22 December, 2025

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 22: जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे जवळा खंदारबन येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे या व्याख्याते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी बालविवाहाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जिल्हास्तरावरील यंत्रणा, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच महिला व बाल कल्याण विभाग यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घडवून बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली. महिला सबलीकरण व बालविवाह ही एक सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना श्रीमती. कोरडे यांनी महिलांची समाजातील भूमिका, त्यांचे अधिकार, महिला सबलीकरणाची गरज आणि अंतर्गत असमानतेवर मात करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सक्षम महिला घडल्यास समाज सक्षम होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यासोबतच बालविवाह, त्याची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. बालविवाह प्रतिबंधासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. बालकांसाठी तात्काळ मदत करणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईन 1098 व पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती देण्याचे आवाहन चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी केले. माहिती देणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता राखली जाते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, दत्तक विधान, अनाथ प्रमाणपत्र याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. भोईवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत गावंडे महिला सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.स्वाती पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी रावसाहेब कल्याणकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. समीक्षा कदम यांच्यासह प्राध्यापकवृंद, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

No comments: