31 August, 2026

हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ८४ हजार ७६ मतदार

दावे, हरकती ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली, दि. ३१ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील आपले नाव नागरिकांनी तपासावे. आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. तसेच ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी (नमुना ६ व आवश्यक कागदपत्रांसह) मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यात एकूण आठ लाख ८४ हजार ७६ मतदार आहेत. यात चार लाख ६१ हजार २११ पुरुष, चार लाख २२ हजार ८५३ महिला आणि १२ इतर मतदारांचा समावेश आहे.


विधानसभा मतदारसंघनिहाय वसमत येथे दोन लाख ९० हजार २२१, कळमनुरी येथे दोन लाख ९८ हजार ८५४, तर हिंगोली येथे दोन लाख ९५ हजार एक मतदार आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान विविध कारणांमुळे ८५ हजार ३१६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यात आढळून न आलेले ११ हजार ८२२, कायमस्वरूपी स्थलांतरित ४१ हजार ८७६, मृत २१ हजार ५१७, अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंद असलेले नऊ हजार ९२६ आणि इतर १७५ मतदारांचा समावेश आहे.


वसमत मतदारसंघात आढळून न आलेले तीन हजार २०० गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ५०९, मृत आठ हजार १५१, दुबार नोंद असलेले दोन हजार ८५७ आणि इतर ४२ असे एकूण २७ हजार ७५९ मतदार आहेत.


कळमनुरी मतदारसंघात आढळून न आलेले दोन हजार ३८७ गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ६१५, मृत सहा हजार १९७, अन्यत्र नोंदणी केलेले तीन हजार ४५३ आणि इतर ७२ असे एकूण २५ हजार ७२४ मतदार आहेत.


हिंगोली मतदारसंघात आढळून न आलेले सहा हजार २३५, कायमस्वरूपी स्थलांतरित १४ हजार ७५२, मृत सात हजार १६९, अन्यत्र नोंद असलेले तीन हजार ६१६ आणि इतर ६१ असे एकूण ३१ हजार ८३३ मतदार आहेत.


प्रारूप मतदार यादी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच hingoli.nic.in या हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचा निपटारा २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ०४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  


मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. संबंधित अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  मतदारांना संबंधित बीएलओशी थेट संपर्क साधण्यासाठी ECINET 3 ॲपवरील ‘Book a Call with BLO’ सुविधेचाही वापर करता येणार आहे. 


*मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण* 

जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी वसमत मतदारसंघात १२, कळमनुरीत ८ आणि हिंगोलीत ३ नवीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एक हजार १५ वरून एक हजार ३८ झाली आहे.


*मतदारसंघनिहाय मदत कक्ष*

मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वसमतसाठी ९०६७४ १०८१३, कळमनुरीसाठी ९०९६७ ४३१४२, तर हिंगोलीसाठी ९४०४५ ०६९१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्हास्तरीय मदत क्रमांक १९५० आहे.

हिंगोली जिल्ह्यात नात्याअंतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील 4 प्रकरणांना मान्यता*

हिंगोली, दि. 31 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मान्यतेने नात्याअंतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील चार प्रकरणांना आज, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम आदेश देण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना त्यांच्या हक्काचे बालक मिळाल्याने त्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला.


जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच साक्षीदार यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली.


संबंधित प्रकरणे बाल कल्याण समिती, हिंगोलीचे अध्यक्ष सुधाकरराव इंगोले व सदस्यांसमोर सादर करण्यात आली. समितीची मान्यता मिळाल्यानंतर दत्तक नियमावली-2022 नुसार संबंधित प्रकरणांसाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडून (CARA) पूर्वमंजुरी पत्र प्राप्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात सुनावणी घेऊन दत्तक प्रक्रियेबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आले.


ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


नात्याअंतर्गत दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रियेसाठी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

00000

शासकीय वसतिगृह खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन* आदिवासी विकास विभागाचे स्पष्टीकरण: प्रशासकीय नियंत्रण शासनाकडेच

 हिंगोली, दि. 31 (जिमाका) : काही वृत्तपत्रांमध्ये “आदिवासी विद्यार्थी वसतिगृहांच्या खासगीकरणाचा डाव” किंवा “वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपवले” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णतः चुकीची, गैरसमजातून पसरवलेली व सत्यपरिस्थितीला धरून नाही. वसतिगृहांचे नियंत्रण, मालकी व संपूर्ण प्रशासकीय कारभार हा पूर्णतः शासनाकडेच असल्याचे स्पष्टीकरण आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आले आहे.


आदिवासी विकास विभागाचे राज्यात 490 शासकीय वसतिगृहे असून, त्यांची विद्यार्थी क्षमता 65,084 इतकी आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबविणेकामी नागपूरच्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा कार्यकाळ 3 वर्षांचा (15 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2028) आहे. संबंधित संस्था स्वयंम प्रेरणेने व कोणताही मोबदला न घेता विविध उपक्रम राबविणार आहे. या संस्थेला वसतिगृहांची इमारत, मालमत्ता किंवा प्रशासकीय व्यवस्थापनाचे अधिकार हस्तांतरित केलेले नाहीत.


कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था सामंजस्य कराराअंतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत राहणार आहे. उद्योजकता विकास कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन शिबीर व्याख्यान, व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक योजना व शिष्यवृत्ती यांची माहिती, विद्यार्थी विकास मेळावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, आर्थिक साक्षरता, संविधान अभ्यास वर्ग, महापुरुष जयंतीनिमित्त कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन, अभ्यास निसर्ग, पर्यटन सहलीचे आयोजन, सेवा शिक्षण उपक्रम, संस्था भेटी, अनुसूचित जमाती शासकीय योजनांची माहिती, वसतीगृहांवर नियमित आरोग्य तपासणी, वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे- आवश्यक समन्वय, पाठपुरावा, वसतिगृहांतील एकूण समस्या, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेणेसाठी सर्वेक्षण करणे यांसारखे 18 मोफत उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे सर्व उपक्रम वसतिगृह आवारात संबंधित प्रकल्प अधिकारी व गृहपाल (Warden) यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच होणार आहे. मुलींच्या वसतिगृहात केवळ महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आणि महिला गृहपालांच्या उपस्थितीतच वर्ग घेतले जाणार आहे. दरम्यान, आदिवासी वसतिगृहांचे कोणतेही खासगीकरण झालेले नाही. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मोफत व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा शैक्षणिक व सामाजिक स्वरूपाचा पुढाकार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांनी कोणत्याही अफवांवर किंवा गैरसमजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे.

30 August, 2026

खेळाडूंनी हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 जिल्हाध‍िकाऱ्यांच्या हस्ते खेळांडूचा गौरव, राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

  हिंगोली, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील खेळाडूंनी उपलब्ध क्रीडा सुविधांचा प्रभावी वापर करावा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज व्यक्त केली. 

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांसह उपस्थ‍ितांकडून अभिवादन करण्यात आले. 

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यपातळीवर प्राविण्य मिळवून हिंगोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रा. बंकट यादव यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, हॉकी असोसिएशन, हिंगोलीचे अध्यक्ष ओमप्रकाश लेले, सचिव केशव दुबे, हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, जितेंद्र भट्ट, प्रा. आनंद भट्ट, अंध क्रिकेट असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष गजानन मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, हिंगोली जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश गंगावणे, हिंगोली जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले, माजी सेनगाव तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमास खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी प्रविण कोंडेकर, गणेश बोडखे, क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण, वसीम शेख व अर्जुन पवार यांनी पुढाकार घेतला.
*******

हळद संशोधन केंद्राची बोधचिन्ह स्पर्धा

 देशभरातील कल्पकांना संधी, पहिले बक्षीस एक लाख रूपये 
 स्पर्धेत सहभागासाठी 10 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
 मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, आमदार हेमंत पाटील यांचे स्पर्धेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

      हिंगोली, दि. 29 (जिमाका) : हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या बोधचिन्ह स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे. निवड झालेल्या उत्कृष्ट बोधचिन्हास एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे किंवा ई-मेलवर आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी hbthratc@gmail.com या ई-मेलवर तसेच 9284774867, 9168912891 आणि 9518540058 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे हरिद्रा केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. 

बोधचिन्ह स्पर्धा महाराष्ट्रासह देशभरातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि हौशी डिझायनर्ससाठी खुली आहे. संस्थेचे कार्य, उद्दिष्टे आणि हळद पिकाशी संबंधित संकल्पना साकार करणारे आकर्षक व अर्थपूर्ण बोधचिन्ह तयार करून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये व प्रशस्तीपत्र, तर तीन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी 11 हजार रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. बोधचिन्ह पूर्णपणे मूळ स्वरूपाचे असावे. त्यावर कोणत्याही प्रकारचा कॉपीराइटचा दावा नसावा. लोगोची संकल्पना, डिझाइनमागील विचार व त्याचा अर्थ स्पष्ट करणारी संकल्पना टिपण (Description/Concept Note) सादर करणेही आवश्यक आहे.

स्पर्धकांनी उच्च दर्जाच्या पीडीएफ स्वरूपात आपले डिझाइन अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे सादर करावे. निवड झालेल्या बोधचिन्हाचे सर्व कॉपीराइट व वापर अधिकार संस्थेकडे राहतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असेही श्री. कच्छवे म्हणाले.
                                                             *****

28 August, 2026

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य

जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार

हिंगोली, दि. २८ (जिमाका) : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान, नंतर मातेच्‍या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्‍तक्षय  हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०१५ मध्ये आरोग्य विभागाला आयर्न सुक्रोजच्या माध्यमातून ॲनिमियावरील उपचार राबविण्याचे निर्देश दिले होते. यामुळे राज्यातील गरोदर मातांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात विभागाने तीव्र रक्तक्षयावरील मोफत उपचारांना गती दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आयर्न सुक्रोजचा सिद्ध आणि परिणामकारक उपचार पोहोचविण्यावर  मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरोदर मातांनाही तीव्र रक्‍तक्षय विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यरत आहे. तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना वेळेत उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे सुरक्षित मातृत्वाचा पाया अधिक भक्कम होत आहे.

तीव्र रक्‍तक्षयावर आयर्न सुक्रोज तसेच फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. एचएमआयएस अहवालानुसार चालू वर्षात (२०२६-२७ जुलैअखेर) नोंद झालेल्या एकूण मातांपैकी  तपासणीअंती २३५२४ गरोदर मातांची तीव्र रक्‍तक्षय असलेल्‍या अतिजोखमीच्‍या माता म्हणून निदान झाले आहे. त्‍यापैकी २१३३७ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) द्वारे उपचार देण्यात आले असून उपचाराचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणीवर भर (Four T Strategy)

गरोदरपणातील तीव्र रक्तक्षयामुळे माता आणि गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येचे वेळीच निदान करून उपचार देणे, उच्च जोखमीच्या मातांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि उपचारानंतर पुनर्तपासणी करणे यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत ‘तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणी’ही साखळी अधिक परिणामकारक करण्यासाठी (Four T Strategy Test, Talk, Treat, Track ) नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘ ॲनिमिया मुक्त  भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१८-१९ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यावरील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना आयर्न सुक्रोज इंजेक्शनद्वारे उपचार देण्यात येत होते. सन २०२४-२५ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोजसोबत, अधिक प्रभावी असलेले इंजेक्‍शन फेरीक कार्बोक्सी माल्टोजही उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे उपचारांचे पर्याय वाढले असून पात्र मातांना गरजेनुसार जलद व प्रभावी सेवा देणे शक्य झाले आहे.

उपचार पद्धतीचा प्रभावी आणि सुरक्षित वापर व्हावा, यासाठी जानेवारी २०२६ मध्ये राज्यस्तरावर वैद्यकीय अधिकारी व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच औषधांचा पुरेसा साठा, वेळेत संदर्भ सेवा आणि उच्च जोखमीच्या गरोदर मातांची स्वतंत्र नोंद ठेऊन उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे आरोग्य विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे. या वर्षात जिल्हानिहाय कामगिरीत अनेक जिल्ह्यांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे. अहिल्‍यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्‍नागिरी, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यात १०० टक्के तीव्र रक्‍तक्षयाच्‍या मातांना  उपचार देण्‍यात आले आहेत. नागपूर, सिंधूदूर्ग, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, पुणे, हिंगोली, जालना, धाराशिव व ठाणे या जिल्ह्यांनी ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत तीव्र रक्‍तक्षयाच्‍या मातांना उपचार देऊन साध्य पूर्ण केले आहे. ही कामगिरी राज्यातील मातृ आरोग्य यंत्रणेची तत्परता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य होत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातही उपचार सेवा प्रभावीपणे पोहोचत आहे. लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्‍हापूर, उल्‍हासनगर, नांदेड-वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी व सांगली-मिरज कुपवाड  या क्षेत्रांमध्ये उपचारांचे प्रमाण १०० टक्‍के आहे. इतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पात्र मातांपर्यंत उपचार वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पाठपुरावा करण्यात येत आहे. उपचारांचे प्रमाण तुलनेने कमी असलेल्या नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या भागांमध्ये जिल्हानिहाय उद्दिष्टे निश्चित करून आशासेविका, आरोग्यसेविका, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार कव्हरेज वाढविण्यावर भर दिला जात आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाने तीव्र रक्तक्षय असलेल्या सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आयर्न सुक्रोज,फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शन देण्यासाठी जानेवारी 2026  ते मार्च 2026 अखेर विशेष मोहीम राबविली आहे. गरोदर मातांवर रक्तक्षयाचे उपचार नेहमी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच करावी लागतात. 

गर्भधारणेची नोंद होताच प्रत्येक महिलेची हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक ऍसिडच्या नियमित सेवनाबाबत समुपदेशन, पोषक व लोहयुक्त आहाराची माहिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एचएमआयएस अहवालाच्‍या माध्यमातून जिल्हा व तालुकानिहाय तपासणी, निदान आणि उपचाराच्या प्रगतीचे नियमित विश्लेषण केले जात आहे. 

आयर्न सुक्रोजचे / फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे फायदे

* रक्‍तातील हिमोग्लोबिन आणि शरीरातील लोहाचा साठा वेगाने वाढवण्यास मदत होते.
* रक्‍तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारल्याने ऊर्जा मिळते. मरगळ व थकवा कमी होतो.
* तोंडाव्‍दारे देण्‍यात आलेल्‍या आयर्न (लोहयुक्‍त) गोळ्यांमुळे होणारा मळमळ किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास या इंजेक्शनमुळे टाळता येतो.
* गर्भधारणा व किडनीच्या आजारात याचा उपयोग चांगला होत आहे. तीव्र अशक्तपणा किंवा दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराच्या (CKD)RELATED समस्या असलेल्या महिलांवर उपचारासाठी आयर्न सुक्रोज फायदेशीर आहे.
* या उपचार पद्धतीमुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अकाली प्रसूती, प्रसूती दरम्‍यान/नंतर रक्तस्त्राव, माता मृत्यू यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन

हिंगोली, दि. २८ ऑगस्ट:- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना आवश्यक बाबींची पूर्तता करून महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

महाडीबीटी 2.0 वर नोंदणी करून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नवीन ‘महाआयडी’ तयार करणे आवश्यक आहे. मागील पोर्टलवरील जुना आयडी किंवा पासवर्ड यापुढे आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.

नवीन अर्ज तसेच नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी व आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत.

प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे आवाहन

शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापूर्वीच्या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रीशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या तात्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण अर्ज 30 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा. अन्यथा शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची राहील.

सर्व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची विहित कालावधीत अथवा त्यापूर्वी प्राधान्याने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असेही सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी आवाहन केले आहे.

27 August, 2026

औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी

• आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर

मुंबई, दि. २७ : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली.

 औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा 

            औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

 कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी 
 नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.

 नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
००००

आयुष्मान कार्डसाठी स्वतंत्र कक्ष


▶शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत सुविधा
▶ गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे अधिष्ठाता डॉ. मुंगल यांचे आवाहन

हिंगोली, दि. २७ (जिमाका) : सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. बाह्यरुग्ण नोंदणी (ओपीडी) कक्षाच्या शेजारी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी सांगितले.

या कक्षामुळे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एकाच ठिकाणी आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिक व रुग्णांनी या कक्षाला भेट देऊन आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, असेही डॉ. मुंगल म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळतो. हृदयविकार, कर्करोग व अस्थिरोग यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांचाही यात समावेश आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागणारी औषधे, निदानात्मक तपासण्या व निवासाचा खर्चही योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. हे कार्ड देशभरातील नोंदणीकृत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी ग्राह्य धरले जाते. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

*कार्ड काढताना येणाऱ्या अडचणींसाठी उपाय*
नवविवाहित महिलेचे नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये नसल्यास तहसील कार्यालयात आवश्यक कार्यवाही करून नाव समाविष्ट करून घ्यावे. आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास किंवा क्रमांक बंद असल्यास आयुष्मान कक्षात बायोमेट्रिक अथवा फेस ऑथेन्टिकेशनद्वारे पडताळणी करून कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आधार कार्ड व रेशन कार्डवरील नावात फरक असल्यास रेशन कार्डाचे ई-केवायसी अद्ययावत असणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार मतदार ओळखपत्रासारखा इतर ओळखीचा पुरावाही सादर करता येईल. रेशन कार्डमध्ये नाव नसल्यास प्रथम तहसील कार्यालयामार्फत नाव नोंदवून घ्यावे.
सर्व्हर किंवा तांत्रिक अडचणीमुळे कार्ड काढण्यास विलंब झाल्यास संबंधित नागरिकांना टोकन देण्यात येईल. त्यानंतर निश्चित वेळेत कार्ड तयार करून देण्यात येईल, असेही डॉ. मुंगल म्हणाले.

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. -खासदार नागेश पाटील आष्टीकर

विविध विकास कामांचा 'दिशा समिती'कडून सर्वंकष आढावा

हिंगोली, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने प्रभावीपणे काम करावे. सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजना व कामांचा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, दिशा समितीचे सदस्य संदीप ससे, दयानंद पतंगे, श्रीमती शारदा पोपळघाट, श्रीमती शशिकला भवर, भास्कर घोडके, श्रीमती अश्विनी इंगोले पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मागील बैठकीतील निर्णयांवर झालेल्या कार्यवाहीचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. विविध विकास योजनांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती, पूर्ण व अपूर्ण कामे आणि प्रलंबित कामांची कारणे याबाबत विभागनिहाय माहिती घेण्यात आली.

महावितरण, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि जलजीवन मिशनसह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जलजीवन मिशन, भारतनेट, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.


विविध योजनांबाबत बैठकीसाठी परिपूर्ण आणि अचूक माहिती सादर करावी. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. अपूर्ण माहिती सादर झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रामराव वडकुते यांनी दिला.

*मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे*

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तसेच शाळांमध्ये सौर पॅनल उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार आष्टीकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या.





*आयुष्मान भारत कार्ड वाटपाला गती*

आयुष्मान भारत कार्ड पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे खासदार आष्टीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकास योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित कामांना गती आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

******

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

हिंगोली दि. २७ ऑगस्ट:- महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका बळकट करणे, या उद्देशाने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी आभासी माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या लाखो युवकांशी तसेच परभणी जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधला.

यानिमित्ताने हिंगोली न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि मेरा युवा भारत (MY Bharat), हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

‘युवा कनेक्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. 

या कार्यक्रमास  माजी आमदार  गजाननराव घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे  प्राचार्य माननीय प्रा.डॉ.नामदेव सोळंके इन्द्र मणि  माध्यमातून अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव मुटकुळे, मेरा युवा भारत चे प्रविण पांडे, राष्ट्रीय सेवा योजना चे  डॉ.पवन वासनिक, Youth आयकॉन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते पुष्यमित्र जोशी तसेच कबडी  विजेते खेळाडू श्री. शेख नोमान यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी युवकांना क्रीडा, युवाशक्ती आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांच्या भूमिकेबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमात माननीय केंद्रीय क्रीडामंत्री, माननीय क्रीडा राज्य मंत्री, विविध राज्यांचे माननीय मुख्यमंत्री तसेच देशभरातील,  विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी, प्राचार्य, शास्त्रज्ञ प्राध्यापक, आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आभासी माध्यमातून सहभागी झाले.

माननीय केंद्रीय क्रीडामंत्री श्री. मनसुख मांडविया यांनी युवकांना योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्माणात योगदान देणारे महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या माध्यमातूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास येईल, असे त्यांनी नमूद केले. युवकांना घडविण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास, उद्योजकता विकास आणि रोजगाराच्या विविध संधींची दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून युवकांना २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी भारतीय खेळाडू तयार करण्याबरोबरच त्यांचा शारीरिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार गजाननराव घुगे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा युवकांसाठीचा संदेश महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ‘सशक्त भारत, नशामुक्त भारत’ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही आई-वडिलांची अपेक्षा आपल्या पाल्याने सुसंस्कृत होऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी असते; मात्र अनेक युवक व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. त्यांना या विळख्यातून बाहेर काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. मोबाईलचे अतिवापराचे व्यसनदेखील सध्याच्या काळातील गंभीर समस्या असून, युवकांनी त्यापासून दूर राहावे आणि इतरांमध्येही याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

शरीरसंपदा जपण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळाची आवड जोपासावी, असे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकत आहेत. खेळाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात; जात-धर्माचा भेद राहत नाही आणि एकोपा वाढतो. त्यामुळे सर्वांनी खेळाला महत्त्व द्यावे, तसेच युवकांनी परस्परांशी अधिकाधिक संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा.(डॉ.) नामदेव सोळंके यांनी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असून, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे घटक असून, देशाचे यश आणि अपयश हे युवकांच्या शक्तीच्या योग्य वापरावर अवलंबून आहे. युवकांकडे मोठी ऊर्जा आणि क्षमता आहे; तिचा योग्य दिशेने उपयोग केला पाहिजे. आजचे युवक भविष्यात देशाची धुरा सांभाळणारे व्यक्तिमत्त्व असतील आणि त्यांच्या हातून देश घडणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात ‘युवा कनेक्ट’ च्या माध्यमातून युवकांशी सातत्याने संवाद व समन्वय ठेवणे आवश्यक आहे. यातूनच देश आणि समाजाचे हित साध्य होईल. विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनेही त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी हे केवळ स्वतःच्या भविष्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठीही महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी सदैव संपर्कात राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना निःसंकोचपणे संपर्क साधता येईल, असे वातावरण महाविद्यालय मध्ये निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘युवा कनेक्ट’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दृढ नाते असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाची माहिती देताना क्रीडा संस्कृती जपण्यासाठी अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या अनुषंगाने भारताला क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. भारतातील पारंपरिक व महत्त्वाच्या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज असून, शरीर, मन आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रम मेरा युवा भारत चे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर व अनिल जी ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा टोपे यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे पवन वासनिक  यांनी मानले.

यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. तसेच कबड्डी खेळाडू शेख नोमान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पवन वासनिक, प्रा.बी.बी चव्हाण, प्रा.गौरव गोरे  प्रा.सिद्धार्थ खंदारे, प्रा.स्नेहा शिर्के, प्रा.सुनील पाटील, प्रा.आतिश कदम व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास महाविद्यालयांतील  अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम होणार साजरा--सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन

हिंगोली, दि. २७ ऑगस्ट : सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केले. या अन्यायकारक कायद्यामुळे या समाजातील बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार व सामाजिक अन्याय सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या संधी मिळण्यास विलंब झाला. परिणामी, या समाजावर दीर्घकालीन सामाजिक परिणाम झाले.


स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act रद्द करण्यात आला आणि या समाजातील जातींना ‘भटके विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये भटके विमुक्त समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळ तसेच राष्ट्र उभारणीतील या समाजाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे.


या अनुषंगाने 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमास संबंधित अधिकारी, कर्मचारी, भटके विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

हिंगोली, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे

26 August, 2026

नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

हिंगोली, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर *हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,* त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे

25 August, 2026

मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत शेतकरी जागृकता कार्यक्रम संपन्न

हिंगोली, दि. 25 ऑगस्ट : केंद्रीय रेशीम मंडळ व जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत मौजे लिंबी, ता. हिंगोली येथे शेतकरी जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांच्यासह परिसरातील पुरुष व महिला रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर यांनी तुती लागवड, रेशीम किटकांचे संगोपन तसेच जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. रेशीम शेती करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, शासकीय योजनांचा लाभ आणि उत्पादनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. रेशीम शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी, बाजारपेठेची उपलब्धता तसेच भविष्यातील रेशीम शेतीच्या विविध संधींबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न वाढविता येते, असा विश्वास व्यक्त करत आपल्या अनुभवातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रेशीम कार्यालयातील श्री. रंभापूरे, श्री. ठमके व श्री. मगर यांनी परिश्रम घेतले.
०००००

२०४ आश्रमशाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार


हिंगोली दि. 25, (जिमाका) राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागामार्फत सध्या राज्यभरात 'अॅनिमिया निवारण कार्यक्रम' युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५,८६८ तर ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२,४२० तसेच ६ एकलव्य शाळांमधील १,३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 'सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स' (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे. या मोहिमेत ३७,९१९ विद्यार्थ्यांचे तर ४१,७०५ विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. नाशिक विभागातील १०४ शाळांमधील एकूण ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१,३९३ तर २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९२२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

ठाणे विभागातील ८१ शाळांममधील एकूण ३३,४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२,०५४ तर, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १०,८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २,८९८ आणि १,८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १,८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या १,०१३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १,२९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

दरम्यान, या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये एचबीचे प्रमाण कमी आढळले, त्यांना पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

चौकट 

विभागनिहाय विद्यार्थी संख्या

नाशिक- ४१,४६९

ठाणे- ३३,४२६

अमरावती- २,८९८

नागपूर- १,८१३


प्रतिक्रिया

आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 'अॅनिमिया निवारण कार्यक्रमा'च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयासारख्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. 

-लीना बनसोड, आयुक्त

आदिवासी विकास विभाग

दिव्यांग सक्षमीकरणाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

 

हिंगोली दि. 25, (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सेवा व सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत केल्या. 


बैठकीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यान्वयन व मनुष्यबळ बळकटीकरण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामाचा आढावा, दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षण,  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी केंद्रीय अनुदानाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतच्या कार्यवाहीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक दत्ताजी केंद्रे,  छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी सेवा संघाचे संचालक विजय घाणेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली.


बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सन 2026-27 मधील 18 प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली. या सर्व प्रकरणांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेत याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गुट्टे यांनी बैठकीत विविध प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर केली.

27 ऑगस्टला खेलो इंडिया संवाद-युवा कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. २५ ऑगस्ट : आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), हिंगोली यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 27 ऑगस्ट 2026 रोजी न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे करण्यात आले आहे.

मेरा युवा भारत, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी केले  आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतीक मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्ताने देशभरात युवकांचा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मिती यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि युवकांच्या आकांक्षा याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आभासी संवाद, 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1 हजार 600 ठिकाणांहून 8 लाखांहून अधिक युवक या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवाद आयोजित करण्यात येणार आहे. या संवादामध्ये भारतातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेला बदल, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था याबाबत चर्चा केली जाणार आहे.

कार्यक्रमात ‘युवा संवाद’आयोजित करून युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना आणि आकांक्षा मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. 

या चर्चेत पुढील प्रमुख विषयांवर विचारमंथन करण्यात येईल :

 क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण – दर्जेदार क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, प्रशिक्षण व्यवस्था आणि तळागाळातील क्रीडा संधी उपलब्ध करून देणे.

2036 ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन – वैज्ञानिक पद्धतीने क्रीडा प्रतिभा शोधणे, खेळाडूंची निवड व विकास आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण.

युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग – युवकांना निर्णयप्रक्रिया, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेणे.

विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण – भविष्याभिमुख कौशल्ये, स्वयंसेवा, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध संधींमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे.

युवकांच्या सूचना व कल्पना क्युआर कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quiz मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

*****

24 August, 2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा

 पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.


*प्रतिक्रिया :*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

23 August, 2026

एड्स नियंत्रणातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस व जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा गौरव

हिंगोली, दि. २३ (जिमाका) : एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन २०२५’मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा आज राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त (शहरी विभाग) तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या हस्ते डॉ. तडस आणि श्री. चौधरी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून एड्स प्रतिबंध व जनजागृतीसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची राज्यस्तरावर यापूर्वीही दखल घेण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय एड्स नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या ‘इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन २०२५’मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोलीच्या कार्याची पुन्हा एकदा राज्यस्तरावर नोंद झाली असल्याचे श्री.चौधरी म्हणाले.

21 August, 2026

राष्ट्रीय क्रीडा दिनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार

 हिंगोली, दि. २१ (जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा २९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता येथे आयोजन  करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी कळवले आहे.

जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंनी त्यांच्या प्रमाणपत्रांची छायांकित प्रत २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावी.

या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी तसेच सत्कारासाठी पात्र खेळाडूंनी २५ ऑगस्टपर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  'महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर' अभियानाचा उत्साहात शुभारंभ  हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मृद व जलसंधारणाची घेतली शपथ






हिंगोली, दि. २१ (जिमाका):  महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब नागरिकांनी जपून वापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोलीतील मृद व जलसंधारण विभागच्यावतीने मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले होते.  आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी गुप्ता,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून महा-वॉकेथॉनला जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथून सुरूवात झाली.

उद्घाटनप्रसंगी आमदार श्री. बांगर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश उपस्थितांना दिला.  जलसंधारण अभियानाअंतर्गत प्रत्येक विभाग प्रमुखांनी तर 15  ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 दरम्यान त्यांच्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, असे सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी याप्रसंगी आवाहन केले.

मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.  जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे, पाण्याची टाकी असा मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महा-वॉकेथॉनचा समारोप झाला.

महा-वॉकेथॉनमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वॉकेथॉनप्रसंगी नागरिक, तरूणाईने जलजागृतीपर घोषणा दिल्या.

महा-वॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हिंगोलीत २५ ऑगस्टपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


हिंगोली, दि. २१ (जिमाका) : श्रावण मास तसेच आगामी धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी ००:०१ वाजेपासून ८ सप्टेंबर रोजी २३:५९ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सदरील आदेश निर्गमित केले आहेत. नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रे, काठ्या, दगड, स्फोटक व ज्वलनशील पदार्थ तसेच इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील, सार्वजनिक शांतता भंग होईल अथवा अराजक निर्माण होईल, अशा घोषणा, फलक, अंगविक्षेप किंवा कृती करण्यासही मनाई आहे.

जिल्ह्यात ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रावण सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला आदी धार्मिक सण-उत्सव होणार आहेत. तसेच विविध सामाजिक व राजकीय मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको व उपोषण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदरील आदेश लागू करण्यात आले आहेत.

शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची विशेष परवानगी असलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना आदेश लागू राहणार नाहीत. विशेष परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील, असेही आदेशात नमूद आहे.

20 August, 2026

हिंगोलीत उद्योजकता मेळाव्यात ७८ नवउद्योजकांचा सहभाग

 

हिंगोली, दि. २० (जिमाका) : युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित उद्योजकता मेळाव्यात जिल्ह्यातील ७८ नवउद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्यात विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धी आणि उद्योग विस्ताराच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि ‘दे-आसरा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हिंगोली येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आयटीआयचे प्राचार्य रवी बोथीकर यांनी युवक आणि महिला बचत गटांनी अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. कौशल्य, सातत्य आणि योग्य नियोजनातून यशस्वी उद्योजक होता येते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अनिल कदम आणि जिल्हा उद्योग अधिकारी श्री.पतकी यांनी उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय योजना, सुविधा आणि प्रोत्साहनपर योजनांची माहिती दिली. कर सल्लागार सुनील झवर यांनी करप्रणाली व आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

सावंत डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक भगवान सावंत यांनी उद्योग उभारणी व विस्तारातील प्रत्यक्ष अनुभव सांगितला. ‘दे-आसरा फाउंडेशन’च्या रुपाली श्रीमाळ आणि ऐश्वर्या कुलकर्णी यांनी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय नीती याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि उद्योग विस्ताराच्या विविध बाबींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ टोणपे यांनी केले.

जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया --संजय राठोड, मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

जलसंधारण दिन विशेष

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधारआहे. बदलते हवामानआणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.

जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते.

भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली

भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.

जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन

जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे.

हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर

आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.

गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्येमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे.विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत.या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.

जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ

महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.“माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा”हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया

जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

पाणी अडवूया… पाणी जिरवूया…

माती वाचवूया… पाणी जपूया…

आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया !

0000

महा-वॉकेथॉन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जलसंधारण दिनानिमित्त विशेष उपक्रम

 हिंगोली, दि. २० (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तीन किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. महा-वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

19 August, 2026

हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ९ हजार ५९९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

योजनेच्या जिल्हास्तरीय प्रक्रियेंतर्गत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

वयस्कर, बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या*

*
*शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित*
                                      - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
 कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना

          हिंगोली, दि. १९ (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. योजनेच्या पोर्टलवरील संबंधित क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे कर्जखात्याची माहिती तपासल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. यादीमधील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची विस्तृत माहिती दिसेल. या माहितीनुसार मान्य, अमान्य पर्यायाची नोंद झाल्यानंतर ऑनलाइन बोटाच्या ठशांची नोंद घेण्यात येईल.

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचा ठसा जुळत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीन प्रयत्नांनंतरही आधार प्रमाणीकरण झाले नाही, तर ‘"प्रमाणीकरण शक्य नाही" हा पर्याय निवडावा. यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने आधार प्रमाणीकरण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदारांकडे पाठविण्यात येईल.

तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्याची कागदपत्रे (उदा.आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा इ.) तपासून ओळख निश्चित केली जाईल. आधार क्रमांक आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओळख निश्चित झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. वयस्कर तसेच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाबाबत निश्च‍ित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


 हिंगोली, दि. १९ (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी या कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना दिले आहेत.

योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत शेतकरी असल्यास, त्याच्या वारसाची माहिती घेऊन कर्जखात्याचा वारस नोंदवावा. त्यानंतर पोर्टलवरील‘Upload Deceased Accounts सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी.

बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना BR-ID, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, AgriStack Registry, CIF, बचत खाते क्रमांक, PAC ID, PACS Membership Number, Loan Account Number आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहिती देणे आवश्यक आहे.

एका BR-ID अंतर्गत किमान एक आणि कमाल सहा कायदेशीर वारसांची नोंद करता येईल. प्रत्येक वारसाचा कर्जातील हिस्सा नोंदविणे आवश्यक आहे. सर्व वारसांच्या हिस्स्यांची एकूण बेरीज १०० टक्के असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक हिस्सा असल्यास प्रणाली नोंदणी स्वीकारणार नाही.

माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित कर्जखात्याची आवश्यक तपासणी करावी. तसेच तक्रार निवारण स्थिती आणि e-KYC पडताळणीसह प्रणालीतील प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे.

माहिती सादर केल्यानंतर शासन निर्णयातील निकषांनुसार स्वयंचलित छाननी केली जाईल. वारस आयकरदाता आहे किंवा नाही, तसेच तो शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल. निकषांनुसार अपात्र आढळणाऱ्या वारसांना योजनेच्या लाभासाठी अपात्र घोषित केले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित बँकांनी मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक कार्यवाही करून वारसांची माहिती पोर्टलवर तातडीने अद्ययावत करावी, अशा सूचनाही ‍जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे -BSA प्रणालीद्वारे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा

 


हिंगोली, दि. १९ (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांतील पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे, नातेवाईकामार्फत किंवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक अथवा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्रातूनही ही सुविधा उपलब्ध आहे.


ही सेवा लाभार्थ्यांसाठी निशुल्क आहे. मात्र, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा घेतल्यास  कमाल ५० रुपये सेवा शुल्क देय राहील. शासन निर्णय, दि. ७ मे २०२६ नुसार हयात प्रमाणपत्र सादर करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.


*अशी करा प्रक्रिया*


हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी प्रथम Google Play Store अथवा iOS वरून BSA (Beneficiary Satyapan App) आणि Aadhaar Face RD हे अॅप डाउनलोड करावे.


BSA अॅपमध्ये भाषा निवडून ‘Proceed For Device Registration’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवून Device Registration पूर्ण करावे.


त्यानंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे, त्या केंद्र किंवा राज्य पुरस्कृत योजनेची निवड करून ‘Beneficiary Verification’ हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक आणि उपलब्ध मोबाईल क्रमांक नोंदवून ‘Submit’ करावे.


यानंतर प्राप्त झालेला OTP नोंदवावा. त्यानंतर चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांचे ठसे/डोळ्यांच्या बुबुळाची (Finger/Iris) पडताळणी यापैकी उपलब्ध पर्याय निवडावा. निवडलेल्या पर्यायानुसार पडताळणी पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र तयार होईल.


प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Digital Life Certificate डाउनलोड करावे. विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही कार्यवाही विहित पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महावॉकेथॉन




हिंगोली, दि. १९ (जिमाका) :** ‘जलसंधारण दिना’निमित्त हिंगोली शहरात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. तीन किलोमीटर अंतराची ही महावॉकेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

महावॉकेथॉनचा प्रारंभ सकाळी ६ वाजता **छत्रपती शिवाजी महाराज पुतळा** येथून होणार आहे. तेथून **जिल्हा परिषद प्रशाला मैदान – नवीन न्यायालय इमारत – जिल्हाधिकारी कार्यालय – पोलीस अधीक्षक कार्यालय – नांदेड नाका – इंदिरा गांधी चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – निर्मल कॅफे – पाण्याची टाकी – जिल्हा परिषद प्रशाला मैदान** असा महावॉकेथॉनचा मार्ग राहणार आहे. जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महावॉकेथॉनची सांगता होईल.

पाणी हेच जीवन, पाणी हेच भविष्य’** तसेच **‘जलसंधारण करू, पाणी वाचवा’** हा संदेश महावॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. माती व पाण्याचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी तसेच सर्व नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून **जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास हातभार लावावा**, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

18 August, 2026

*जलसंधारण दिनानिमित्त हिंगोलीत २१ ऑगस्टला ‘महा-वॉकेथॉन’*


हिंगोली, दि. १८ (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ३ किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

*‘रिल्स’ स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस*

महा-वॉकेथॉनसोबतच १५ ते १९ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही स्पर्धेची थीम आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येईल.

रील ३० ते ६० सेकंदांची असावी. सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram खात्यावर पोस्ट करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरावा. विभागाच्या अधिकृत mahawalkathon2026 खात्याला टॅग करावे. त्यानंतर अधिकृत QR कोडद्वारे नोंदणी करून रीलची लिंक सादर करावी.

स्पर्धेतील प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला मैदान, हिंगोली येथे होईल. महा-वॉकेथॉन आणि रिल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्वळ यांनी केले आहे.