28 April, 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण व व्यवसाय वर्धन उपक्रम

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य पुरविण्यापुरते काम मर्यादित न ठेवता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच मार्केटींग टॅब सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

महामंडळाने स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (बिजनेस प्रोमोशन)  मार्केटींग टॅब विकसित केला आहे. हा उपक्रम फ्ल्‍िापकार्ट, ॲमेझान आणि इंडियामार्ट यांसारख्या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता ऑनलाईन अपलोड करता येतो.

सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळील लाभार्थी उद्योजकांची माहिती सहज मिळू शकते व त्यांच्या उत्पादनांचा तसेच सेवांचा लाभ घेता येतो.

या माध्यमातून लोकल ते ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, लघुउद्योजकांनाही मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याशिवाय, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल नव्हे तर योग्य ज्ञान, कौशल्ये व बाजारपेठेची समज आवश्यक असल्याने महामंडळाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. वेबिनार, युट्यूब आणि पॉडकॉस्ट यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय विस्तार, उत्पादन गुणवत्ता, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहकांशी संवाद, विक्री कौशल्ये, आर्थिक नियोजन व नफा वाढविण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक माहितीही उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या अधिकृत YouTube व Facebook चॅनेलवर प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना सोयीच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

महामंडळाने  डिजीलॉकर  सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली असून त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. भविष्यात महा-आयडी तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्याशी समन्वय साधून आणखी डिजिटल सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

********

No comments: