हिंगोली (जिमाका), दि. २७ : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील हिंगोली जिल्ह्यातील अनेक अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याने संबंधित महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षातील ५५ अर्ज, २०२०-२१ मधील २०० अर्ज, २०२१-२२ मधील १५२ अर्ज आणि २०२२-२३ मधील २५० अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच सन २०२३-२४ मधील ७७ अर्ज महाविद्यालय स्तरावर व १०० अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत.
याशिवाय सन २०२४-२५ मधील १८० अर्ज महाविद्यालय स्तरावर व २०२ अर्ज विद्यार्थी स्तरावर, तर सन २०२५-२६ मधील ७४६ अर्ज महाविद्यालय स्तरावर आणि ४३२ अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन पाठविणे अपेक्षित आहे. सातत्याने पत्रव्यवहार, बैठका तसेच व्हॉट्सअॅप समूहांद्वारे सूचना देऊनही काही महाविद्यालयांकडून अर्ज मंजुरीची कार्यवाही होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
विहित मुदतीत अर्ज मंजुरीसाठी न पाठवल्यास आणि पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज संबंधित महाविद्यालयांनी दि. ५ मे २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment