07 April, 2026

स्थळ पाहणीशिवाय विहीर अधिग्रहण, टँकर सुरू करू नयेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : विंधन विहीर अधिग्रहण किंवा टँकर सुरू करणे आवश्यक असणा-या गावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच संबंधित कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना आज आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित उपअभियंते व कनिष्ठ अभियंते, तसेच टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर असल्याने यंदाच्या टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असली तरी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी स्टँडी बसवून पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच गावांतील सर्व पाणीस्रोतांची तपासणी करून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जोडण्यांसाठी लागणाऱ्या कोटेशनची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 701 गावांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यामध्ये नळ योजनांची दुरुस्ती 5, विंधन विहिरींची दुरुस्ती 16, नवीन विंधन विहिरी व कुपनलिका 131 गावांत 158, खाजगी विहीर अधिग्रहण 302 गावांत 336, तसेच 22 गावांत 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

******

No comments: