हिंगोली(जिमाका), दि. 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने हिंगोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभवाटप तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मार्जिन मनी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचवेळी ‘घर-घर संविधान’ वाटप उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे होते. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती गीता गुठ्ठे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, समाजभूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर, आनंद शिखरे, डॉ. विजयकुमार निलावार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, प्रमुख व्याख्याते प्रा. गजानन बांगर, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, महात्मा फुले मागास विकास महामंडळाचे कृष्णाजी शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा फुले मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. याशिवाय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना व मार्जिन मनी योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी उपस्थितांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ‘घर-घर संविधान’ उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिकेचे ग्रामीण भागात पंचायत समितीमार्फत व शहरी भागात नगर परिषदेमार्फत व्यापक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले, तर सूत्रसंचालन समता दूत सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सुमारे 250 ते 300 लाभार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध अधिकारी व कर्मचारी तसेच बार्टीचे समता दूत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
******


No comments:
Post a Comment