हिंगोली (जिमाका), दि. 13 : शाश्वत शेतीकडे
वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक ठरत
आहे. या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या विशेष
डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता
आयोजित करण्यात आले आहे.
कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या डिजिटल शेतीशाळेत
‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षी
थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांद्वारे
कीड नियंत्रण कसे साधता येईल, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रासायनिक
कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे आणि मृदास्वास्थ्य जपणे यावर विशेष
भर देण्यात येणार आहे.
दरम्यान, या डिजिटल शेतीशाळा मालिकेला
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. 3 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात
पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत, आंतरपीक पद्धती,
बीज उगवण क्षमता चाचणी तसेच बीजप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात
85 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
तसेच दि. 8 एप्रिल रोजी आयोजित दुसऱ्या
सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत,
लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रात 1 लाख 108 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते, ही या उपक्रमाची उल्लेखनीय
बाब ठरली आहे.
या मालिकेतील चौथी डिजिटल शेतीशाळा दि.
22 एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र या विषयावर आयोजित करण्यात येणार
आहे.
या डिजिटल शेतीशाळा मालिकेतील सत्रांमध्ये
कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ
मिळणारी उत्तरे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव यामुळे ही शिकण्याची प्रक्रिया अधिक
संवादात्मक व उपयुक्त ठरत आहे.
या सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर
करण्यात येणार आहे. तरी शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रातील
सर्व घटकांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत
करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment