हिंगोली (जिमाका), दि. १५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था उभारण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असून ती एका निबंधात मांडणे कठीण आहे. त्यामुळे या स्पर्धेत ‘महिलांविषयी डॉ. आंबेडकर यांचे कार्य व महिला सक्षमीकरणातील योगदान’ या विषयावर निबंध लेखन अपेक्षित आहे.
या स्पर्धेअंतर्गत दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरा गट खुला असून राज्यातील सर्व महिला व पुरुष यात सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. दोन्ही गटांसाठी निबंध मराठी भाषेत सादर करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ असा निश्चित करण्यात आला असून इच्छुक स्पर्धकांनी ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नोंदणीसाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांना पोच दिली जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये व नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी दिली आहे.
***
No comments:
Post a Comment