15 October, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर, सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख आत्मचरित्राचे वाचन जानवी पानसे,आम्रपाली चोरमारे,रुपाली नरवाडे,वहिदा काझी, मनकर्णा जाधव, कुसुम भिसे यांनी केले.
*****
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी उद्योजकता परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन
हिंगोली, दि.15 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) व्दारा आयोजित अनुसूचित जाती या प्रवर्गातील व बार्टीद्वारे स्थापित स्वयंसहायता युवा गटातील युवक, युवती व महिलांसाठी एक महिना कालावधीचा संपूर्ण मोफत स्वरुपाचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. २८ ऑक्टोबर, २०२५ ते २८ नोव्हेंबर, २०२५ असा ३० दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम हिंगोली येथे राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक दिवशीय उद्योजकता विकास परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन आयोजन दि.२७ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रेनबो कॉम्प्युटर इन्टिट्यूट, आदर्श कॉलेज पाण्याच्या टाकीजवळ, हिलटॉप कॉलनी, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय विकास, उद्योग सुरु करणे, विक्री कौशल्य, विविध क्षेत्रातील उद्योग संधी, कंपनी नोंदणी प्रक्रिया, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना, उद्योगाची नोंदणी व परवाने माहिती, बाजारपेठ पाहणी, प्रत्यक्ष उद्योग भेटी, अभिप्रेरणा प्रशिक्षण, शासनाचे औद्योगिकरण, मार्केटिंगतंत्र, उद्योग व्यवस्थापन, स्टॅन्डअप इंडिया, एक्सपोट-इम्पोर्ट माहिती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रकल्प अहवाल इत्यादीचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान ८ वी पास असावा आणि हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. वयोमर्यादा किमान १८ ते ४५ असावी. उमेदवार हा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा. या प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड दोन प्रतीसह व दोन पासपोर्ट फोटो आदी आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले (९७६५२९१७८५) यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक किसन धाबे (९३७०८३१४८१) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
******
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
हिंगोली (जिमाका) दि. १५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत व विलंब शुल्कासह २२ ते ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करता येतील.
अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार नाहीत. ३० ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
*******
14 October, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा
• राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून 11
आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करावी
हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत एनसीडी पोर्टलवरील उच्च रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर स्क्रीनिंगचे कामकाज सुधारण्यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून 11 आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित कराव्यात. 11 प्राथमिक आरोग्य केंद्राचे एन-क्वॉस मूल्यांकनासाठी आवश्यक सुधारणा वेळेत पूर्ण करून एनकॉस प्रमाणित करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विशाल पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे , डॉ. डी व्ही. सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ. राजेश्वर कत्रूवार, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारूडी, डॉ. प्रशांत पुठावर, डॉ. निशांत थोरात आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*******
ज्वारी पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलवर शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. १४ (जिमाका):
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य-उपअभियान (श्रीअन्न) तसेच आरकेव्हीवाय महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येणार असून, केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी राज्य शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शुक्रवार (दि. १७)पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासाठी शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२४ पूर्वी झालेली असावी. यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेल्या गटांनी “विद्यमान शेतकरी गट” हा पर्याय निवडून विद्यमान युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा (उदा. आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इ.), एकाच कुटुंबातील फक्त एका व्यक्तीसच लाभ मिळेल. २५ पेक्षा जास्त शेतकरी असलेल्या गटाने एकाच गावातील २५ शेतकऱ्यांची निवड करावी. निवड प्रक्रिया “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर केली जाईल. गटातील सर्व शेतकऱ्यांची अँग्रीस्टँकवर नोंदणी आणि फार्मर आयडी क्रमांक असणे बंधनकारक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन महा-डीबीटी पोर्टलवर तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*****
अतिवृष्टी-पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचा दिलासा*
• सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य – नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करण्याचा निर्णय
हिंगोली, दि. १४(जिमाका) :
राज्य शासनाने सन २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा जाहीर केला आहे. या अंतर्गत दोन निर्णय घेतले गेले असून, खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य तसेच खरडून नापिक झालेल्या शेतजमिनी मनरेगा अंतर्गत पुन्हा लागवडीयोग्य करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.
सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
अतिवृष्टी/पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने प्रति विहीर जास्तीत जास्त ३० हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मंजूर केले आहे. प्रत्यक्ष दुरुस्ती खर्च कमी असल्यास त्या प्रमाणात सहाय्य दिले जाईल.
पात्र शेतकऱ्यांनी विहिरीची नोंद असलेला ७/१२ उतारा जोडून गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करावा. पात्र लाभार्थ्यांना अंदाजपत्रकीय खर्चाच्या ५० टक्के रक्कम (कमाल १५ हजार रुपये) आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारीमार्फत देण्यात येईल, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर अदा केली जाईल.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित विहिरींचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार आहे.
खरडून नापीक झालेल्या शेतजमिनी लागवडीयोग्य करणे
अतिवृष्टी व पूरामुळे खरडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या (कमाल मर्यादा २ हेक्टर) जमिनी मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत दुरुस्त करून पुन्हा लागवडीयोग्य केल्या जाणार आहेत.
जॉबकार्ड धारक शेतकऱ्यांना या कामांचा लाभ मिळणार असून, प्रति हेक्टर कमाल रु. ३ लाख (२ हेक्टरसाठी कमाल ५ लाख रुपये) खर्च अनुज्ञेय असेल. मजुरी व साहित्य खर्चाचे प्रमाण ६०:४० ठेवण्यात आले आहे. या कामांची अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामपंचायतीमार्फत केले जाणार आहे.
अंमलबजावणीसाठी तातडीचे निर्देश
या दोन्ही योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
या निर्णयांमुळे अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून आगामी हंगामात सिंचन सुविधांद्वारे शेती पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
*****
हिंगोली जिल्ह्यात २६७६ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक*
• राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्ये व पौष्टिक तृणधान्ये पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ
हिंगोली, दि. १४ (जिमाका) :
राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्ये आणि पौष्टिक तृणधान्ये पिकांसाठी हिंगोली जिल्ह्यास २६७६ क्विंटल प्रमाणित रब्बी बियाणे वितरणाचा लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
हरभरा पिकांच्या १० वर्षांतील वाणासाठी ५,००० रुपये प्रति क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणासाठी २,५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणाकरिता १,६०० क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणाकरिता ९६६ क्विंटल इतका लक्ष्यांक प्राप्त झाला आहे.
तसेच रब्बी ज्वारीसाठी १० वर्षांआतील वाणाकरिता ३,००० रुपये प्रति क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणाकरिता १,५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यासाठी १० वर्षांआतील वाणाकरिता ४० क्विंटल व १० वर्षांवरील वाणाकरिता ७० क्विंटल लक्ष्यांक मंजूर झाला आहे.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान २० गुंठे ते कमाल १ हेक्टर क्षेत्राकरिता मर्यादित आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड यांच्या अधिकृत वितरकांकडून बियाणे घ्यावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक आयडी, आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रांसह अनुदान वजा रक्कम भरून पक्के बिल घेणे आवश्यक आहे.
लक्ष्यांक पूर्ण होईपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाणे वाटप सुरू राहील. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)



