15 April, 2026

विशेष लेख- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान : महिलांच्या सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ



ग्रामीण भागातील महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण हे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहे. या पार्श्वभूमीवर “नारी शक्ती वंदन अभियान” अंतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे महत्त्वपूर्ण अभियान ठरत आहे. 
या अभियानाची संकल्पना 1978 पासून विकसित होत गेली असून 1998 पर्यंत देशभर विविध स्वरूपात अंमलबजावणी झाली. त्यानंतर 1999 मध्ये स्वर्ण जयंती ग्राम योजनेच्या माध्यमातून त्यास अधिक बळकटी देण्यात आली. पुढे 2011 पासून टप्प्याटप्प्याने विविध राज्यांत या अभियानाचा विस्तार करण्यात आला. आज हे अभियान ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रभावी माध्यम बनले आहे. 

अभियानाची वैशिष्ट्ये

उमेद अभियानाचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांच्या संस्थात्मक उभारणीवर आधारित आहे. यामध्ये महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांची स्थापना, ग्रामसंघ व प्रभागस्तरीय संघटनांची निर्मिती यावर भर दिला जातो. प्रत्येक गरीब कुटुंबातील किमान एका महिलेचा गटात सहभाग सुनिश्चित केला जातो.
समुदाय संसाधन व्यक्तींमार्फत गावपातळीवर अंमलबजावणी करून प्रत्येक कुटुंबाला किमान तीन उपजीविकेचे स्त्रोत उपलब्ध करून देणे आणि वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातो. गटांना अभियानातून तसेच बँकांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक स्थैर्याला चालना दिली जाते. 

उमेद अभियानाचे आधारस्तंभ

सामाजिक समावेशन, आर्थिक समावेशन, शाश्वत उपजीविका, विविध शासकीय योजनांचा लाभ.

लक्ष्य घटक

या अभियानांतर्गत समाजातील सर्वात वंचित घटकांना प्राधान्य दिले जाते. यात मागास प्रवर्गातील महिला, एकल महिला, दिव्यांग, वेश्या व्यवसायातील महिला, अस्वच्छ व्यवसायातील महिला, वृद्ध, वेठबिगार शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बेरोजगार युवकांचा समावेश आहे. 

गावाचे जीवनचक्र

उमेद अभियानात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुसूत्र जीवनचक्र राबविले जाते. यामध्ये 
सामाजिक समावेशन: गरिबांची ओळख पटवून वंचित कुटुंबांना प्राधान्य
संस्थीय बांधणी: नवीन गटांची स्थापना व विद्यमान गटांचा समावेश
क्षमता बांधणी: विविध प्रशिक्षणांद्वारे गटांची कार्यक्षमता वाढविणे
उपजीविका: सामाजिक सुरक्षा योजना, सूक्ष्म गुंतवणूक व रोजगार निर्मिती
संघ स्थापना: ग्रामसंघ व प्रभागसंघांची निर्मिती व सुदृढीकरण

आर्थिक सहाय्य व सुविधा

समुदाय संस्थांमार्फत सदस्यांना विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये प्रत्येक स्वयंसहाय्यता गटास 10 ते 15 हजार रुपयांचा फिरता निधी, 60 हजार रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी, अति गरीब कुटुंबांसाठी ग्रामसंघास 75 हजार रुपयांचा जोखीम निधी, प्रभागसंघासाठी 3 लाख रुपयांचा प्रारंभिक निधी, नियमित कर्जफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. 

दशसूत्रीचा प्रभाव

गटाच्या कार्यपद्धतीसाठी तयार करण्यात आलेली दशसूत्री ही या अभियानाची विशेष ताकद आहे. नियमित बैठक, बचत सवय, वेळेत कर्ज परतफेड, आरोग्य व स्वच्छतेवर भर, शिक्षणाचा प्रसार, ग्रामसभेत सहभाग आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सक्रिय पाठपुरावा यामुळे महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत.

समुदाय संस्था संरचना 

उमेद अभियानात तळागाळापासून प्रभाग स्तरापर्यंत सशक्त संस्था उभारल्या जातात. स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ आणि प्रभागसंघ यांची त्रिस्तरीय रचना महिलांना संघटित करून निर्णय प्रक्रियेत सहभागी बनवते.

आर्थिक समावेशन व सामाजिक सुरक्षा 

वित्तीय साक्षरता, बँक संलग्नीकरण, विमा व पेन्शन योजना यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना यांचा लाभ ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविला जातो. 

युवकांसाठी कौशल्य विकास

ग्रामीण युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत (आरसेटी) 18 ते 45 वयोगटातील युवकांना 10 ते 45 दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाते. विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
नारी शक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून उमेद अभियानाने ग्रामीण महिलांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सन्मान आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यामुळे महिला आज परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या राहत आहेत.
उमेद अभियान हे केवळ एक योजना नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ ठरली असून, “सबलीकरणातून समृद्धीकडे” हा संदेश देत समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देत आहे. 

          - चंद्रकांत स. कारभारी
         उपसंपादक
         जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


******

No comments: