23 December, 2025

हिंगोलीतील स्मार्ट प्रकल्पाला जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन साधला संवाद

हिंगोली (जिमाका), दि.23 : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना जागतिक पातळीवरील मान्यता मिळत असून, याच अनुषंगाने जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पाच्या विविध घटकांना भेट देऊन शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी श्री फाळेश्वर महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., फाळेगाव ता. जि. हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रास त्यांनी भेट दिली. या केंद्रामार्फत मंगळवारपर्यंत सुमारे 8 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून अंदाजे 3 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट हिंगोली कार्यालयातील नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ जी. एच. कच्छवे, अर्थशास्त्र तज्ज्ञ जितेश नालट, कंपनीचे संचालक मारोती वैद्य तसेच इतर संचालक उपस्थित होते. जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी उपस्थित संचालकांना प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील संधी, बाजारपेठ विस्तार आणि मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., कळमनुरी येथे भेट देऊन हळद काढणीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंतच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे संचालक गंगाधर रिंगारे यांनी कंपनीमार्फत आतापर्यंत सुमारे 50 हजार मेट्रिक टन हळदीची निर्यात करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच जागतिक बँकेच्या सल्लागारांनी हरिद्रा हळद संशोधन केंद्र, वसमत येथेही भेट देऊन संशोधन, प्रक्रिया व निर्यातवृद्धीसंदर्भात मार्गदर्शन केले. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, बाजारपेठेशी थेट जोडणी आणि कृषी व्यवसायाचे सक्षमीकरण साध्य होत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. **

No comments: