30 April, 2026

मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम


‘युआयडीएआय’चे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 30: आधार कार्डमधील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत.

महाराष्ट्र दिनी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल रहिवाशांना माहिती देण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयांना 'डिस्प्ले स्टँडी' वितरित करण्यात येत आहेत. विशेषतः 1 मे रोजीच्या ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यात विशेष 'एमबीयू' शिबिरे आयोजित केली जाणार असून, या ठिकाणी स्टँडीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.

शाळा आणि शासकीय कार्यालयांत ही केवळ 1 मे पुरती निरंतर जनजागृती मर्यादित न राहता, ही मोहीम निरंतर राबवण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर या माहितीपर स्टँडीजचा वापर स्थानिक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. ही अडचण टाळण्यासाठी जिल्ह्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

स्वाधार ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी मंगळवारपर्यंत मुदत

 



हिंगोली (जिमाका), दि. 30: शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर केलेल्या ऑनलाईन अर्जांची नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 147 अर्ज विद्यार्थी लॉगिनवर त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अर्जांची ऑनलाईन त्रुटी पूर्तता करण्यासाठी रविवार, दि.5 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधा अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.


संबंधित विद्यार्थ्यांनी 05 मे 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

****

आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

 


• तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध


हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४२३ रिक्त केंद्रे अशा एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दि.०२ जानेवारी २०२६ अखेर एकूण ३ हजार १०१ अर्ज प्राप्त झाले.

प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १ हजार ८६१ उमेदवारांच्या दि.३ ते दि.१२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर दि.०१ मार्च २०२६ रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या अंतरिम गुणवत्ता यादीवर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी दि.११ ते दि.१३ मार्च २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

या कालावधीत १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. त्यानुसार पात्र गुणदान करण्यात आले. तसेच तात्पुरत्या निवड यादीवरील ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्तेच्या आधारे न्यायनिर्णय करण्यात आला. यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात बदल होऊन दि.१७ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम गुणवत्ता यादीवर पुन्हा उमेदवारांकडून दि.२० ते दि.२२ एप्रिल या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत प्राप्त झालेल्या २५ हरकतींची सुनावणी करून त्यावरील निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात आला. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीत काही अंशतः बदल करण्यात आले असून सुधारित अंतिम गुणवत्ता यादी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.

तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी खालील वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

कागदपत्र पडताळणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उमेदवारांनी ४ मे २०२६ रोजी, वसमत तालुका दि.०५ मे रोजी,  

हिंगोली (शहरी व ग्रामीण) दि.०६ मे रोजी, *सेनगाव दि.०७ मे रोजी आणि  कळमनुरी तालुक्यातील उमेदवारांनी दि.०८ मे २०२६ रोजी* पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित व स्वसाक्षांकित दोन प्रती, अलीकडील तीन रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे तसेच आपले सरकार सेवा केंद्र स्वीकारण्याबाबतचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. यानंतर शासनाकडे युजरनेम व पासवर्ड मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक साक्षांकन नमुना व अग्रिम रक्कम भरण्याबाबत संबंधितांना यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

*****

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता





हिंगोली (जिमाका), दि.30: जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी, महापूर आदी आपत्तींचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देत आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.   

या  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगर परिषद, अग्निशमन विभाग, जलसंधारण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले की, महसूल व पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या संपर्क क्रमांकांची अद्ययावत माहिती तयार ठेवावी. कृषि विभागाने संभाव्य महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा सज्ज ठेवावी. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडेवारीत एकवाक्यता ठेवावी, जेणेकरून नुकसानीचा अचूक अंदाज येईल. जिल्ह्यातील कालवे, साठवण तलाव, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधकामे तसेच नद्यांवरील केटीवेअर यांच्या दुरुस्तीबाबतची माहिती तात्काळ सादर करून कालवे व तलाव दुरुस्तीची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुपता यांनी दिले. 

पूरप्रवण 70 गावांतील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याच्या सूचना देत, पावसाळ्यात महापुराचा धोका असलेल्या गावांमध्ये दवंडीव्दारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. गावांना पाण्याचा वेढा पडल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती उपलब्ध ठेवावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक असलेली दिनदर्शिका तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. कुशल जलतरणपटूंची संपर्क यादी तयार ठेवावी. आरोग्य विभागाने डॉक्टरांची उपलब्धता, संपर्क क्रमांक व प्रथमोपचार पेट्यांची तयारी ठेवावी. गटविकास अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तात्काळ देखभाल व दुरुस्ती करून आठवड्याभरात अहवाल सादर करावा. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण आवश्यक असलेल्या ठिकाणांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, त्यानंतर जिल्हा प्रशासन त्यास मान्यता देईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना व प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महापुरात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तयार ठेवावी तसेच नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. राज्य राखीव पोलीस दलाने सतर्क राहावे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपत्ती काळात आवश्यक उपकरणे व वाहनांची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. 

*****

29 April, 2026

पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. २९ : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 


***

पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर




हिंगोली (जिमाका), दि. २९ : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 


*******

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट

 

·         वसतिगृह, भोजनालयाची पाहणी ; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांनी आज वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यानंतर त्यांनी  विद्यालयातील भोजनालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. भोजनाची  गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळापत्रकानुसार भोजन  पुरवठा याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. स्वयंपाकगृहाची  पाहणी  करताना अन्नधान्य साठवण, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाक प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली.

जिल्हाधिकारी  श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विद्यालयातील सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण संवादामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल, विविध स्पर्धांमधील सहभाग तसेच ॲकॅडमिक परफॉर्मन्सचा आढावा घेत जिल्हाधिकारी  श्री. गुप्ता यांनी  विद्यालयाच्या एकूण कामकाजाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मारोती घोणसेटवाड, वरिष्ठ शिक्षक किशन गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

******* 







जिल्हा परिषदेत सकाळी 7.15 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण



हिंगोली (जिमाका), दि. 29: महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक 01 मे 2026 रोजी जिल्हा परिषद, हिंगोली येथे सकाळी 7.15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृध्दी दिवाणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या या गौरवपूर्ण प्रसंगी राष्ट्रीय पोशाख परिधान करून देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

*****

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार (दि.01) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात येणार असून, राष्ट्रगीताच्या सन्मानासह कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, तसेच स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*****

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 


महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन समारंभ



हिंगोली (जिमाका), दि.29 : महाराष्ट्र राज्याची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 01 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 67 वा समारंभ हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

67 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न न औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे शुक्रवार, दि. 01 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.

सकाळी 8.25 ते 8.30 या वेळेत पोलीस परेड संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 8.30 ते 8.35 या वेळेत पालकमंत्री श्री. झिरवाळ हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये वा आस्थापनांतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करावा.

सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*******

कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य * शेतकऱ्यांनी 20 मेपूर्वी नोंदणी पूर्ण करावी

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यात दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दिनांक 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकरी बांधव-भगिनींनी तात्काळ ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात एकूण 1 कोटी 71 लाख खातेदार संख्या असून, त्यापैकी 1 कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपला तो तयार करून घ्यावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

या नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात. तसेच शेतकरी स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे आदी प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींनी 20 मेपूर्वी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय हेल्पडेस्कशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी श्रीमती शीतल कौदरे (मो. 9172319637) यांच्याशी संपर्क साधावा.

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*****

28 April, 2026

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज – मुख्य सचिव राजेश अग्रवाल • वेळेत सेवा देण्यात हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा

 


मुंबई,दि. २८: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि राज्यसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, पासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे.


एआय आधारित यंत्रणेकडे वाटचाल करण्याची गरज –


जी2जी, जी2सी आणि जी2बी सेवा अधिक सुलभ करण्यावरही भर दिला असुन पारंपरिक एजंट प्रणालीत बदल करून डिजिटल आणि एआय आधारित यंत्रणेकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डिजी लॉकर आणि “गोल्डन  डाटा” यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा प्रोफाइल तयार करून त्याला आवश्यक शासकीय योजना आणि सेवा आपोआप उपलब्ध करून देण्याची संकल्पना त्यांनी मांडली.


एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार –


मुख्य सचिवांनी पुढे सांगितले की, भविष्यात नागरिकांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज भासणार नाही. एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निकाल देणार आहेत. या दृष्टीने शासन विविध कंपन्यांसोबत काम करत असून, येत्या काही महिन्यांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त – मुख्य आयुक्त मनूकुमार श्रीवास्तव


राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी सेवा हक्क दिनानिमित्त बोलताना शासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संस्थात्मक रूपांतर करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, विविध अधिकाऱ्यांनी राबवलेले उपक्रम केवळ व्यक्तिनिष्ठ न राहता संपूर्ण यंत्रणेचा भाग व्हावेत, यासाठी त्यांचे योग्य दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपक्रम इतर जिल्ह्यांमध्येही प्रभावीपणे राबवता येतील.


यावेळी त्यांनी सांगितले की, एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी संबंधित विभागांच्या सहकार्याने या उपक्रमांची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या उपक्रमांचे सविस्तर अहवाल तयार करून आयोगाकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.


मुख्य आयुक्तांनी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, या कार्यक्रमासाठी व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव यांचे विशेष आभार मानले. आपल्या मनोगताचा शेवट करताना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी सातत्याने सुरू ठेवावी, असे आवाहन केले.


गुणवत्तेनुसार सेवा देणाऱ्या जिल्ह्यांचा अधिकाऱ्यांसह गौरव –


प्रथम क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने पटकावला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) व निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विनय गोडा यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 91.41 टक्के सेवा निर्धारित कालावधीत देण्यात आल्या. *द्वितीय क्रमांक हिंगोली जिल्ह्याला मिळाला असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 90.60 टक्के सेवा वेळेत प्रदान करण्यात आल्या.* तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्याने मिळवला असून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली 90.50 टक्के सेवा वेळेत देण्यात आल्या. बीड जिल्ह्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली 90.13 टक्के सेवा निर्धारित कालावधीत देत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांना अधिक सुलभ व जलद सेवा देण्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या कार्याचा कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.


नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश भागवत देशमुख यांनी “डिजिटल ई-लॉक” व नवीन ऑनलाइन सेवा सुरू करून सेवा प्रक्रियेला गती दिली. भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे व सहायक, योगेश नवल यांनी जीआयएस आधारित ई-मोजणी, एआय आधारित नकाशा प्रक्रिया यांसारख्या उपक्रमांद्वारे तांत्रिक सुधारणा केल्या. तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी पीएमसी केअर ॲप, व्हाट्सॲप चॅटबॉट व नागरिक सुविधा केंद्र यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारले, तर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व सहकारी रणजित यादव यांनी उत्कृष्ट सेवा केंद्राची संकल्पना राबवली. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व प्रविण देवरे यांनी डिजिटल प्रणाली विकसित केली. नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, जालना जिल्हाधिकारी आरिमा मित्तल तसेच अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांदक यांनीही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा वितरण अधिक सक्षम केले. या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्याचे या कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुक्त किरण जाधव यांनी मांडले. समग्र संस्थेच्या वतीने करण्यात आलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले.

००००

खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात खताचे नियोजन पूर्ण शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही- कृषी विभाग

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत उपलब्धतेचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खतटंचाई भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक गायकवाड तसेच लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.

कृषी  विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप  हंगामासाठी  हिंगोली  जिल्ह्यास  एकूण 98 हजार 300 मेट्रिक टन खताचे मंजूर आवंटन प्राप्त झाले आहे. याशिवाय संरक्षित साठा म्हणून 1 हजार 950 मेट्रिक टन युरिया व 700 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत कंपन्या, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच खत साठ्याचे नियमित निरीक्षण करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, पावती घ्यावी तसेच अनावश्यक साठेबाजी किंवा जादा दर आकारणीबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक खत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नियोजन केले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिली आहे.

 

*******

नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब, विनासायास तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून, अधिसूचित सेवा शहरांपासून गावखेड्यांपर्यंत वेळेत नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी  प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाने दि. 1 एप्रिल 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलात आणून नागरिकांना नियत कालमर्यादेत लोकसेवा मिळण्याचा हक्क प्रदान केला आहे. या अधिनियमाच्या कलम 4 नुसार शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

हा अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यभावनेतून जनतेची सेवा करण्यास प्रेरित करणारा असून, शासनाने आयोगाच्या शिफारशीनुसार नागरिकांना अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा सेवाभाव हीच कर्मयोगाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सेवा दिल्या जात आहेत. या सेवा अधिक प्रभावीपणे व घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी  प्रास्ताविकातून सेवा हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका व त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच सर्व विभागांनी अधिकाधिक अधिसूचित सेवा सकारात्मक पद्धतीने विहित मुदतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवून हिंगोली जिल्ह्याचे नाव लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीत उज्वल करावेत, असे आवाहन याप्रसंगी केले.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, पोलीस अधिकारी  जमीर अब्दुल गनी नाईक, सरकारी  कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड यांचा अपर जिल्हाधिकारी  महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवादूत पोर्टलच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान लोकसेवा हक्क दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपणही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लोकसेवेची  शपथ देण्यात आली. महाआयटीचे प्रकल्प समन्वयक गंगाधर लोंढे यांनी आभार मानले.

******* 






अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल, मोबाईल अॅपद्वारे लाभार्थ्यांना थेट सेवा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप (Annasaheb Patil Mahamandal App) हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून, महामंडळाच्या योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून करता येणार आहे.

महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून, योजनांची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत होता किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्याने लाभार्थ्यांना वेळ, खर्च व अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर महामंडळाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांशी करार करून योजनांच्या सेवा प्रति सेवा 85 रुपये दराने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता त्यापुढील टप्पा म्हणून मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी त्यांच्या अँड्राइड मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल नोंदवून ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.

महामंडळाच्या योजनांमध्ये  एलओआय, सँक्शन, आणि क्लेम असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे तसेच पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.

सध्या क्लेम सादर करणाऱ्या तसेच नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल व पारदर्शकता वाढेल.

यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल. तसेच ही माहिती महामंडळाच्या इएचआरएमएस (EHRMS) प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप डाउनलोड करून वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

*******

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण कागदपत्रांअभावी रद्द स्थितीत असलेली  प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. या प्रकरणांतील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार असल्याने कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित  प्रकरण छाननी स्तरावर दिसेल. या टप्प्यावर महामंडळामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच, व्याज परताव्यासाठी  क्लेम  सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसून येतील. अशा प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता संबंधित जिल्हा समन्वयकांमार्फत करून घ्यावी. प्राथमिक तपासणीनंतर विभागीय समन्वयकांमार्फत ही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. लाभार्थ्यांनी 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रकरण नियमित करून घ्यावे.

भविष्यात होल्ड प्रकरणांसाठी कागदपत्रे थेट लाभार्थ्यांच्या लॉगिनमधून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुटी  नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वी व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर  करण्यास  परवानगी  होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम सेंट फॉर कॅफो या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र असलेली काही प्रकरणे तपासणीअंती एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा कागदपत्रांमधील विसंगतीमुळे ब्लॉक करण्यात आली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली होती. या संदर्भात फौजदारी कार्यवाही सुरू आहे.

ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक झाली आहेत त्यांनी संपर्क क्रमांक, बँक तपशील दुरुस्त करून तसेच मूळ कागदपत्रांसह संबंधित अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर अशा प्रकरणांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन होल्ड किंवा ब्लॉक होण्याची कारणे तपासून त्वरित आवश्यक कागदपत्रांची  पूर्तता  करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे. 

******

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण व व्यवसाय वर्धन उपक्रम

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य पुरविण्यापुरते काम मर्यादित न ठेवता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच मार्केटींग टॅब सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

महामंडळाने स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (बिजनेस प्रोमोशन)  मार्केटींग टॅब विकसित केला आहे. हा उपक्रम फ्ल्‍िापकार्ट, ॲमेझान आणि इंडियामार्ट यांसारख्या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता ऑनलाईन अपलोड करता येतो.

सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळील लाभार्थी उद्योजकांची माहिती सहज मिळू शकते व त्यांच्या उत्पादनांचा तसेच सेवांचा लाभ घेता येतो.

या माध्यमातून लोकल ते ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, लघुउद्योजकांनाही मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याशिवाय, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल नव्हे तर योग्य ज्ञान, कौशल्ये व बाजारपेठेची समज आवश्यक असल्याने महामंडळाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. वेबिनार, युट्यूब आणि पॉडकॉस्ट यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय विस्तार, उत्पादन गुणवत्ता, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहकांशी संवाद, विक्री कौशल्ये, आर्थिक नियोजन व नफा वाढविण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक माहितीही उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या अधिकृत YouTube व Facebook चॅनेलवर प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना सोयीच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

महामंडळाने  डिजीलॉकर  सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली असून त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. भविष्यात महा-आयडी तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्याशी समन्वय साधून आणखी डिजिटल सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

********

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेची निवड यादी जाहीर

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा 1 हजार रुपये असून वार्षिक 12 हजार रुपये इतका आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि. 28 डिसेंबर 2025 रोजी  एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक आदी बाबींमध्ये आवश्यक दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेमार्फत दि. 5 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती.

विद्यार्थी व पालकांनी शाळेमार्फत सादर केलेल्या दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

दि. 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या एनएमएमएस परीक्षेसाठी राज्यभरातून 2 लाख 50 हजार 745 विद्यार्थ्यांची  नोंदणी  करण्यात आली  होती. महाराष्ट्र राज्यासाठी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून 11 हजार 682 शिष्यवृत्तींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील आरक्षण धोरणानुसार विविध संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के आरक्षण लागू आहे.

राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यासाठी  इयत्ता 7 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांची संख्या तसेच 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणावर जिल्हानिहाय स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे.

या परीक्षेची निवड यादी व गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://mseenmms.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हे, शाळा व विद्यार्थ्यांनी निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षण संचालक (योजना) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.

******

परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी 21 मेपर्यंत अर्ज करा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी  प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीमध्ये विविध शाखांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी शाखेसाठी 25, वास्तुकला  शास्त्रासाठी  6, व्यवस्थापनासाठी  3, विज्ञानासाठी  15, वाणिज्य/अर्थशास्त्रासाठी 9, कला शाखेसाठी 9, विधी शाखेसाठी 5 आणि औषध निर्माण शास्त्रासाठी 3 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे राहील. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे सन 2025-26 या वर्षाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत तर पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक राहतील. तसेच परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असणे आवश्यक आहे. कंडिशनल ऑफर लेटर ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ts.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीनेही सादर करावी. अर्जाचा नमुना, शासन निर्णय, कागदपत्रांची यादी व सविस्तर माहिती https://obebahujankalyan.maharashtra.gov.in तसेच https://dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे, आकार प्रिमायरोरा, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – 411006 येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

******

27 April, 2026

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ५ मेपर्यंत सादर करावेत

 


हिंगोली (जिमाका), दि. २७ : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील हिंगोली जिल्ह्यातील अनेक अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याने संबंधित महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षातील ५५ अर्ज, २०२०-२१ मधील २०० अर्ज, २०२१-२२ मधील १५२ अर्ज आणि २०२२-२३ मधील २५० अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच सन २०२३-२४ मधील ७७ अर्ज महाविद्यालय स्तरावर व १०० अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत.

याशिवाय सन २०२४-२५ मधील १८० अर्ज महाविद्यालय स्तरावर व २०२ अर्ज विद्यार्थी स्तरावर, तर सन २०२५-२६ मधील ७४६ अर्ज महाविद्यालय स्तरावर आणि ४३२ अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन पाठविणे अपेक्षित आहे. सातत्याने पत्रव्यवहार, बैठका तसेच व्हॉट्सअॅप समूहांद्वारे सूचना देऊनही काही महाविद्यालयांकडून अर्ज मंजुरीची कार्यवाही होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

विहित मुदतीत अर्ज मंजुरीसाठी न पाठवल्यास आणि पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज संबंधित महाविद्यालयांनी दि. ५ मे २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

*******

हिंगोली जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी * नागरिकांनी खबरदारी घ्यावी

 


हिंगोली(जिमाका), दि. २७ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी सोमवार (दि. २७) रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी मंगळवार (दि. २८)साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*उष्णतेच्या काळात घ्यावयाची काळजी*


काय करावे :

१. तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

२. ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत. हलक्या रंगाचे, सैलसर सुती कपडे वापरावेत.

३. घराबाहेर पडताना डोके झाकावे, टोपी, छत्री, गॉगल वापरावा व त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

४. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.


काय टाळावे :

१. शक्यतो उन्हात जाणे टाळावे. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडू नये.

२. अनवाणी बाहेर जाऊ नये.

३. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर ठेवावे.

४. मद्यपान, चहा, कॉफी व शीतपेये टाळावीत.

५. जास्त मीठ, तिखट, तेलकट व शिळे अन्न खाऊ नये.

६. बंद चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

७. अनावश्यक उष्णता निर्माण करणारे दिवे किंवा बल्ब वापरणे टाळावे.


*विजांचा कडकडाट व पावसाच्या वेळी खबरदारी*


या गोष्टी कराव्यात :

१. गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे.

२. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेर थांबू नये.

३. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत.

४. तारांचे कुंपण, विजेचे खांब व लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.

५. पाण्यात उभे असल्यास त्वरित बाहेर पडावे.


या गोष्टी करू नयेत :

१. विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नये व शॉवरखाली अंघोळ करू नये.

२. वादळी वाऱ्याच्या वेळी लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.

३. उंच झाडाखाली थांबू नये.

४. उंच लोखंडी मनोऱ्याजवळ उभे राहू नये.

५. उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये.

जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*******

25 April, 2026

 जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात


वसमत तालुक्यात २५० गणक घरोघरी; नागरिकांच्या घरातील ३४ बाबींची होणार नोंद



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : देशाच्या विकास आराखड्याचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून वसमत तालुक्यात होत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तब्बल २५० गणक, २४४ पर्यवेक्षक आणि फिल्ड डेप्युटी सज्ज झाले असून प्रत्येक घरातील मूलभूत सुविधा, कुटुंबांची रचना आणि सामाजिक स्थितीचा सविस्तर तपशील संकलित केला जाणार आहे.

 तहसीलदार डॉ. विनोद ढोणगावकर यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरगुती व घर गणना करण्यात येणार आहे. या अंतर्गत घरातील खोल्यांची संख्या, मोबाईल, संगणक, वाहन, शौचालय, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, कुटुंबातील सदस्य, विवाहित जोडपी, घराची मालकी यांसह एकूण ३४ बाबींवर माहिती संकलित केली जाणार आहे.

१५ दिवसांची ऑनलाईन स्वयं-गणना सुविधा

१ मेपासून नागरिकांना ऑनलाईन स्वयं-गणनेची सुविधा देण्यात आली असून पुढील १५ दिवसांत अधिकृत जनगणना पोर्टलवर माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला युनिक आयडी मिळणार असून गणकांच्या भेटीवेळी तो सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे माहितीची पडताळणी जलद व अचूक होणार आहे.

प्रशासनाची जय्यत तयारी

बसमत जनगणना प्रशासनाने या उपक्रमासाठी २५० गणक व २४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सर्व कर्मचारी प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी सज्ज असून घराघरांत भेट देत माहिती संकलन करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी ही राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये

जनगणना प्रक्रियेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर व सुविधांची माहिती, तर दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती नोंदविण्यात येणार आहे.

देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमात वसमत तालुक्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन चार्ज अधिकारी डॉ. विनोद ढोणगावकर यांनी केले आहे.

*****

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दि. १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेत देशभरातील एक कोटीहून अधिक मौल्यवान हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

भारताला प्राचीन काळापासून वेद, उपनिषदे, आयुर्वेद, ज्योतिष, गणित, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास, धर्मशास्त्र, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांतील हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या या हस्तलिखितांच्या माध्यमातून जतन होत आले असले तरी ही ज्ञानसंपदा विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने ती एकत्रितपणे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी करून देशातील मौल्यवान हस्तलिखितांचा एक राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा डिजिटल संग्रह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था, संशोधन केंद्रे तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने हस्तलिखितांचा शोध, त्यांचे वर्गीकरण, पडताळणी व नोंदणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत नोंदविण्यात येणाऱ्या हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय किंवा खाजगी संग्राहक यांच्याकडेच राहणार असून, स्वेच्छेने शासनाकडे हस्तलिखिते सुपूर्द करण्याची इच्छाही व्यक्त करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कवि कालिदास‌ संस्कृत विद्यापीठ भांडारकर ओरीएंटेल रिसर्च इंस्टिट्यूट या क्लस्टर केंद्रांचा, तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास‌ संशोधक मंडळ या स्वतंत्र केंद्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले हे कार्य पाहणार आहेत. तसेच सहनोडल अधिकारी म्हणून अंजली धमाल‌ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर सर्वेक्षण मोहिमेसाठी “ज्ञान भारतम् हे विशेष मोबाईल अँप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, छायाचित्रण, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हास्तरावर या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, विद्यार्थी, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक तसेच वारसा संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

आपल्याकडे प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, ताडपत्रे, कागदी हस्तलिखिते किंवा दुर्मीळ लिखित साहित्य उपलब्ध असल्यास त्याची माहिती मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय वारसा जतन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

जिल्ह्यात १ मेपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ; नागरिकांनी ऑनलाइन स्वयं-गणना करण्याचे आवाहन

 



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ मे २०२६ पासून प्रारंभ होत असून, या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घराची तसेच कुटुंबातील मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-गणना करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी www.se.census.gov.in⁠ या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची व घराची माहिती अचूकरीत्या नोंदवावी. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर संबंधित कुटुंबास एक ‘युनिक आयडी’ प्राप्त होणार असून, जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक घरभेटीवर आल्यास हा क्रमांक त्यांना सादर करणे आवश्यक राहणार आहे.

जनगणना प्रक्रिया सुरळीत, अचूक आणि वेळेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक यंत्रणा उभी केली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ९७८ प्रगणक, ३४३ पर्यवेक्षक तसेच फिल्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण कामकाजासाठी २ हजार २६ गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन माहिती संकलनाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

या जनगणनेत नागरिकांना एकूण ३४ प्रश्नांची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरातील टीव्ही, मोबाइल, संगणक, वाहन यांसारख्या सुविधा, शौचालयाची उपलब्धता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, घराची मालकी, कुटुंबातील सदस्यांची संख्या, जातीचा प्रवर्ग, विवाहित जोडपी आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचे नियोजन, संसाधनांचे वाटप आणि विकास आराखडे तयार करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेषतः आपण ज्या ठिकाणी सध्या राहात आहोत, त्या ठिकाणचीच माहिती पोर्टलवर भरावी किंवा प्रगणकांना द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे लोकसंख्येचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार आहे.

जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्याविषयक सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन हे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*****

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी * डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा

 

हिंगोली दिनांक २५  :-  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल  २०२६ रोजी,  पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी  होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ही निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली येथे होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. 

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे. १) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे. 

२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card). 

३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र.

४) विवाहित महिला मतदारांसाठी जर नाव बदलेले असेल तर नाव बदलल्याबाबतचा अधिकृत पुरावा (शासन अधिसूचना/ गॅझेट) सादर करणे आवश्यक आहे.


  मोबाईल आणि कॅमेरा, मतदान केंद्राच्या आत  नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीस व्हिडिओ कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मतदान पध्दत: मतदान गुप्त व पारंपारिक पध्दतीने मतपत्रिकेव्दारे घेण्यात येईल.

*मतदान प्रक्रिया :-* प्रत्येक मतदारास नऊ (९) मते देता येतील. मतदारास ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे, त्यांच्या नावासमोर (X) अशी खूण त्यांना पुरविण्यात आलेल्या काळ्या बॉल पेनाने करावी अशा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने पार पडावा असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

००००००००

राज्य सेवा हक्क आयोगाकडून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विशेष सन्मान


*अधिसूचित सेवांच्या वेळेत निपटाऱ्यात हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी*


• मुख्य सचिवांच्या‌ हस्ते सह्याद्रीवर होणार सन्मान 


हिंगोली, दि. २५ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान मंगळवार, (दि. २८) रोजी‌ सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित "द्वितीय सेवा हक्क दिन" निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विशेष निमंत्रण पत्र पाठविले असून, त्या पत्रानुसार, वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने संपूर्ण राज्यासाठी आदर्श निर्माण केला असून, राज्यातील इतर जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सदर राज्यस्तरीय सोहळा  महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या‌ अध्यक्षतेखाली तसेच मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेवा हक्क अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना वेळोवेळी सूचना, आढावा बैठक, ऑनलाइन अर्ज निपटारा यंत्रणा बळकट करणे, प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष आणि नागरिकाभिमुख प्रशासन या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिपाक म्हणून हिंगोली जिल्ह्याने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक व उत्तरदायी सेवा देण्याच्या दिशेने प्रशासनाचा आत्मविश्वास आणखी वृद्धिंगत झाला आहे.

******

24 April, 2026

हिंगोली जिल्ह्यात 480 रुग्णांना सुमारे 3.85 कोटींची मदत


·  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती


हिंगोली, दि. २४ (जिमाका):  शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  हिंगोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात 480 रुग्णांना सुमारे 3 कोटी 85 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.


            मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.


*२० गंभीर आजारासाठी मदत*


कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.


*सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा*


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.


*आर्थिक वर्षातील मदत*


१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील 480 रुग्णांना सुमारे 03 कोटी 85 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे.  सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभ अधिक वेगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे. अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

*****


नांदेड येथे ३० एप्रिलला कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा; सहभागी होण्याचे आवाहन


हिंगोली, दि.२४ (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे गुरुवार (दि. 30) रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे आयोजन करण्यात आले असून, लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात विविध महामंडळांच्या कर्ज व प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करताना होणाऱ्या त्रुटी टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र, मंजुरीपत्र, प्रशस्तीपत्र व पदकांचे वितरण करण्यात येणार असून ट्रॅक्टर, वाहने आदी साधनांचे वाटपही करण्यात येईल.

या कार्यक्रमात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शनाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी झुंझारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली, किंवा दूरध्वनी 02456-224442 व www.msobcfdc.org⁠ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

23 April, 2026

लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार - डॉ. मोहंती


• प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन


हिंगोली, दि. २३ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी केले. 

दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज गुरुवार (दि.२३) रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

या प्रसंगी प्रकल्पाच्या साईट ऑफिस इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा, आरआरसीएटीचे संचालक व्ही. पी. भनागे, आयपीआरचे संचालक डॉ. तपस गांगुली तसेच आययूकेए, पुणेचे संचालक आर. श्रीआनंद यांच्यासह संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


लिगो इंडिया प्रकल्प हा गुरुत्वीय तरंगांचा शोध व अभ्यासासाठी उभारला जाणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून, या माध्यमातून अवकाशातील सूक्ष्म कंपनांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे ‘एल’ आकारातील दोन भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या निर्वात प्रणालीमुळे अत्यल्प पातळीवरील हालचालींचे अचूक मोजमाप शक्य होणार आहे.

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीची विशेष ओळख असलेल्या 'यलो गोल्ड' हळदीचे बॉक्स प्रमुख अतिथींना भेट दिले.

******







 उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचे संरक्षण करा



• जिल्हा कामगार कार्यालयाचे आस्थापना मालकांना आवाहन



हिंगोली, दि. २३ (जिमाका) :

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट तीव्र होत असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत कामगार कार्यालयाने सर्व आस्थापना मालकांना कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आवाहन केले आहे.

सचिव, श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेल व्यवसाय आदींनी कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामगारांच्या संरक्षणासाठी खालील उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे, कामाच्या ठिकाणी सावली व विश्रांतीची व्यवस्था करणे, दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात काम टाळणे किंवा कामाच्या वेळेत बदल करणे, तसेच उष्माघाताबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

याशिवाय, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवणे, जड शारीरिक कामे दुपारच्या वेळेत टाळणे, बांधकाम क्षेत्रात कामगारांसाठी आईस पॅक व थंडावा देणाऱ्या सुविधा उपलब्ध करणे, तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित तपासणी करणे यावर भर देण्यात आला आहे.

तसेच, कामगारांना उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करावे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा सूचना व आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शविणारे पोस्टर्स व बॅनर्स लावावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेच्या तीव्रतेमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणारा धोका लक्षात घेता सर्व आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हा कामगार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

*****

 गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रकल्पात जास्तीचा पाणीसाठा


* पाण्याचा काटकसरीने वापर करावा– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. 23 (जिमाका): यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आजघडीला अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जिल्ह्यासाठी दिलासादायक असला, तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धरणे, तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सध्या समाधानकारक साठा असून, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी पुरेसा ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

      नागरिकांनी दैनंदिन वापरात पाण्याची बचत करण्यावर भर द्यावा, तसेच शेती क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पाणी गळती रोखणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबवणे आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभागांना पाणीसाठ्याचे नियमित परीक्षण करण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन शक्य होणार असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले.

*मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली असून, इसापूर धरणात 597.63 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, तो 61.99 टक्के आहे. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात 524.68 दलघमी म्हणजे 64.79 टक्के आहे तर सिद्धेश्वर धरण प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 14.97 द.ल.घ.मी. असा कमी दिसत असला तरीही येलदरी धरण प्रकल्पात यंदाचा अधिक साठा करण्यात आला आहे.* 

  राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठी पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 53.36%, (गतवर्षी 41.72%) असून, त्याखालोखाल अमरावती विभाग 51.08% (43.98), नागपूर 48.54%, नाशिक 48.32%, कोकण 43.42% आणि सर्वात कमी पाणीसाठा हा पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये असून, त्याची टक्केवारी ही 35.50% इतकी आहे. राज्यातील मोठ्या धरणातील उपायुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही गतवर्षी आजच्या दिवशी 36.08% होती तर आजघडीला 43.43% आहे. तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत जास्त असून, यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक (53.23) असून, त्याखालोखाल कोकण (52.72), अमरावती (49.73), छत्रपती संभाजीनगर (44.08), नाशिक (43.92) आणि सर्वात कमी नागपूर (31.74 टक्के) विभागात आहे. राज्यातील मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत 46.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लहान प्रकल्पाची पाणीसाठ्याची स्थिती अमरावती विभागात सर्वाधिक 58.77,कोकण 52.68, नागपूर 46.86, छत्रपती संभाजीनगर 41.74, नाशिक 37.60 तर सर्वात कमी पाणीसाठा 37.15 टक्के आहे. 

 मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, येथील सर्व धरण प्रकल्पांमध्ये 5484.66 दश लक्ष घन मीटर पाणीसाठा असून, तो पुणे विभागानंतर सर्वाधिक आहे. राज्यातील सर्व धरण प्रकल्पातील पाणीसाठा हा 25732.38 द.ल.घ.मी इतका आहे. 

******