय क्रमांक वैशाली विष्णू चव्हाण यांना मिळाला आहे. सांघिक खेळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदर्श स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली, द्वितीय क्रमांक एकता संघ हिंगोली व तृतीय क्रमांक अंधारवाडी कबड्डी टीम यांना मिळाला आहे. खो-खो मुलींच्या सांघिक खेळामध्ये प्रथम क्रमांक सर्वोदय विद्यालय खूडज सेनगाव, द्वितीय क्रमांक सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या माध्यमिक विद्यालय हिंगोली, तृतीय क्रमांक सर्जरी क्रीडा मंडळ हिंगोली यांना प्राप्त झाला आहे. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या सर्व विजेती खेळाडूंना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्राचे प्रवीण पांडे यांनी केले. मुला मुलींच्या 100 मीटर धावणे, गोळा फेक, खो-खो, कबड्डी स्पर्धा दिवसभर सुरू होत्या. पंच म्हणून आर.कुरेशी, दत्तराव बांगर, गजानन आडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकता अकादमी, वाटसरु फाउंडेशन हिंगोली यांनी परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या श्रीमती एस. डोंगरे - दिवे, क्रीडा शिक्षक भावना नरमिरवार, एस. यु. भुमरे, पी.व्ही. राठोड, रहीम कुरेशी, महाराष्ट्र पोलीस विभागाचे आर. डी. मुकाडे, एकता स्पोर्ट अकॅडमीचे संचालक व राष्ट्रीय खेळाडू गजानन आडे हे मान्यवर उपस्थित होते.
*****
लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी व निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करावी
हिंगोली (जिमाका), दि. 24 : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या कलम 4 (1) नुसार कार्यालयांतर्गत येणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची सखोल चौकशी व त्याचे निराकरण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अशा प्रत्येक नियोक्त्याने शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा ज्याची शासनाने स्थापना केली असेल किंवा पूर्ण अथवा अशंत:, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरणामार्फत किंवा शासकीय कंपनी किंवा खाजगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषागृहे, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले, एमआयडीसी, धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग, कामगार कल्याण, शिक्षण विभाग, शासकीय, निमशासकीय व खाजगी शिक्षण संस्था, नगरपालिका, सहकार विभाग, बँकींग विभाग, सहकारी पतसंस्था, पतपेढी, शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, शॉपींग मॉल, व्यापारी महामंडळ, मार्केट किमती, कोचिंग क्लासेस इत्यादी ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयात अधिनियमातील कलम 4 (1) नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे.
बदली किंवा अन्य कारणाने समितीमधील एखादे पद रिक्त झाल्यास, अधिनियमातील तरतुदीनुसार नव्याने अंतर्गत तक्रार निवारण समितीचे गठन करावे.
अधिनियमातील कलम 26 नुसार जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, अधिनियमातील कलम 13, 14, 22 नुसार कारवाई केली नाही, या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे.
ज्या आस्थापनेत 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतील अशा सर्व आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदीनुसार तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
*****
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 24 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे दि. 25 व 26 जानेवारी, 2025 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. झिरवाळ हे शनिवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील व सायंकाळी 5 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 5-15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोटारीने प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून प्रसाद गार्डन वसमत शहर येथे मोटारीने प्रयाण. सायंकाळी 7 वाजता वसमत येथे आयोजित पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7.30 वाजता प्रसाद गार्डन वसमत शहर येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव.
रविवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.55 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी 9.45 वाजता पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून पलटन हिंगोली येथील रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम स्थळाकडे त्यांचे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.15 वाजता पलटन हिंगोली येथे आगमन व रक्तदान शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. 10.45 वाजता फलटन हिंगोली येथून पक्षीय कार्यालय हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण. 11 वाजता कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती व जनसेवा कार्यालयास भेट, हिंगोली शहरातील पदाधिका-यांसोबत बैठक. दुपारी 12 वाजता आमदार तानाजी मुटकुळे यांच्या यमुना निवास, रामाकृष्ण नगर, बळसोंड निवासस्थानाकडे प्रयाण. 12.30 वाजता श्री. मुटकुळे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता श्री. तानाजी मुटकुळे यांचे निवासस्थान येथून नाशिककडे प्रयाण.
******
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात चाईल्ड हेल्प लाईन मार्फत बालकाशी निगडीत विविध विषयावर जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 24 : महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार वसमत तालुक्यातील मौजे वापटी व पांगरा शिंदे या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. वापटी येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात चाईल्ड होल्पलाइन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.
बाल विवाह म्हणाले काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याचे अनेक कारणे यामध्ये कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलींचे प्रमाण, वडिलांचे व्यसन, किशोरवयीन मुला-मुलीच्या हातून होणाऱ्या चुका याबाबत माहिती दिली. परंतु बाल विवाह केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा सामना मुलगा, मुलगी व त्यांचे कुटुंब यांना करावा लागतो, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात.या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीकरीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी सांगितले.
समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी ग्राम पातळीवर बालकाच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोनातून बाल पंचायत स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित कर्मचाऱ्यांना बेटी बचाव बेटी पढ़ाओ दशकपूर्ती बाबत शपथ देण्यात आली. तसेच बालकांना आरोग्य, शिक्षण, इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. 1098 हा बालकांकरिता तात्काळ मदत करणारी हेल्प लाईन आहे. या क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. ग्रामपंचायत येथे सरपंच तथा ग्राम बाल संरक्षण समिती अध्यक्ष यांना देखील माहिती देण्यात आली व गाव पातळीवर बाल पंचायत स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एखादे बालक सापडलेले, हरवलेले, किंवा अडचणीत असेल किंवा एखाद्या बालकास शैक्षणिक अडचण आहे. अशा बालकाला मदतीची गरज भासल्यास 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा.
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजना व बालकाकरिता असणाऱ्या विविध योजनाची माहिती केस वर्कर सुरज इंगळे यांनी दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, वापटीचे सरपंच भगवान शिंदे, भागवत शिंदे, डॉ.अवधूत शिदे, डॉ. जिंतूरकर, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Posts (Atom)




