हिंगोली (जिमाका), दि. १६ : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता तसेच सर्व तालुक्यांचे उपअभियंता उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ६३१ योजना मंजूर असून त्यापैकी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या ६१९ तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १२ योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ३९२ योजनांद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
उन्हाळ्याच्या टंचाई काळात नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन प्रलंबित आहेत, ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून स्टँडपोस्ट व इतर माध्यमांतून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पेडगाव वाडी, पाणबुडी, लोहगाव, नरसी ना., पहेणी, सिंगी नागा, चिखली, चोंडी शहापूर, बळसोंड व केसापूर येथील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
तसेच ज्या गावांमध्ये विहीर व पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागा अधिग्रहणाची प्रकरणे प्रलंबित आहेत, ती तत्काळ निकाली काढावीत. टँकर प्रस्तावित गावांना जलजीवन मिशन व इतर योजनांच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
*******
No comments:
Post a Comment