19 September, 2025
ग्रंथालय संचालनालयाच्या पुरस्कारासाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करा
हिंगोली(जिमाका), दि. 19 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" देण्यात येतात.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार, 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
******
ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी अर्थसहाय्य, ईश्वर चिठ्ठीद्वारे होणार 25 सप्टेंबर रोजी लाभार्थ्यांची निवड
• पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधीअंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवणे या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समिती स्तरावरुन अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सह अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे व निवड समितीचे सर्व सदस्य यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 32 मिमी पाऊस
• नांदापूर, आंबा, हयातनगर, औंढा व साळणा या पाच मंडळात अतिवृष्टी
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 65.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 15.4 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 21.3 (856.7), कळमनुरी 22.5 (1018.6), वसमत 47.5 (981), औंढा नागनाथ 65.3 (1004.4) आणि सेनगाव तालुक्यात 15.4 (785.2) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 19 सप्टेंबर, 2025 पर्यंत सरासरी 923.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 125 अशी आहे.
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वसमत तालुक्यातील आंबा व हयातनगर आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा व साळणा या पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर मंडळात 65.3, वसमत तालुक्यातील आंबा 71.8, हयातनगर 66.3 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा 92.5 व साळणा मंडळात 73.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
******
18 September, 2025
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान पंधरवड्याला सुरुवात : पहिल्या दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ
मुंबई, दि.18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) चालणाऱ्या या भव्य उपक्रमांतर्गत 10 लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी होऊन 1,857 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचाराला सुरूवात झाली.
मुख्यमंत्री यांची संकल्पना
संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या भव्य उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन
राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग
या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.
तळागाळातील नागरिकांसाठी दिलासा
नेत्ररोग उपचाराचा खर्च गोर-गरीब नागरिकांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.
१७ सप्टेंबर रोजी अभियानातून मिळालेला लाभ
• अभियानात सहभागी रुग्णालयांची संख्या : 426
• आयोजित शिबिरांची संख्या : 128
• शिबिरांत सहभागी एकूण रुग्णसंख्या : 15,469
• पुढील उपचारासाठी संदर्भित रुग्ण : 717
• मोफत चष्म्यासाठी नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या : 1,590
• मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलेल्या रुग्णांची संख्या : 1,857
• इतर नेत्र विषयक शस्त्रक्रियांची संख्या (मोतीबिंदू वगळून) : 127
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहे. या अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हते, त्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम तळागाळातील जनतेसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
००००
वसमत येथे 26 सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन
• नागरिकांनी लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
वसमत विधानसभा मतदार संघातील जनतेचे शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा सदस्य यांच्या उपस्थितीत दि. 26 सप्टेंबर , 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, वसमत येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत विधानसभा मतदार संघातील वसमत व औंढा तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे काम प्रलंबित असल्यास अथवा अडीअडचणी असल्यास त्याबाबत दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जनता दरबार, जनतेच्या शासकीय प्रश्नाचे निरासरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने वसमत येथे एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी दि. 19 ते 25 सप्टेंबर, 2025 या कालावधीत नागरिकांचे अर्ज, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी प्रत्यक्ष अर्ज, तक्रारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपले लेखी स्वरुपात अर्ज, तक्रारी अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.
******
शिष्यवृत्तीचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज 30 सप्टेंबरपूर्वी निकाली काढण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी शासनाकडून 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
भारत सरकार शिष्यवृत्तीचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील 99 अर्ज व 2024-25 मधील 292 अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार, बैठका व व्हॉटस्अप ग्रुपवरील संदेशाद्वारे सूचना देऊनही महाविद्यालयाच्या लॉगिनवर अर्ज प्रलंबित आहेत.
महाविद्यालयस्तरावर व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेले महाडीबीटी शिष्यवृत्तीचे सर्व पात्र अर्ज महाविद्यालयांनी दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
******
कंजारा येथील जिल्हा परिषद शाळेत चाईल्ड हेल्पलाईन मार्फत बाल संसद स्थापन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा चाईल्ड हेल्पलाईन 1098 सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्या नियोजनानुसार हिंगोली चाईल्ड हेल्प लाईन 1098 कक्ष हिंगोली मार्फत औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "बाल संसद" स्थापन करण्यात आली.
"बाल संसद" म्हणजे मुलांची संसद, जिथे मुले त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. बाल संसद मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. नेतृत्व क्षमता हे मुलांमध्ये नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करते. लोकशाही प्रक्रिया बाल संसद लोकशाही प्रक्रियेद्वारे कार्य करते, जिथे मुले त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शाळा आणि समाजात हक्कांचे संरक्षण हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकाराचे संरक्षण करतो. उदाहरण : बाल संसदेत पंतप्रधान, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री आणि पर्यावरण मंत्री अशा पदांवर मुलांची निवड केली जाते. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून जनजागृती करण्यात येत आहे.
या बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बाल संसद कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे उपस्थित होते. तसेच समुपदेशक अंकुर पाटोडे व केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी सहकार्य केले.
यावेळी संबधित शाळेतील मुख्याध्यापक व्ही.यु.हालगे, एस. बी. खरात आर.बी. लडके शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)
