हिंगोली जिल्हा उद्योग निर्मितीत राज्यात तिसरा
* विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप
हिंगोली, दि. २२ (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे.
राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार वाढविणे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम १ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीला चालना मिळाली आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात हिंगोली जिल्ह्याने १४१.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यास एकूण ६०० प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी १९५७ प्रस्ताव विविध शाखांकडे सादर करण्यात आले. यामधून ८५० प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, एकूण ६७९.७५ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उद्योगनिर्मिती वाढविण्यासाठी वर्षभर सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जागा उपलब्ध करून देणे, बँकांकडून वित्तपुरवठा वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच वीजपुरवठा व इतर अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधला. या सर्व प्रयत्नांमुळेच जिल्ह्याने ६०० प्रकरणे पूर्ण करत १४१.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.
या योजनेंतर्गत टेलरिंग व रेडीमेड गारमेंट्स, ब्युटी पार्लर तसेच कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत झाली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास १००० प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, अधिकाधिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
*****
No comments:
Post a Comment