उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचे संरक्षण करा
• जिल्हा कामगार कार्यालयाचे आस्थापना मालकांना आवाहन
हिंगोली, दि. २३ (जिमाका) :
राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट तीव्र होत असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत कामगार कार्यालयाने सर्व आस्थापना मालकांना कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आवाहन केले आहे.
सचिव, श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेल व्यवसाय आदींनी कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कामगारांच्या संरक्षणासाठी खालील उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे, कामाच्या ठिकाणी सावली व विश्रांतीची व्यवस्था करणे, दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात काम टाळणे किंवा कामाच्या वेळेत बदल करणे, तसेच उष्माघाताबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
याशिवाय, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवणे, जड शारीरिक कामे दुपारच्या वेळेत टाळणे, बांधकाम क्षेत्रात कामगारांसाठी आईस पॅक व थंडावा देणाऱ्या सुविधा उपलब्ध करणे, तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित तपासणी करणे यावर भर देण्यात आला आहे.
तसेच, कामगारांना उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करावे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा सूचना व आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शविणारे पोस्टर्स व बॅनर्स लावावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणारा धोका लक्षात घेता सर्व आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हा कामगार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
*****
No comments:
Post a Comment