30 September, 2019

नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून सांगा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन


नागरिकांना मतदानाचे
महत्व पटवून सांगा

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन



हिंगोली,दि.30: निर्भय आणि मुक्तपणे मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा. मतदानाचे महत्व समजावून सांगा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
जिल्हा स्वीप समितीच्या वतीने जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची मतदार जागृती बाबत कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक आणि प्राचार्यांना वरीलप्रमाणे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. प्रवीणकुमार घुले, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीपच्या समन्वय अधिकारी रेणुका तम्मलवार, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेष फडसे आदि उपस्थित होते. कार्यशाळेत सुमारे बाराशे प्राचार्य, शिक्षक सहभागी झाले होते.
श्री. जयवंशी यांनी सांगितले की, प्रत्येक मत महत्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा पवित्र असा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजावून प्रत्येक नागरिकांने लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे.
शिक्षक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून पालकांचे संकल्पपत्र लिहून घ्यावे. या संकल्पपत्राव्दारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्याव्दारे पालकांमध्ये जनजागृती होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. जयवंशी यांनी केले.
यावेळी नवमतदार, महिला आणि दिव्यांग मतदारांचे मतदान वाढावे यावर भर दिला आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान करणे सोयिस्कर व्हावे यासाठी प्रशासन मदत करेल, असेही श्री. जयवंशी यांनी सांगितले.
स्वीप समितीच्या सदस्य सचिव रेणुका तम्मलवार यांनी सांगितले की मतदान प्रक्रियेत शिक्षक आणि प्राचार्यांनी पुढाकार घेऊन काम करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
कार्यशाळेचे नियोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे, डायटचे अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी केले.

*****

No comments: