27 February, 2026

 कॉपीमुक्त अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची परीक्षा केंद्रांना भेट


हिंगोली (जिमाका), दि. 27 : कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी हिंगोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल मल्टी पर्पज तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला या परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा तसेच परीक्षेची पारदर्शक व शिस्तबद्ध अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारची गैरप्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, सर्व संबंधितांनी जबाबदारीने आपली कर्तव्ये पार पाडावीत, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

******





विशेष लेख : हिंद की चादर - श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

 

ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे येत्या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य शासनाचे मंत्री उपसि्थत राहणार आहेत. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बाहदूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या मुख्य कार्यक्रमाला शीख सिकलीगर, बंजार, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजाचे धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला सर्व समुदायाला भाविक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जगभरातून 10 लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यादृष्टीने राज्य शासन, स्थानिक प्रशासनाची तयारी सुरु आहे. 

धर्म म्हणजे केवळ पूजा, विधी किंवा बाह्य आचार नाही. धर्म म्हणजे सत्य, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य. जेव्हा धर्माच्या नावाखाली लोकांवर जबरदस्ती, भय आणि अत्याचार लादले जातात, तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध उभे राहणारा व्यक्तीच खरा धार्मिक गुरु ठरतो. अशाच धर्मभावनेचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे सिख धर्माचे नववे गुरु – श्री गुरु तेग बहादुरजी.

गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतःचा धर्म जपत इतरांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी कोणतीही सत्ता, वापरली नाही परंतु सत्य आणि निर्भयतेच्या बळावर अत्याचाराला आव्हान दिले. म्हणूनच इतिहासाने त्यांना ‘हिंद की चादर’ असे गौरवाने संबोधले. ‘हिंद की चादर’ म्हणजे अशी चादर, जी संकटाच्या वेळी संपूर्ण समाजाला संरक्षण देते. गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतः संकटात उभे राहून बलिदान देऊन इतरांना वाचवले. त्यांचे जीवन, विचार आणि बलिदान हे आजही मानवतेसाठी मार्गदर्शक आहेत.


गुरु तेग बहादुरजी यांचा जन्म आणि जीवन

श्री गुरु तेग बहादुरजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे सिख गुरु गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे पुत्र होते व शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंगजी चे वडील होते . लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, गंभीर आणि विचारशील होता. त्यांनी शस्त्रविद्या तसेच धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण घेतले.  ‘तेग’ म्हणजे तलवार आणि ‘बहादुर’ म्हणजे शूर. युद्धकौशल्य असूनही त्यांचे मन ध्यान, साधना आणि आत्मचिंतनात अधिक रमले होते. त्यांनी अनेक वर्षे एकांतात साधना केली आणि जीवनाचे खरे तत्त्व समजून घेतले. इ.स. १६६४ मध्ये ते सिखांचे नववे गुरु झाले. गुरुपद स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध प्रदेशांत प्रवास करून लोकांना सत्य, समानता, निर्भयता आणि ईश्वरभक्तीचा संदेश दिला.


औरंगजेबाचा काळ आणि धार्मिक अत्याचार

गुरु तेग बहादुरजी यांचा काळ मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीचा होता. या काळात धर्माच्या नावाखाली अनेक अत्याचार झाले. लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते. मंदिरे तोडली जात होती आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः काश्मीरमधील हिंदू पंडितांवर फार मोठे अत्याचार झाले. त्यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवले गेले—धर्मांतर करा किंवा मृत्यू स्वीकारा.

काश्मिरी पंडितांची हाक आणि गुरुजींचा निर्णय

या अन्यायाने त्रस्त झालेल्या काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ आनंदपूर साहिब येथे गुरु तेग बहादुरजी यांच्याकडे आले. त्यांनी आपली वेदना आणि संकट गुरुजींसमोर मांडले. गुरु तेग बहादुरजी यांनी शांतपणे सर्व ऐकले. धर्मरक्षणासाठी बलिदान देणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यांनी औरंगजेबाला या विरोधात संदेश पाठवला.

अटक, यातना आणि बलिदान

गुरु तेग बहादुरजी यांना दिल्लीला बोलावण्यात आले; परंतु मार्गातच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांच्या तीन शिष्यांनाही कैद करण्यात आले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालदास. या शिष्यांवर भयानक अत्याचार करण्यात आले, तरीही त्यांनी धर्म सोडला नाही. अखेर ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादुरजी यांचे शिरच्छेद करण्यात आला.  त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण धर्मांतर स्वीकारले नाही.

‘हिंद की चादर’ – अर्थ

‘चादर’ म्हणजे संरक्षण देणारे आच्छादन. गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतःवर संकट ओढवून घेऊन संपूर्ण हिंदू समाजाला जबरदस्तीच्या धर्मांतरापासून वाचवले. त्यांनी इतरांच्या धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले. म्हणूनच त्यांना “हिंद की चादर” म्हटले जाते. येथील ‘हिंद’ हा शब्द केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून, तो भारतीय जीवनमूल्ये आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

गुरु तेग बहादुरजी यांचे तत्त्वज्ञान

वैराग्य - जगातील संपत्ती, सत्ता आणि देह नश्वर आहेत. त्यांच्याशी आसक्त न होता जगणे म्हणजे खरे वैराग्य.

निर्भयता - भयमुक्त जीवन हेच श्रेष्ठ जीवन आहे. जो माणूस सुख-दु:ख समान मानतो, तोच खरा स्थिर असतो.

खरा धर्म - धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, तर सत्यासाठी उभे राहणे. अन्याय पाहून गप्प बसणे हा अधर्म आहे.

गुरु ग्रंथ साहिबमधील निवडक श्लोक

१. “भय काहू को देत नहिं, नहिं भय मानत आन।”

अर्थ: जो कुणाला घाबरवत नाही आणि स्वतःही कुणाची भीती बाळगत नाही, तोच खरा महान आहे.

२. “सुख दुःख दोनउ सम करि जानै।”

अर्थ: जो सुख आणि दुःख समान मानतो, तोच जीवनाचे खरे ज्ञान जाणतो. 

---

श्री गुरु तेग बहादुरजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मासाठी नव्हते, तर धर्मस्वातंत्र्यासाठी होते. त्यांनी सिद्ध करून दाखवले की खरा धर्म हा मानवतेवर आधारलेला असतो. म्हणूनच ते ‘हिंद की चादर’ ठरले. आजही त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की सत्यासाठी उभे राहणे कठीण असते, पण तेच योग्य असते. गुरु तेग बहादुरजी यांनी मानवतेवर पांघरलेली ही चादर आजही आपल्याला निर्भय, सत्यनिष्ठ आणि सहिष्णु राहण्याची प्रेरणा देते. 


- हरपालसिंह सेठी

- लेखक हे लोकमत टाईम्स हिंगोली येथे जिल्हा प्रतिनिधी आहेत.

****** 




 पोलीस पाटील भरती 2026 चा निकाल जाहीर 

* तात्पुरती निवड यादी 2 मार्च रोजी प्रसिद्ध होणार


हिंगोली (जिमाका), दि. 27 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागांतील पोलीस पाटील भरती 2026 प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या भरतीची लेखी परीक्षा दि. 08 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडल्या.

मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दि. 02 मार्च 2026 रोजी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती पोलीस पाटील निवडीच्या नावाखाली पैशांची मागणी करत असल्यास किंवा खोटी आश्वासने देत असल्यास ते दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ 8584088584 किंवा 02456-221701 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींवर तसेच अशा कृत्यात सहभागी उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व उमेदवारांनी सतर्क राहावे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी योगेश मीना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

******

 विविध कर्ज योजनांची प्रकरणे बँकानी तात्काळ पूर्ण करावेत- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली जिल्ह्याच्या पोटेन्शियल लिंक्ड प्लॅनचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन


हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील सर्व बँकांच्या विविध शासकीय कर्ज योजनांअंतर्गत कामगिरीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजना तसेच दुग्ध व्यवसाय कर्ज योजनेअंतर्गत प्रकरणांची स्थिती, मंजुरी व वितरित कर्ज यांचा आढावा घेऊन विविध कर्ज योजनांची प्रकरणे तात्काळ निकाली काढून उद्दिष्टे लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. 

हिंगोली जिल्ह्याची बँकर्स जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय पुनरावलोकन समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे, जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, आरसेटी संचालक हेनराज बन्सोड, एमएसआरएलएमचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये योजनांच्या अंमलबजावणीत गती आणण्याबाबत तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित बँकांना दिल्या. तसेच ठरविण्यात आलेली उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

या बैठकीदरम्यान हिंगोली जिल्ह्याचा पोटेन्शियल लिंक्ड प्लॅन (PLP) 2026-27 अधिकृतरित्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या या दस्तावेजाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

प्रकाशित करण्यात आलेला पोटेन्शियल लिंक्ड प्लॅन 2026-27 हा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील पतक्षमतेचा सखोल आढावा घेणारा असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी बँकांना मार्गदर्शन करणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

****** 



26 February, 2026



श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन

*शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज– कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार– राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक

      

मुंबई दि. २६ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय  समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी  ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८, विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था, २५ हजार भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक,  स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.

            तसेच आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी ३०० पेक्षा अधिक असणार आहेत. तात्पुरती वैद्यकीय केंद्रे १५ पेक्षा अधिक, तात्पुरते एक आयसीयू केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. राखीव खाटा (जवळील रुग्णालये)  ३५०, तर नजीकच्या रूग्णालयात राखीव आयसीयू खाटा ७५उपलब्ध आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमात १० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


*शहिदी समागमाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन*

*राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक*

राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की,  'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभाग व शहिदी समागम राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथे भव्य शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिग सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तामीळनाडू येथील भाजपा नेते अण्णामलाई, योग गुरु बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दीदी मा साध्वो ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत. 

तसेच शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संप्रदाय या समाजातील संत आणि रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी नगर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शौर्य, धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि न्यायमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची संपुर्ण माहिती https://gurutegbahadurshahidi.com/home  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००




 पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली, दि.२६ (जिमाका): पी एम सूर्यघर मोफत वीज या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत‌ दिले. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जा व महावितरण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.

 महाऊर्जा विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या पी एम सूर्यघर मोफत वीज योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींवर पारेषण सलग्न सौर ऊर्जा संच बसविण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येत असलेल्या तांत्रिक अडचणी, पारेषण यंत्रणेशी समन्वय, वीज जोडणी प्रक्रिया आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड व महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र मुंगारे यांना सदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दोन्ही विभागांनी परस्पर समन्वय साधून येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात व योजनेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या बैठकीमुळे जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढीस लागून ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

***** 



 जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा व सकस आहार सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न



हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा व सकस आहार सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रतिनिधी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अन्न सुरक्षेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अन्न आस्थापनांची तपासणी, अन्न नमुना संकलनाची कार्यवाही तसेच परवाना व नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गर्दीच्या हॉटेल्स व मिठाई दुकानांमध्ये अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी व नमुना संकलनाचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अन्न व्यवसायिकांनी परवाना व नोंदणी घेण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी व आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. 


*******