05 August, 2026

हिंगोली शहरातील 11 अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 

कोटपा कायद्यांतर्गत 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल; जिल्हाभर मोहीम सुरूच राहणार




हिंगोली (जिमाका), दि. 5 : जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरातील अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील नारायण नगर, खटकाळी बायपास, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पोस्ट ऑफिस रोड परिसरातील अवैध पान टपऱ्यांची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान 11 पान टपऱ्यांवर कोटपा कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तरित्या केली. पोलीस विभागातर्फे पोलीस हवालदार शेख मोहसीन व पोलीस शिपाई भूषण जोगे यांनी सहभाग घेतला. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्यासह कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) तसेच मराठा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या अनधिकृत विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी आणि कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात दंडात्मक कारवाईची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

******

No comments: