हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक
सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप (Annasaheb Patil
Mahamandal App) हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून,
महामंडळाच्या योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून करता येणार
आहे.
महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी
www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून, योजनांची
संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना
संगणकाचा वापर करावा लागत होता किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये
एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्याने लाभार्थ्यांना वेळ, खर्च व अनावश्यक
त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर महामंडळाने दि. 3 सप्टेंबर
2025 रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांशी करार करून योजनांच्या
सेवा प्रति सेवा 85 रुपये दराने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता त्यापुढील टप्पा म्हणून
मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी त्यांच्या अँड्राइड मोबाईलवर
हे अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल
नोंदवून ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांच्या
लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांमध्ये एलओआय, सँक्शन, आणि क्लेम असे तीन टप्पे असून आवश्यक
कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे
तसेच पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे
योजना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार
आहे.
सध्या क्लेम सादर करणाऱ्या तसेच नव्याने
मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य
करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून,
त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल व पारदर्शकता वाढेल.
यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा
वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल.
तसेच ही माहिती महामंडळाच्या इएचआरएमएस (EHRMS) प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून,
पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल
अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप डाउनलोड
करून वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment