आजचा भारत वेगाने बदलत आहे, आणि या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभी आहे सशक्त, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री. एकेकाळी घराच्या चौकटीत मर्यादित मानली जाणारी स्त्री आज शिक्षण, प्रशासन, क्रीडा, उद्योग, विज्ञान, राजकारण आणि सामाजिक कार्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपली ठळक छाप उमटवत आहे. स्त्रीच्या कर्तृत्वामुळे समाजाची प्रगती केवळ वेगवान नाही, तर अधिक समतोल, न्याय्य आणि संवेदनशील बनत आहे. “नारीशक्ती वंदन” ही संकल्पना म्हणजे या अद्वितीय योगदानाचा गौरव आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याला दिलेला सन्मान होय.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती मानले गेले आहे. माता, भगिनी, पत्नी आणि कन्या अशा विविध रूपांत ती समाजाचा आधारस्तंभ राहिली आहे. परंतु आधुनिक काळात स्त्रीने केवळ कुटुंब व्यवस्थापनापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, समाजाच्या सर्वच क्षेत्रांत आपले अस्तित्व भक्कम केले आहे. शिक्षणामुळे तिच्या विचारांना दिशा मिळाली, आर्थिक स्वावलंबनामुळे आत्मविश्वास वाढला आणि बदलत्या सामाजिक दृष्टीकोनामुळे तिला संधींचे नवे आकाश प्राप्त झाले. त्यातून ती आपली प्रगती साधत आहे. तिचे आकाश विस्तारत आहे. ती अवकाश व्यापत आहे.
राज्यात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार असोत, किंवा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या आयुक्त श्रीमती अश्विनी जोशी असोत... या सर्व प्रातिनिधीक स्वरुपात येथे सांगितल्या आहेत. अगदी त्याच धर्तीवर हिंगोली जिल्हाही या परिवर्तनाचा साक्षीदार आहे. येथे अनेक महिलांनी आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील, माजी विधान परिषद सदस्य श्रीमती डॉ. प्रज्ञाताई सातव असोत... अगदी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा रेखा बांगर या त्यापैकीच एक प्रभावी होत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी सक्षम नेतृत्व दाखवून दिले आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे. प्रशासनातील पारदर्शकता, स्वच्छता अभियान, पायाभूत सुविधा उभारणी आणि लोकसहभाग वाढविणे या बाबींमध्ये त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की, महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाल्यास विकास अधिक लोकाभिमुख, शाश्वत आणि संवेदनशील होतो.
याचप्रमाणे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांनी वंचित, दिव्यांग आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवून प्रशासनाला मानवी स्पर्श दिला आहे. त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि समावेशक विकास या मूल्यांना केवळ धोरणांपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून साकारले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास आणि आशेचा किरण निर्माण झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातही महिलांनी आपल्या जिद्दीच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अंध महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचे उदाहरण विशेष प्रेरणादायी आहे. दृष्टी नसतानाही त्यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “असंभव असे काहीच नाही” हा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला आहे. त्यांच्या यशामुळे समाजातील अनेक मुलींना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळते आहे.
आज स्त्री ही केवळ कर्तृत्ववान नाही, तर परिवर्तनाची वाहक बनली आहे. ती समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे, नवनवीन संधींचा शोध घेत आहे आणि स्वतःसह इतरांनाही प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहे. शासनाच्या विविध योजना जसे की महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि उद्योजकता वाढविणाऱ्या उपक्रमांमुळे महिलांना पुढे जाण्यासाठी आवश्यक आधार मिळत आहे. त्याचबरोबर समाजाच्या बदलत्या मानसिकतेमुळे महिलांच्या क्षमतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे.
तथापि, अजूनही काही आव्हाने शिल्लक आहेत लैंगिक भेदभाव, शिक्षणातील असमानता, सुरक्षिततेचे प्रश्न आणि आर्थिक संधींची कमतरता. या समस्यांवर मात करण्यासाठी शासन, समाज आणि प्रत्येक व्यक्तीने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे.
“नारीशक्ती वंदन” हा केवळ एक घोष नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाचा, जिद्दीचा, यशाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सक्षमीकरण हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. आजची खरी गरज आहे ती प्रत्येक मुलीला दर्जेदार शिक्षण, समान संधी आणि सुरक्षित वातावरण देण्याची; कारण सशक्त स्त्री म्हणजे सशक्त कुटुंब; सशक्त कुटुंब म्हणजे सशक्त समाज; आणि सशक्त समाज म्हणजे सशक्त राष्ट्र हो, तर चला सर्वजण मिळून आपण आपले सशक्त राष्ट्र घडवूया.
चला, नारीशक्तीला वंदन करूया… तिच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम करूया !
- प्रभाकर बारहाते
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
********
No comments:
Post a Comment