• पशुधनाचे आरोग्य संरक्षण व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ राज्यभर युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून, निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्यासाठी विभागाने सर्वंकष व काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये घटसर्प व फऱ्या यांसारख्या घातक आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय असल्याने राज्यभर लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लसीकरण मोहिमेअंतर्गत लसींची गुणवत्ता व परिणामकारकता अबाधित राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यस्तरापासून ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय उपकेंद्रांपर्यंत लसींची वाहतूक करताना आवश्यक तापमान राखण्यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर करण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली असून, ही पथके गावागावांत तसेच गोठ्यांपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लसीकरणाची सेवा देत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण राहू नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या काळात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांचे वेळेत लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे संभाव्य रोगप्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment