05 August, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

 



हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 44 हजार 223 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील 44 हजार 223 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 27 हजार 111 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 17 हजार 966 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

प्रलंबित ई-केवायसीपैकी 16 हजार 687 शेतकरी राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. यामध्ये एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांच्या शाखांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. 

या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्रलंबित ई-केवायसीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. 

*****

No comments: