28 April, 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण कागदपत्रांअभावी रद्द स्थितीत असलेली  प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. या प्रकरणांतील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार असल्याने कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित  प्रकरण छाननी स्तरावर दिसेल. या टप्प्यावर महामंडळामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच, व्याज परताव्यासाठी  क्लेम  सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसून येतील. अशा प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता संबंधित जिल्हा समन्वयकांमार्फत करून घ्यावी. प्राथमिक तपासणीनंतर विभागीय समन्वयकांमार्फत ही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. लाभार्थ्यांनी 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रकरण नियमित करून घ्यावे.

भविष्यात होल्ड प्रकरणांसाठी कागदपत्रे थेट लाभार्थ्यांच्या लॉगिनमधून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुटी  नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वी व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर  करण्यास  परवानगी  होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम सेंट फॉर कॅफो या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र असलेली काही प्रकरणे तपासणीअंती एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा कागदपत्रांमधील विसंगतीमुळे ब्लॉक करण्यात आली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली होती. या संदर्भात फौजदारी कार्यवाही सुरू आहे.

ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक झाली आहेत त्यांनी संपर्क क्रमांक, बँक तपशील दुरुस्त करून तसेच मूळ कागदपत्रांसह संबंधित अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर अशा प्रकरणांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन होल्ड किंवा ब्लॉक होण्याची कारणे तपासून त्वरित आवश्यक कागदपत्रांची  पूर्तता  करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे. 

******

No comments: