21 January, 2026

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी


सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा घेतला आढावा

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक 


नांदेड, दि. 21 जानेवारी:- नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व भाविकांची व्यवस्था चोख होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिल्या. 


जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, समितीचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.


श्री. परदेशी यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी कार्यक्रमाच्या तयारीबाबत विचारणा केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना केल्या. 


जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, मोदी मैदानावरील कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात ५२ एकर मैदानावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येत आहेत. प्रशासनाने यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मैदानालगत दोन टेन्ट सिटी, त्यामध्ये सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता, हॉटेल्स, शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 


गुरुद्वारा बोर्डाचे  प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. श्री. नाईक यांनी हा कार्यक्रम नऊ समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन, समाज मिळून प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा या दृष्टीने जनजागृती व्हावी. यासह शालेय स्तरापासून महाविद्यालयापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिकाधिक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

**********




हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा


सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले



नांदेड, दि. 21 जानेवारी : हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या धर्मरक्षण, त्याग व बलिदानाला भावपूर्ण उजाळा दिला. 


 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हात जोडून “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” हे गीत सादर केले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर”, “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आला आहे. या माध्यमातून गुरुंचा ऐतिहासिक त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी सहभागी शालेय विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. तसेच दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा एक भाग म्हणून हा सामूहिक गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हिंद दी चादर क्षेत्रीय समितीचे सह-अध्यक्ष कैलास खसावत, क्षेत्रीय समितीचे सह-सचिव तथा जागरण समितीचे सदस्य भगवान राठोड, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी तथा कार्यक्रमाचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, नोडल अधिकारी विजयकुमार पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, खालसा आयटीआयचे प्राचार्य गुरुबचन सिंग शिलेदार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी सचखंड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या नकाशाच्या स्वरूपात उभे राहून सामूहिक गीत गायन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.


या सामूहिक गीत गायन कार्यक्रमात नांदेड शहरातील पिपल्स हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, खालसा हायस्कूल, खालसा आयटीआय, अशोक हायस्कूल, फेजुल उलूम हायस्कूल, केंब्रिज विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, राजश्री शाहू हायस्कूल, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, ज्ञानभारती विद्यामंदिर, नागार्जुना पब्लिक स्कूल, ग्यानमाता विद्याविहार, पिनॅकल इंटरनॅशनल, नारायणा इंटरनॅशनल, पोतदार इंटरनॅशनल, दशमेश ज्योत इंग्लिश स्कूल, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, आंध्र समिती हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल आदी शाळांतील जवळपास १० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.


********







‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

 ‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

१० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

नांदेड, दि. 21: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-की-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.


24 व 25  जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सूक्ष्म नियोजन

मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य व्यवस्थापन समिती गठीत करून वारंवार आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.


शासकीय-खाजगी आरोग्य यंत्रणांचा समन्वय

या नियोजनात जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड यांचा सहभाग आहे. यासोबतच नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न असलेली खाजगी रुग्णालयेही आरोग्य सेवा देणार आहेत.


कार्यक्रमस्थळी अत्याधुनिक आरोग्य सुविधा

मुख्य कार्यक्रमस्थळी दोन स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (OPD) उभारण्यात येणार असून, येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून पुढील सेवा दिल्या जाणार आहेत.

असंसर्गजन्य आजारांची तपासणी, कर्करोग व दंतरोग तपासणी, महिलांच्या आजारांची विशेष तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार तसेच तातडीची संदर्भ सेवा व २४ तास रुग्णवाहिका सुविधा,नेत्र तपासणी, मोफत चष्मे व ज्येष्ठांसाठी सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिरे, गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप तसेच तपासणीनंतर गरजू ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वितरण केले जाणार आहे.


मार्ग, पार्किंग व निवासस्थळी वैद्यकीय पथके

भाविकांच्या सोयीसाठी नांदेड शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग, वाहन पार्किंग क्षेत्रे, तसेच तात्पुरत्या निवासस्थळी वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे व रुग्णवाहिका सेवेत असणार येणार आहेत.


जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचा सपाटा

या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर सिकल सेल तपासणी, रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) तपासणी, क्षयरोग (टीबी) रुग्ण तपासणी, असंसर्गजन्य आजार तपासणी, बाल आरोग्य तपासणी (आर.के.एस.के.), आभा कार्ड नोंदणी, अशी विशेष आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहेत.


रुग्णालयांत विशेष राखीव खाटा

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, जिल्हा रुग्णालय नांदेड व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे विशेष राखीव खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.


तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील डॉ. जगदीश सकवान, डॉ. भूषण जैन व डॉ. रितेश पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आरोग्य व्यवस्थापन समितीस मिळत आहे.


लाखो भाविकांच्या आरोग्यासाठी प्रशासन सज्ज

हिंद-की-चादर शताब्दी समागमाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा प्रशासनाने उभारलेली ही आरोग्य व्यवस्था लोकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आदर्श व्यवस्था ठरणार आहे.

ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित

 हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम


ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर 

येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित


छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे.

एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे  गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय.


नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. देश विदेशातील भाविक याठिकाणी येणार आहे. त्याअनुषंगाने गुरु तेग बहादुर यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. 

याबाबत भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाराचे सदस्य सरदार हरिसिंग यांनी माहिती दिली. त्यानुसार, ‘जफर नामा’ म्हणजे विजयाचे पत्र. मुगल बादशाह औरंगजेब याने शिखांवर अनन्वित अत्याचार केले. त्याविरोधात हे एक प्राणांतिक आंदोलन होते. जिझिया करा द्वारे अन्य धर्मियांचे कर रुपात शोषण होत होते. त्यास प्रतिकार करणाऱ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागे. त्यासाठी गुरु तेग बहादुर यांनी आपल्या शिष्यांसह शहादत दिली. तो एक मोठा रोमांचक इतिहास आहे. शिखांची बलिदानाची परंपरा अधोरेखित करणारी ही घटना होय.

त्याच गुरु तेग बहादुर यांचे पुत्र गुरु गोविंदसिंह यांनी याबाबत औरंगजेबाला पत्र लिहिले. हे पत्र जफरनामा म्हणून प्रसिद्ध आहे.  या पत्राचे महत्त्व खूप आहे. हेच ते पत्र जे औरंगजेबाच्या कृत्यांची श्वेत पत्रिका म्हणूनही ओळखले जाते. हे पत्र वाचून औरंगजेबाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्यानंतर त्याने अन्याय अत्याचाराला चालना देणारे कायदे रद्द करण्याचे फर्मान जारी केले. या शिवाय गुरु गोविंदसिंगांना पकडण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. त्यांना त्रास देऊ नये त्यांना सहाय्य करावे, असेही हुकूम जारी केले. इतकेच नव्हे तर त्याने गुरु गोविंदसिंग यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र ही त्याची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.  कारण ही घटना इ.स. १७०७ मधिल आहे. हेच वर्ष औरंगजेबाच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष ठरले.

जफरनामा आणि छत्रपती संभाजीनगरचे अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. हे पत्र गुरु गोविंदसिंगांनी लिहिल्यानंतर ते औरंगजेब पर्यंत पोहोचवायचे होते. त्यावेळी औरंगजेब  मराठा साम्राज्याचा बिमोड करण्याच्या इच्छेने महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता. गुरु गोविंद सिंग यांचे दोन शिष्य भाई दयासिंग आणि भाई धरमसिंग हे पत्र घेऊन औरंगजेबाचे दक्षिणेतील महत्त्वाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला (त्यावेळचे औरंगाबाद) आले. येथे येऊन त्यांनी मुगल बादशाहच्या भेटीचा प्रयत्न केला. नेमका त्यावेळी औरंगजेब बादशाह अहिल्यानगर (त्यावेळचे अहमदनगर) मुक्कामी होता. या दोघां शिष्यांनी इथूनच अहमदनगरकडे कूच केले. औरंगजेबाला भेटून आपल्या गुरुंचे पत्र सुपूर्द केले.

फार्सी भाषेत व लिपीत हे पत्र छंदबद्ध काव्य पद्धतीने लिहिले आहे. त्यात शिखांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराचे वर्णन आहे आणि काहीही झाले तरी आम्ही अन्याय सहन करणार नाही असा निर्धारही आहे.एखाद्या संताने राज्यकर्त्याला खडे बोल सुनावले आहेत. हे पत्र अर्थात जफरनामा औरंगजेबाने वाचला. वाचून त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. आपल्या आयुष्याच्या अखेरीची चाहूल त्याला लागली होती. त्याने तात्काळ फर्मान जारी करुन सर्व अत्याचार थांबविण्याचे आदेश दिले.

हे पत्र शीख धर्माच्या पवित्र अशा दशमग्रंथ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.  आजही छत्रपती संभाजीनगरच्या धावणी मोहल्ला, शहागंज येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग या गुरुद्वाऱ्यात संग्रहित ठेवण्यात आले आहे. हे पत्र आजही पाहता येते. विशेष म्हणजे हाच गुरुद्वारा दक्षिण भारतातील पहिला गुरुद्वारा मानला जातो. देशभरातील भाविक येथे माथा टेकण्यासाठी आवर्जून येतात, अशी माहिती  या गुरुद्वाराचे सदस्य सरदार हरिसिंग यांनी दिली. 

०००००



विशेष वृत्त अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 


विशेष वृत्त


अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !


अहिल्यानगर, दि. २१ - नांदेड येथे 'हिंद की चादर' श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या पावन स्मृती पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' हे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामा' या निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.


इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या  तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होते, जे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यां' पैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजी' यांच्यावर सोपविली होती.


या ऐतिहासिक घटनेचे धागेदोरे थेट अहिल्यानगर शहराशी जोडलेले आहेत. श्री गुरु गोविंदसिंगजी महाराजांनी बादशहा औरंगजेबापर्यंत झफरनामा पोहोचविण्यासाठी भाई दया सिंगजी यांना पाठविले. भाई दया सिंगजी प्रथम औरंगाबाद येथे आले. तेथे त्यांना समजले की औरंगजेब हा अहमदनगरजवळील आलमगीर येथे आहे. त्यानुसार भाई दया सिंगजी अहमदनगर येथे आले; मात्र त्या वेळी त्यांना औरंगजेबाची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील धवणी महल्ला येथे मुक्काम करून प्रयत्न सुरू ठेवले.


सुमारे तीन ते चार महिने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर भाई दया सिंगजींना अहिल्यानगर येथे खुले दरबारात औरंगजेबाची भेट मिळाली व त्यांनी झफरनामा त्याच्यासमोर सादर केला. त्या काळी औरंगजेब अहमदनगरच्या भिंगार भागात छावणीत होता. त्या छावणीच्या बाहेरील मर्यादेत असलेल्या सध्याच्या गोविंदपुरा परिसरात (अहिल्यानगर) भाई दया सिंगजी, औरंगजेबाची भेट मिळावी व झफरनामा सादर करता यावा यासाठी  थांबले होते.


याच पवित्र भूमीवर, जी भाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झाली आहे, त्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख समाजाने श्रद्धेने व स्वखर्चाने करून आज ती जागा “गुरुद्वारा भाई दया सिंगजी साहिब, गोविंदपुरा, अहिल्यानगर” म्हणून ओळखली जाते.


गुरु गोविंदसिंगजींनी हे पत्र मूळ पर्शियन (फारसी) भाषेत लिहिले असून त्यात एकूण १११ कडवी (शेर) आहेत.'झफरनामा' म्हणजे केवळ एक पत्र नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेली नैतिक विजयाची ललकारी होती. या पत्रात गुरूजींनी चमकौरचे युद्ध, आपल्या पुत्रांचे बलिदान व औरंगजेबाच्या सैन्याने पवित्र कुराण पाठवुन दिलेले शब्द न पाळता केलेला विश्वासघात, यावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. याच पत्रात शीख इतिहासातील प्रसिद्ध ओळ नमूद आहे - कुन् कर अझ हमेह् हील्-ते दार गुज़श्त, हलाल अस्त बुर्दन बा शमशेर दस्त ||२२||


 जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये हो, न्याय का मार्ग अवरुद्ध हो, तब तलवार उठाना सही है" (जेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शांततेचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा हाती तलवार घेणे हेच उचित व धर्मसंमत ठरते). विशेष म्हणजे, भाई दया सिंगजींनी हे पत्र दिल्यावर खुद्द औरंगजेबाने त्याचा सकारात्मक स्वीकार केला होता व गुरूजींना सन्मानाने भेटीसाठी आमंत्रित करणारे शाही पत्र जारी केले होते, अशी साक्ष येथील इतिहास देतो.


भाई दया सिंगजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शीख समाजासाठी अत्यंत पवित्र असून, ती एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष देत उभी आहे. हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे व गुरु गोविंदसिंगजींच्या सर्वोच्च नीतिमत्तेचे प्रतीक आहे. हा अमूल्य ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.


***

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

 गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा


 * दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे*


नांदेड दि.२१ जानेवारी:- ‘हिंद दी चादर'

 श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने  'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरूनही २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी नांदेडसाठी  हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल .


चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी , भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल. 


मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचचा समावेश असेल.


 या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

०००००

'शहीदी समागमा'च्या जनजागृतीसाठी कुरुंदा येथे जागृती रथाचे आगमन

हिंगोली, दि.२१ (जिमाका): 'हिंद दी चादर' नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणा-या गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम तसेच गुरुनानक नाम लेवा संगत व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, या उद्देशाने जनजागृती रथ आज कुरुंदा येथे दाखल झाला.

यावेळी तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, बाबुराव शेवाळकर, संभाजीराव सिद्धेवार, अंबादास दळवी, शिवाजीराव इंगोले, डॉ. कैलास बारे, बाळासाहेब निगडकर, विनायक क्यादलवार, किशोर फेदराम, विनायक झिळे, छोटुसिंग राजपुरोहित, पांडुरंग शातलवार, प्रदीप मठपती तसेच महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनजागृती रथाच्या माध्यमातून पत्रकांचे वाटप व माहितीपर प्रतिमा सादर करून नांदेड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. दळवी गल्ली व छत्रपती संभाजीराजे चौक येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने चित्रफिती पाहून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

*****