25 March, 2026

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी रोजगार मेळावा

 


हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने शुक्रवार, (दि. 27) रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात पैनगंगा इंटरनेशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कन्हेरगाव नाका, खंडेलवाल ज्वेलर्स, हिंगोली तसेच संकल्प जॉब प्लेसमेंट, हिंगोली या आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, डी.एड., बी.एड., एम.एड., पदवी व पदवीधर पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह शुक्रवार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे.

या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02456-224574 किंवा 7385924589 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. 

******

24 March, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आरोग्य विभागाचा आढावा

  

हिंगोली(जिमाका), दि. 24 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आरोग्य विभागाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. विशाल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे तसेच जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी 15 व्या वित्त आयोगांतर्गत आर्थिक कामकाजाचा लेखाजोखा तपासला. तसेच विविध आरोग्यविषयक बांधकामांचा आढावा घेत कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेत, पालकांचे समुपदेशन करून लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उपस्थितांना ‘टीबी मुक्त’ भारताची शपथ दिली तसेच ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत 100 दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

****** 




आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 24 :  कामाची पावती म्हणून ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातोय याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज येथे केले.

येथील षटकोणी सभागृहात ग्रामपंचायत विभागामार्फत उत्कृष्ट व आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड उपशिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह गटविकास अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामसेवकांनी गाव पातळीवर चांगल्या सेवा दिल्यास वेळेत लोकांची कामे पूर्ण केल्यास लोकांच्या तक्रारी आपोआप कमी होतात असे श्री. गायकवाड यावेळी म्हणाले. ग्रामपंचायत पातळीवर काम करत असताना आपण आपले काम प्रामाणिकपणे व लोकांना समाधान मिळेल, असे काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले असून 23 मार्चपासून वंदे मातरम गीताबाबत ग्रामपंचायत,शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम स्तरावरील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व्हाट्सअप चॅटबोटसह अंतर विभागीय समन्वय पोर्टल विकसित करण्यात आले  असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले.

हिंगोली मध्ये हळदीच्या उत्पादनाला बचत गटाच्या माध्यमातून पिवळे सोनं म्हणून प्रोडक्शन केले आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी  केशव गडापोड यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लक्ष्मीकांत क्षीरसागर व दत्ता वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी  व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         ****** 



अंतर विभागीय समन्वय पोर्टल व व्हॉट्सॲप चॅटबोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रारंभ

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून अंतर विभागीय समन्वय पोर्टल व व्हॉट्सॲप चॅटबोट सेवेचा आज प्रारंभ येथील षटकोनी सभागृहात करण्यात आला.

अंतर विभागीय समन्वय पोर्टल हे तालुकास्तर व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या, मागणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विकसीत करण्यात आले.        

ग्रामस्तरावरील अधिकारी ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, मुख्याध्यापक, आरोग्य सहायक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना तर अधिकारी गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, गट शिक्षणधिकारी यांना आणि जिल्हास्तरावरील अधिकारी संबंधित विभाग प्रमुखांना फायदा होणार आहे.

 

व्हॉट्सॲप चॅटबोट नागरिकांसाठी

जिल्हा परिषद हिंगोलीचे व्हॉट्सॲप चॅटबोट विकसित करण्यात आले असून, यामध्ये नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजना व सोयी सुविधा घरबसल्या मिळाव्यात, यासाठी 8080467614 या व्हॉट्स‌ अँप क्रमांकावर उपलब्ध राहतील.

या मध्ये प्रमुख्याने जिल्हा परिषदेबद्दल इत्यंभूत माहिती तसेच केंद्र, राज्य‌ शासन पुरस्कृत योजना, जि प सेस योजनांची संपूर्ण माहिती सोप्या पध्दतीने मिळू शकेल.

            या व्हॉट्सॲप चॅटबोटचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

******

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी गावागावात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील पानकन्हेरगाव, ताकतोडा, केंद्रा बु., वलाना, माझोड, जामठी बु., गोरेगाव, खुडज, पुसेगाव, बाभुळगाव, चोंढी खुर्द, सुरजखेडा, सवना  आदी  गावामध्ये  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******   








आगामी खरीप हंगामात केव्हीके तोंडापूर ‘ड्रोन हब’ * नरचर एरोस्पेससोबत सामंजस्य करार

   


हिंगोली (जिमाका), दि. २४ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), तोंडापूर व नरचर एरोस्पेस (ड्रोन निर्मिती संस्था) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, आगामी खरीप हंगामात केव्हीके तोंडापूर हे जिल्ह्याचे ‘ड्रोन हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित केव्हीके तोंडापूरकडून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे व शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या करारामुळे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीतील फवारणी अधिक अचूक व परिणामकारक होणार असून, मजुरीवरील खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर थेट फवारणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात ड्रोन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

आगामी खरीप हंगामात कीड व रोग नियंत्रणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आधुनिक शेतीला चालना मिळून उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याबाबत बोलताना वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी सांगितले की, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणे व शेती अधिक कार्यक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीला नवी दिशा मिळेल.

या प्रसंगी नरचर एरोस्पेसचे प्रतिनिधी आदित्य तकते, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ राजेश भालेराव (कृषि विद्या), अजयकुमार सुगावे (पिक संरक्षण), डॉ. अतुल मुराई (कृषि विस्तार), साईनाथ खरात, डॉ. कैलास गीते तसेच केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

***** 



मतदार मॅपिंग कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा


हिंगोली (जिमाका), दि. २४ : आगामी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2026 कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील मतदार यादीतील मतदारांचे सन २००२ मधील मतदारांशी मॅपिंग तसेच मॅपिंगच्या प्रगतीबाबत आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. 


भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार मॅपिंगचे काम दि. २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ९२-वसमत विधानसभा मतदारसंघात ८०.२८ टक्के, ९३-कळमनुरीमध्ये ७८.८७ टक्के तर ९४-हिंगोलीमध्ये ७४.३७ टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून जिल्ह्याचा एकूण प्रगतीदर ७७.८० टक्के आहे.

मतदार मॅपिंगचे काम गतिमान करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी टेबल-टाॅप अँक्टिव्हिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व पडताळणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, ५५ टक्क्यांपेक्षा कमी प्रगती असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी एसआयआर-2026 च्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करून मतदार मॅपिंगचे काम दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आल्या.

सन २००२ व सन २०२४ च्या मतदार यादीतील नोंदींचे मॅपिंग सुलभ व्हावे यासाठी नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती, विशेषतः विवाहित महिलांनी माहेरच्या कुटुंबाची माहिती, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मतदारांना केले आहे.

***