हिंगोली, दि. 10(जिमाका): राज्यातील जमिनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. या अंतर्गत जमिनीची पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली असून, मौजे केळीतांडा येथे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय भूमापन दिनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.
जमीन पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पामुळे सातबारा व नकाशातील विसंगती दूर होऊन जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक होणार आहेत. पोटहिस्सा मोजणीमुळे सीमावाद कमी होऊन अचूक डिजिटल नकाशे उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतकरी किंवा पोटहिस्साधारकांमधील वाद थांबतील. भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण शक्य होईल. पीक विमा व बँकिंग प्रक्रियेसाठी अद्ययावत डेटाबेस उपलब्ध होईल. खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेसाठी अचूक डिजिटल माहिती प्रणाली विकसित होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर यांनी प्रास्ताविक करत पोटहिस्सा मोजणीचे महत्त्व स्पष्ट केले. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
******



No comments:
Post a Comment