हिंगोली, दि.२२ (जिमाका) : गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, अर्ज थेट रुग्णालयातूनच सादर केला जाणार आहे. यामुळे अर्जासाठी होणारी कागदपत्रांची धावपळ थांबणार असून, अवघ्या ८ तासांत निधीला मंजुरी मिळणार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात मागील वर्षभरात ६८ रुग्णांना सुमारे ५१ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणारी ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे.
शासनाच्या इतर आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र रुग्णांसाठी हा निधी मोठा आधार ठरत असून, आता रुग्णालयाकडूनच ऑनलाइन अर्ज सादर करण्यात येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर कागदपत्रांची तत्काळ पडताळणी करून ८ तासांत मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळणार आहे.
या योजनेअंतर्गत कोक्लिअर इम्प्लांट (२ ते ५ वर्षे वयोगट), हृदयविकार, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, गुडघा व हात प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, बाल शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, थॅलेसिमिया, केमोथेरपी/रेडिएशन, अंधत्व, नवजात शिशूंचे आजार, भाजलेल्या रुग्णांचे उपचार तसेच विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा सुमारे २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे व पाठपुरावा करण्याची संपूर्ण जबाबदारी आता रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवरील मानसिक व आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांनी दिली.
CSR निधीतून सहकार्याचे आवाहन
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत विविध स्तरावर मदत केली जाते. अनेक रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहतात. अशा रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उद्योग, संस्था व दानशूर व्यक्तींनी आपल्या CSR (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) निधीतून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबईचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
बँक तपशील :
Account Name – Chief Minister's Relief Fund
Account Number – 10972433751
IFSC Code – SBIN0000300
समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागातून अनेक गरजू रुग्णांना उपचाराची संधी मिळून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळणार असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment