18 October, 2026

पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजाखासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासांची सवलत

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- भारत निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या सुधारित पत्रानुसार, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,‌अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३५ ब नुसार ही भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष रजा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. ही रजा केवळ संबंधित मतदारसंघातील मतदार असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू असणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील, याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

दरम्यान, ही विशेष नैमित्तिक रजा खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. मात्र, मतदान केंद्रांचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवासाचा वेळ लक्षात घेता, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.

००००

सावधान ! पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत समाजमाध्यमांवरील प्रचारावर एमसीएमसीची नजर; आक्षेपार्ह मजकूर, खोट्या बातम्या आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

राजकीय जाहिरातींच्या पूर्वप्रमाणीकरण आवश्यक
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ :- छत्रपती संभाजीनगर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणारा प्रचारमजकूर, राजकीय जाहिराती आणि पेड न्यूजच्या संशयास्पद प्रकरणांवर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते.

 त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूब, ब्लॉग तसेच व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांवरून माहिती वेगाने प्रसारित होते. मात्र,एमसीएमसी समितीकडून परवानगी न घेता हे करू नये.

 खातरजमा न केलेली माहिती, खोट्या बातम्या किंवा दिशाभूल करणारा मजकूर यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर, द्वेषपूर्ण संदेश, धमकीवजा पोस्ट आणि शांतता भंग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सामग्रीचे प्रसारण टाळणे आवश्यक आहे.

 *उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?* 

विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहभागी उमेदवारांनी पुढील बाबींचे काटेकोर पालन करावे.


 *राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण*

 समाजमाध्यमांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी लागू नियमांनुसार संबंधित एमसीएमसीकडून पूर्वप्रमाणीकरण करून घ्यावे.
खात्रीशीर माहितीच प्रसारित करा.

 कोणतीही बातमी, छायाचित्र, व्हिडिओ अथवा संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये.

जातीय व धार्मिक तेढ टाळा: जात, धर्म, भाषा अथवा अन्य संवेदनशील मुद्द्यांच्या आधारे समाजात वैमनस्य निर्माण होईल, अशा स्वरूपाचा प्रचार करू नये.
निवडणूक खर्चाची नोंद ठेवा: समाजमाध्यमांवरील जाहिराती, प्रचारासाठी तयार केलेला मजकूर, डिजिटल सामग्री आणि संबंधित सेवांवर झालेला लागू खर्च नियमानुसार निवडणूक खर्चात समाविष्ट करावा.
मतदानापूर्वीच्या निर्बंधांचे पालन: मतदान समाप्त होण्यापूर्वीच्या ४८ तासांच्या प्रतिबंधित कालावधीत प्रचारासंबंधी लागू असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.

 *एमसीएमसीची कार्यपद्धती काय?* 
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती ही निवडणूक प्रक्रियेत माध्यमांशी संबंधित नियमांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. समितीची प्रमुख कामे पुढीलप्रमाणे आहेत.
१. राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण : लागू नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इंटरनेट संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींचे प्रकाशन किंवा प्रसारणापूर्वी प्रमाणिकरण करणे.
२. माध्यमांचे संनियंत्रण : निवडणूक प्रचाराशी संबंधित प्रसिद्धीचे निरीक्षण करून लागू नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास निर्धारित प्रक्रियेनुसार कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणे.
३. पेड न्यूजवर लक्ष : मोबदल्याच्या बदल्यात बातमी किंवा विश्लेषण प्रसिद्ध झाल्याचा संशय असल्यास संबंधित प्रकरणाची छाननी करणे. आवश्यक पुरावे व नोंदींच्या आधारे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण सादर करणे.
४. निवडणूक खर्चाची नोंद : उमेदवारांच्या प्रचारजाहिरातींवरील खर्च आणि पेड न्यूज म्हणून निश्चित झालेल्या प्रकरणांतील लागू खर्चाची नोंद घेऊन संबंधित निवडणूक यंत्रणेला अहवाल सादर करणे.
५. नियमभंगाच्या प्रकरणांचा पाठपुरावा : आचारसंहितेचा भंग, दिशाभूल करणारी माहिती किंवा इतर आक्षेपार्ह सामग्रीसंबंधी प्राप्त तक्रारींची निर्धारित प्रक्रियेनुसार छाननी करून संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे.
नागरिकांनीही जबाबदारीने वागावे
समाजमाध्यमांवरील प्रत्येक संदेश सत्य असेलच असे नाही. त्यामुळे अप्रमाणित बातम्या, जुनी छायाचित्रे नव्या घटनांच्या नावाखाली प्रसारित करणे, बनावट व्हिडिओ किंवा दिशाभूल करणारे संदेश पुढे पाठवणे टाळावे. व्हॉट्सॲप समूहांच्या प्रशासकांनीही समूहात प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या सामग्रीबाबत दक्ष राहावे.
निवडणुकीच्या काळात केवळ समाजमाध्यमांवर मजकूर प्रसारित झाला म्हणून प्रत्येक प्रकरणात आपोआप गुन्हा दाखल होतो, असे नाही. संबंधित सामग्रीचे स्वरूप, लागू कायदे, आचारसंहितेतील तरतुदी आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे सक्षम यंत्रणा निर्णय घेते. मात्र, कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित नियमांनुसार कारवाई होऊ शकते.

लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी उमेदवारांनी जबाबदार प्रचार करावा आणि नागरिकांनी माहितीची सत्यता तपासूनच ती प्रसारित करावी. समाजमाध्यमांचा सुजाण वापर, आचारसंहितेचे पालन आणि पारदर्शक प्रचार ही निष्पक्ष निवडणुकीची महत्त्वाची सूत्रे आहेत.

******

17 October, 2026

जिल्ह्यातील ८७५ शाळांचा पुस्तकदान उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

⏺️ जिल्ह्यात एकूण १८ हजार ९८१ पुस्तकांचे संकलन करून वितरीत 
⏺️ सेवा संकल्प अभियानातील अभिनव उपक्रम 
हिंगोली, दि. १७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व ८७५ जिल्हा परिषद शाळांमध्ये पुस्तकदान हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या उपक्रमातून जिल्ह्यात एकूण १८ हजार ९८१ पुस्तकांचे संकलन करून वितरण करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील शाळांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. या उपक्रमात वसमत तालुक्यातून सर्वाधिक सहा हजार २०३ पुस्तके जमा झाली. हिंगोली तालुक्यातून चार हजार ३९९, कळमनुरीतून तीन हजार ५८५, सेनगावमधून दोन हजार ७६७, तर औंढा नागनाथ तालुक्यातून दोन हजार २७ पुस्तकांचे संकलन करून वितरीत झाली आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि लोकसहभागातून शैक्षणिक वातावरण समृद्ध करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाचे यश अधोरेखित करतो, असेही  गायकवाड म्हणाले.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

तोष्णीवाल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार
हिंगोली १७ ऑक्टोबर (जिमाका) : सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, येलदरी कॅम्पचे अध्यक्ष बी. आर. तोष्णीवाल होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपस्थित होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा एकसिंगे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रमणजी तोष्णीवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर. ए. जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एस. गोरे, पालक प्रतिनिधी शंकरराव तुकाराम नानवटी व प्रतिभा लिंबाजी कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. तळणीकर यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम, सामाजिक उपक्रम तसेच सनदी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांची माहिती दिली. प्रा. टी. यू. केंद्रे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

इंटरनेटवरील माहितीचा योग्य वापर करून अभ्यासाचे नियोजन करा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्यावा आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा योग्य वापर करावा. उपलब्ध पुस्तके व अभ्याससाहित्याच्या मदतीने नियोजनबद्ध अभ्यास केल्यास ध्येय गाठणे सोपे होते. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी संगणक प्रोग्रामिंगसारखी कौशल्येही आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात बी. आर. तोष्णीवाल यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पोलीस भरतीपुरते मर्यादित न राहता भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांसारख्या उच्च पदांचे ध्येय ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांची तयारी करावी. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जागरूक राहून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शंकर पजई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हिंगोलीतील डोंगरकडा, फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

डोंगरकडाला ९३.५१ टक्के, तर फाळेगावला ९५.४१ टक्के गुण
हिंगोली, दि. १७ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा आणि फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील बाह्य मूल्यांकनात डोंगरकडा आरोग्य केंद्राला ९३.५१ टक्के, तर फाळेगाव आरोग्य केंद्राला ९५.४१ टक्के गुण मिळाले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राने (NHSRC) १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे या मानांकनाची पुष्टी केली आहे. दोन्ही आरोग्य केंद्रांतील सहा विभागांचे मूल्यांकन करण्यात आले. निर्धारित गुणवत्ता निकष पूर्ण केल्यामुळे या केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

आरोग्य सेवांची गुणवत्ता, स्वच्छता आणि व्यवस्थापनाचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांना या यशामुळे मान्यता मिळाली आहे. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सांगितले. 

मानांकन प्राप्त आरोग्य केंद्रांनी मूल्यांकनात सुचविलेल्या सुधारणांवर कार्यवाही करून कृती आराखडा सादर करणे आवश्यक आहे. तसेच, आरोग्य सेवांचा दर्जा कायम राखण्यासाठी नियमित देखरेख आणि संनियंत्रण लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले असल्याचेही डॉ. शेळके यांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान उपक्रम

शाळांची ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी लोकसहभाग; मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची राहुली खुर्द शाळेला भेट
हिंगोली, दि. १७ (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांमधील ग्रंथालये समृद्ध करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे.
        या उपक्रमांतर्गत राहुली खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी
शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना बाराखडी तसेच इंग्रजी व्याकरणातील काळ (टेन्सेस) यासंदर्भात प्रश्न विचारून त्यांच्या भाषिक ज्ञानाची व आकलन क्षमतेची चाचणी घेतली.
        सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून पुस्तके जमा करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभागातून शाळांची ग्रंथालये समृद्ध होण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

सालेगाव शाळेत पुस्तकदान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभात फेरीतून जनजागृती; शिक्षक राजकुमार उंडगे यांच्याकडून ६२ पुस्तकांचे दान
हिंगोली, दि. १७ (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकदान अभियान राबविण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालय समृद्ध व्हावे आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पुस्तकदानाचे महत्त्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळेच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीद्वारे गावकऱ्यांना शाळेसाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला प्रतिसाद देत शाळेतील शिक्षक राजकुमार उंडगे यांनी शाळेला ६२ पुस्तके दान केली. तसेच इतर शिक्षक आणि ग्रामस्थांनीही पुस्तकदान करून या उपक्रमात योगदान दिले.
लोकसहभागातून शाळेचे ग्रंथालय अधिक समृद्ध करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुस्तकदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून शाळा आणि समाज यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होत आहे.