20 April, 2026

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

 


हिंगोली, दि. २० (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू केली आहे.

मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या यशस्वी मधपाळांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांपैकी एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम रु. ११,०००, द्वितीय रु. ७,००० व तृतीय रु. ५,००० अशी निश्चित करण्यात आली आहे.

दि. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी नामांकन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mskvib.org⁠ उपलब्ध असून, तसेच संबंधित जिल्ह्यातील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयातही अर्ज मिळू शकतात.

इच्छुकांनी आपली नामांकने दि. ०४ मे २०२६ पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय हिंगोली (९८२२५२८५३४) व 

संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी ०२१६८-२६०२६४) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

No comments: