23 April, 2026

 गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रकल्पात जास्तीचा पाणीसाठा


* पाण्याचा काटकसरीने वापर करावा– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. 23 (जिमाका): यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आजघडीला अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जिल्ह्यासाठी दिलासादायक असला, तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धरणे, तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सध्या समाधानकारक साठा असून, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी पुरेसा ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

      नागरिकांनी दैनंदिन वापरात पाण्याची बचत करण्यावर भर द्यावा, तसेच शेती क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पाणी गळती रोखणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबवणे आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभागांना पाणीसाठ्याचे नियमित परीक्षण करण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन शक्य होणार असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले.

*मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली असून, इसापूर धरणात 597.63 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, तो 61.99 टक्के आहे. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात 524.68 दलघमी म्हणजे 64.79 टक्के आहे तर सिद्धेश्वर धरण प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 14.97 द.ल.घ.मी. असा कमी दिसत असला तरीही येलदरी धरण प्रकल्पात यंदाचा अधिक साठा करण्यात आला आहे.* 

  राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठी पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 53.36%, (गतवर्षी 41.72%) असून, त्याखालोखाल अमरावती विभाग 51.08% (43.98), नागपूर 48.54%, नाशिक 48.32%, कोकण 43.42% आणि सर्वात कमी पाणीसाठा हा पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये असून, त्याची टक्केवारी ही 35.50% इतकी आहे. राज्यातील मोठ्या धरणातील उपायुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही गतवर्षी आजच्या दिवशी 36.08% होती तर आजघडीला 43.43% आहे. तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत जास्त असून, यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक (53.23) असून, त्याखालोखाल कोकण (52.72), अमरावती (49.73), छत्रपती संभाजीनगर (44.08), नाशिक (43.92) आणि सर्वात कमी नागपूर (31.74 टक्के) विभागात आहे. राज्यातील मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत 46.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लहान प्रकल्पाची पाणीसाठ्याची स्थिती अमरावती विभागात सर्वाधिक 58.77,कोकण 52.68, नागपूर 46.86, छत्रपती संभाजीनगर 41.74, नाशिक 37.60 तर सर्वात कमी पाणीसाठा 37.15 टक्के आहे. 

 मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, येथील सर्व धरण प्रकल्पांमध्ये 5484.66 दश लक्ष घन मीटर पाणीसाठा असून, तो पुणे विभागानंतर सर्वाधिक आहे. राज्यातील सर्व धरण प्रकल्पातील पाणीसाठा हा 25732.38 द.ल.घ.मी इतका आहे. 

******



No comments: