दिव्यांगांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• दिव्यांग जनजागृती कार्यक्रम व दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ वर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि. १९ (जिमाका): दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
दिव्यांगांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, हिंगोली येथे नुकतेच विशेष ‘दिव्यांग जनजागृती कार्यक्रम’ व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता बोलत होते.
‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. बगाटे, डॉ. ढाकरे, डॉ. प्रियंका, डॉ. पाठक, भारतभूषण रणवीर, लक्ष्मण मुंढे (समाज कल्याण विभाग), सरस्वती कोरडे (महिला व बाल विकास विभाग), प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील दीपिका शेरखाने, मनिषा खिल्लारे, तसेच नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल, दिल्लीचे प्रतिनिधी विनित भागोजी, प्रकल्प समन्वयक दीपक गडदे, सचिन इंगोले यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे कर्मचारी आणि अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र हिंगोली, नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मुळे दिव्यांग बांधवांना समाजात समान अधिकार व संधी प्राप्त झाल्या असून, या कायद्याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमामुळे उपस्थित दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.
******


No comments:
Post a Comment