हिंगोली, दि. 21 (जिमाका): सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून अर्जासोबत जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्राची छायांकित प्रत व अनुक्रमांक नमूद करावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असून सक्षम अधिकाऱ्याने दिलेले 31 मार्च 2027 पर्यंत वैध उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
तसेच अर्जासोबत पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्मतारखेचा पुरावा (ग्रामसेवक/नगरपरिषद दाखला), रहिवासी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचे विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेत आदिम जमातीतील विद्यार्थी, विधवा, घटस्फोटित, निराधार तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत. कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे दिनांक 22 एप्रिल 2026 पासून प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून, 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण भरलेले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment