• तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४२३ रिक्त केंद्रे अशा एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दि.०२ जानेवारी २०२६ अखेर एकूण ३ हजार १०१ अर्ज प्राप्त झाले.
प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १ हजार ८६१ उमेदवारांच्या दि.३ ते दि.१२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर दि.०१ मार्च २०२६ रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या अंतरिम गुणवत्ता यादीवर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी दि.११ ते दि.१३ मार्च २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
या कालावधीत १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. त्यानुसार पात्र गुणदान करण्यात आले. तसेच तात्पुरत्या निवड यादीवरील ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्तेच्या आधारे न्यायनिर्णय करण्यात आला. यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात बदल होऊन दि.१७ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम गुणवत्ता यादीवर पुन्हा उमेदवारांकडून दि.२० ते दि.२२ एप्रिल या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत प्राप्त झालेल्या २५ हरकतींची सुनावणी करून त्यावरील निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात आला. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीत काही अंशतः बदल करण्यात आले असून सुधारित अंतिम गुणवत्ता यादी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.
तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी खालील वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उमेदवारांनी ४ मे २०२६ रोजी, वसमत तालुका दि.०५ मे रोजी,
हिंगोली (शहरी व ग्रामीण) दि.०६ मे रोजी, *सेनगाव दि.०७ मे रोजी आणि कळमनुरी तालुक्यातील उमेदवारांनी दि.०८ मे २०२६ रोजी* पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित व स्वसाक्षांकित दोन प्रती, अलीकडील तीन रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे तसेच आपले सरकार सेवा केंद्र स्वीकारण्याबाबतचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. यानंतर शासनाकडे युजरनेम व पासवर्ड मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक साक्षांकन नमुना व अग्रिम रक्कम भरण्याबाबत संबंधितांना यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment