जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात
वसमत तालुक्यात २५० गणक घरोघरी; नागरिकांच्या घरातील ३४ बाबींची होणार नोंद
हिंगोली, दि. २५ (जिमाका) : देशाच्या विकास आराखड्याचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून वसमत तालुक्यात होत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तब्बल २५० गणक, २४४ पर्यवेक्षक आणि फिल्ड डेप्युटी सज्ज झाले असून प्रत्येक घरातील मूलभूत सुविधा, कुटुंबांची रचना आणि सामाजिक स्थितीचा सविस्तर तपशील संकलित केला जाणार आहे.
तहसीलदार डॉ. विनोद ढोणगावकर यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरगुती व घर गणना करण्यात येणार आहे. या अंतर्गत घरातील खोल्यांची संख्या, मोबाईल, संगणक, वाहन, शौचालय, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, कुटुंबातील सदस्य, विवाहित जोडपी, घराची मालकी यांसह एकूण ३४ बाबींवर माहिती संकलित केली जाणार आहे.
१५ दिवसांची ऑनलाईन स्वयं-गणना सुविधा
१ मेपासून नागरिकांना ऑनलाईन स्वयं-गणनेची सुविधा देण्यात आली असून पुढील १५ दिवसांत अधिकृत जनगणना पोर्टलवर माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला युनिक आयडी मिळणार असून गणकांच्या भेटीवेळी तो सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे माहितीची पडताळणी जलद व अचूक होणार आहे.
प्रशासनाची जय्यत तयारी
बसमत जनगणना प्रशासनाने या उपक्रमासाठी २५० गणक व २४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सर्व कर्मचारी प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी सज्ज असून घराघरांत भेट देत माहिती संकलन करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी ही राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये
जनगणना प्रक्रियेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर व सुविधांची माहिती, तर दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती नोंदविण्यात येणार आहे.
देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमात वसमत तालुक्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन चार्ज अधिकारी डॉ. विनोद ढोणगावकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment