हिंगोली(जिमाका), दि. ६ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला जिल्हाभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ११ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १ हजार ९२८ नागरिकांनी आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक उपचारांचा लाभ घेतला.
नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांमध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आवश्यक औषधोपचार, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा सुलभपणे उपलब्ध झाल्या.
दरम्यान, सुरक्षित रक्तसाठा उपलब्ध राहावा तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने अभियानांतर्गत ३ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १४२ स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संलग्न रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच स्वेच्छा रक्तदाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत भविष्यातही अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून सांगण्यात आले.
*******

No comments:
Post a Comment