हिंगोली(जिमाका), दि. 09 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील योगदान अत्यंत मोठे असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन वेळेचे महत्त्व ओळखत दृढनिश्चयाने शिक्षण घेतल्यास यश निश्चित मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, समाज भूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर तसेच विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वेळ ही अमूल्य असून तिचा योग्य उपयोग केल्यास यश मिळविणे शक्य आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक संधींचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करावे, असे त्यांनी नमूद केले.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविणे हीच खरी आदरांजली आहे. तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व व पथनाट्य स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे लाभार्थी प्रदीप संजय जाधव यांना 23 हजार 500 रुपयांचा धनादेश, तर परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी जयदीप ज्ञानबाराव वाठोरे यांना 2 लाख 82 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृहातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******






No comments:
Post a Comment