08 April, 2026

हळद उत्पादनामुळे हिंगोलीची जागतिक पातळीवर ओळख - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली (जिमाका), दि. 08 : हळद पिकामुळे हिंगोली जिल्हा जागतिक नकाशावर विशेष प्रसिद्ध झाला असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे १५ टक्के हळदीचे उत्पादन एकट्या हिंगोली जिल्ह्यातून होत आहे. हळद प्रक्रियेमध्ये उद्योजक शेतकरी, फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच बचत गटांतील महिला मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून त्यांना प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

दत्तगुरु स्पाइस फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन मार्केट यार्ड व प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे होते, तर मार्गदर्शक म्हणून राजश्रीताई पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी गजानन घुगे, शिवाजीराव माने, आमदार राजू भैया नवघरे, भाऊराव पाटील गोरेगावकर, अजय परमार, एम. बी. गाजरे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

हळद पिकाची संपूर्ण मूल्य साखळी विकसित करून मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल. योग्य नियोजन केल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत वाढविणे शक्य असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.

तसेच, हळद मूल्यवर्धन प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवून ब्रँडिंग व मार्केटिंगवर भर देण्याची गरज असून वसमत येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हळद संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजश्रीताई हेमंत पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तगुरु फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संचालक गंगाधर श्रृंगारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सूर्याजी शिंदे यांनी मानले.


*जिल्हाधिका-यांची अल्पसंख्याक वसतिगृह, दाल मिलला भेट*


या दरम्यान आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील अल्पसंख्यांक वसतिगृहाची तसेच कळमनुरी येथील महिला उद्योजिका संगीता जितेंद्र खिल्लारे यांच्या सरस्वती दालमिलला भेट देवून पाहणी केली. 

*******





No comments: