02 July, 2026

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार

 

१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर


मुंबई, दि. २ : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करणे शक्य झाले.

  सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली.

  नातेवाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सहकार्याने २५ जून रोजी आर्थिक सहाय्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकडे अर्ज सादर करण्यात आला.

 अर्ज प्राप्त होताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रकरणावर तातडीने कार्यवाही केली. अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उपचारात कोणताही विलंब न होता आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध होऊ शकली.

  या आर्थिक मदतीबद्दल सरूबाई मुंजवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य कमीत कमी कालावधीत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सरूबाई मुंजवार यांच्या प्रकरणात अर्ज प्राप्त होताच आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी देण्यात आली. आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अल्पावधीत आर्थिक सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती अवलंबिली जाते. गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहिती अथवा मार्गदर्शनासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००



खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू • पात्र तंत्रज्ञांनी योजनेचा लाभ घ्यावा



हिंगोली (जिमाका), दि. 2 : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत सन 2026-27 मध्ये खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना कृत्रिम रेतन व पशुलसीकरण सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रीय गोकुळ अभियानाच्या 24 व्या राष्ट्रीय संचालन समितीच्या निर्णयानुसार, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना ही प्रोत्साहनपर अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने कृत्रिम रेतन, टॅगिंग व लसीकरणाच्या सर्व नोंदी ‘भारत पशुधन प्रणाली’वर करणे अनिवार्य करण्यात आले असून, त्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या योजनेचा मुख्य उद्देश पशुधनाची गुणवत्ता सुधारणे, ग्रामीण भागात कृत्रिम रेतन व लसीकरण सेवांचा विस्तार करणे तसेच पशुधनाचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करणे हा आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गायी व म्हशींना कृत्रिम रेतन करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 50 रुपये, कृत्रिम रेतनामुळे वासरू जन्माला आल्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 100 रुपये, गाय, म्हैस व वराह यांचे टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 5 रुपये, शेळ्या व मेंढ्यांचे टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 3 रुपये, गाय, म्हैस व वराह यांचे लाळखुरकत लसीकरण करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 5 रुपये, शेळ्या व मेंढ्यांचे लाळखुरकत लसीकरण करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 4 रुपये, ब्रुसेल्ला लसीकरण करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 5 रुपये, पीपीआर लसीकरण करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 4 रुपये, वराहांचे स्वाइन फीव्हर लसीकरण करून भारत पशुधन प्रणालीवर नोंद केल्यास 5 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023' अंतर्गत आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रशांत भड यांनी दिली आहे.

राज्यातील पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य आजारांपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम रेतन व लसीकरण मोहिमेत सर्व नोंदणीकृत खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. त्यांनी केलेल्या सर्व कामांच्या नोंदी ‘भारत पशुधन प्रणाली’ वर अचूकपणे नोंदवून प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा. तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनीही सर्व पात्र तंत्रज्ञांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

*******

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्ज मोहीम * विविध फलोत्पादन घटकांसाठी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्यात 19.11 कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून विविध फलोत्पादन घटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या योजनेअंतर्गत फळबाग लागवड, लहान व मोठ्या रोपवाटिका, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, द्राक्ष, खजूर, केळी, अननस, पपई, अवोकॅडो, अळिंबी उत्पादन, अळिंबी बीज उत्पादन केंद्र, कंपोस्ट निर्मिती, फुलशेती, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरितगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ संरक्षण कव्हर, तण नियंत्रक आच्छादन, मधुमक्षिकापालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध प्रकारचे स्प्रेअर, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कांदाचाळ आदी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. 

इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जांची निवड "प्रथम अर्ज, प्रथम लाभ" या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

यापूर्वी संबंधित घटकांसाठी अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि स्थळ तपासणी (मोका तपासणी) झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी अथवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

******

पीएम-यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 2 : इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास तसेच भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या पीएम-यशस्वी योजनेंतर्गत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास व भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या निवडक शाळांमध्ये शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास किंवा भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातील असावा. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल 2 लाख 50 हजार रुपये असावे. विद्यार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता (मेरिट) यादीद्वारे केली जाणार आहे.

सन 2025-26 मध्ये इयत्ता 9 वी किंवा 11 वीमध्ये असताना या योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आपल्या अर्जाचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे. शाळांकडून अर्जांची ऑनलाइन पडताळणी 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी संबंधित योजना आपल्या शाळेला लागू आहे की नाही, याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून करून घ्यावी. तसेच अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर यांनी अर्जाची ऑनलाइन पडताळणी केली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.


******

हिंगोली तहसील कार्यालयातील कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सखोल आढावा • प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे दिले निर्देश

 




हिंगोली (जिमाका), दि. 2 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली तहसील कार्यालयास भेट देऊन तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे आणि नागरिकाभिमुख सेवांचा सखोल आढावा घेत त्यांनी कामकाजात गती, अचूकता व पारदर्शकता राखण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार विविध प्रपत्रांची पूर्तता, शासकीय व गायरान जमिनींची सद्यस्थिती, शर्तभंग प्रकरणांचा शोध, फेरफार प्रकरणे, अॅग्रीस्टॅक नोंदणी, पीएम-किसान योजनेअंतर्गत नोंदणी, शेतरस्त्यांच्या अर्जांची निर्गती, पीक्यूजे प्रणालीचा प्रभावी वापर तसेच बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यावर भर देत नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नोंदींची अचूकता तसेच महसूल कामकाजात पारदर्शकता राखण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.

या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासमवेत हिंगोली येथील शासकीय धान्य गोदामाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी धान्य साठवणुकीची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी उपलब्ध धान्यसाठ्याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना दर्जेदार धान्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धान्य साठवणूक व वितरण व्यवस्थेमध्ये आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम • पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 2 : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी राज्यात 20 जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना पिक काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे.

या योजनेअंतर्गत बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते.

या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यात येते.

या योजनेचे लाभार्थी म्हणून वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या/संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांचा समावेश आहे.

विशेष अंमलबजावणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र शेतकरी व संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा.

तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक व इतर लाभार्थींनी कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. इच्छुक लाभार्थ्यांनी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक, आत्मा, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

*****

क्रीडांगण व व्यायामशाळा विकास अनुदान योजनांसाठी 20 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : जिल्हा नियोजन समिती, हिंगोली अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर क्रीडांगण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी (सर्वसाधारण, विशेष घटक व आदिवासी घटक) या योजनांअंतर्गत अनुदानासाठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगणे व आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी शासन निर्णय दि. 7 सप्टेंबर 2019 तसेच व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी शासन निर्णय दि. 8 जानेवारी 2019 नुसार पात्र प्रकल्पांना अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र संस्थांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये तयार करून दि. 20 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

***

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना बंद • विद्यार्थ्यांच्या पालकांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यातील कै. एल. एस. नाईक इंग्लिश स्कूल, कोळसा (ता. सेनगाव) येथे राबविण्यात येणारी "राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना" शासनाने बंद केली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते दहावीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासी पद्धतीने इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात होते. शासनाच्या निर्णयानुसार ही योजना बंद करण्यात आल्याने या योजनेतील विद्यार्थ्यांना इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

यासाठी या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तसेच इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना पर्यायी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी पालकांनी विलंब न करता कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन व पुढील कार्यवाही करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

**

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 7 मिमी पाऊस

 

  हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  7.1  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 15 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वात कमी 3.1 मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 3.1 (211.7), कळमनुरी 6.3 (157),  वसमत 15 (133.3), औंढा नागनाथ 7.6  (143.7) आणि सेनगाव तालुक्यात 3.3 (109.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 02 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  152.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 19.2 अशी आहे. 

***

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के * नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 2 : जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवार, दि. 2 जुलै 2026 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पहाटे 1.20 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर सकाळी 10.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना भूकंपापूर्वी, भूकंपाच्या वेळी आणि भूकंपानंतर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. घरांचे भूकंपरोधक बांधकाम करणे, जड वस्तू सुरक्षितपणे बसविणे, आपत्कालीन वस्तुसंच तयार ठेवणे तसेच कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क व स्थलांतर आराखडा तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भूकंपाच्या वेळी शांत राहून मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आसरा घ्यावा, खिडक्या, आरसे व जड वस्तूंपासून दूर राहावे, लिफ्टचा वापर टाळावा आणि कंपन थांबल्यानंतरच सुरक्षितपणे बाहेर पडावे. तसेच खुल्या जागेत असल्यास इमारती, झाडे, विजेचे खांब व तारा यांच्यापासून दूर राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भूकंपानंतर मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये प्रवेश करू नये, आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहावे, अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

*******

01 July, 2026

हिंगोलीच्या प्रगतिशील शेतकरी अनिल जाधव यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंगोली तालुक्यातील मौजे माळहिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गंगाराम जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2023-24 या वर्षासाठीचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार-2024’ (सर्वसाधारण गट) आज प्रदान करण्यात आला.

आज मुंबई येथील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनिल जाधव यांनी आधुनिक, शाश्वत व नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या यशाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब, मंडळ कृषी अधिकारी गणेश पवार तसेच कृषी विभाग, हिंगोलीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

********

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा - जिल्हा उपनिबंधक

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमानुसार विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एक रक्कमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती श्रीमती फुफाटे यांनी दिली.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

******

पालखी सोहळ्यासाठी सर्वांनी समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात – जिल्हाधिकारी


 


हिंगोली (जिमाका), दि. 1 : हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या श्री गजानन महाराज, श्री संत नामदेव महाराज व श्री रुक्मिणी संस्थान, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर यांच्या पालख्यांसह विविध दिंड्यांच्या वारकऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले. 

हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाते. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार विविध विभागांचे नोडल अधिकारी व समन्वय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पालखी मुक्कामस्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व स्वच्छता पथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त, फिरते वैद्यकीय पथक, व्हेंटिलेटरसह अॅम्ब्युलन्स, प्रथमोपचार सुविधा, फूट मसाजची व्यवस्था, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी, अखंडित वीजपुरवठा व प्रकाशव्यवस्था, महाप्रसाद व अन्नदान स्थळी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, पालखी मार्गावरील आवश्यक रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण तसेच अग्निशमन व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

या कामांसाठी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वारकऱ्यांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्देशित केले आहे.  

******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना शेतकरी कल्याणाला बळ

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा असून, त्यासाठी सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या शेतकरी हितैषी व लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला आहे.

दोन लाखांपर्यंत थेट कर्जमुक्ती : योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून, या योजनेसाठी जमीनधारणेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदारांनाही लाभ : यावेळी शासनाने महत्त्वाचा बदल करत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक तरतूद केली आहे. अशा शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्वी अल्प फरकामुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन : कर्जफेडीची शिस्त कायम ठेवण्यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. तसेच 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षांतील अल्पमुदतीच्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील. ज्या शेतकऱ्यांनी 2023-24 किंवा 2024-25 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे पीक कर्ज पूर्णपणे फेडले आहे, त्यांना प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 मधील लाभार्थ्यांसाठीही या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जाचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत हप्ते 50 हजार रुपयांपर्यंत असल्यास संपूर्ण कर्जमुक्ती, तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेचा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोणाला मिळणार लाभ ? : राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे.

कोण अपात्र ? : विद्यमान व माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान व माजी सदस्य, केंद्र व राज्य शासनातील 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी-कर्मचारी, शेतीव्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक वगळून) तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी या योजनेसाठी अपात्र असतील.

पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया : या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

*******

जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र वाढीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली जिल्ह्यास 7.98 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 'एक पेड माँ के नाम' अभियानालाही गती देण्याचे निर्देश


हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात वनाच्छादित व वृक्षाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार तसेच विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने 300 कोटी वृक्षारोपण मोहिम तसेच इतर हरित उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी 'हरित महाराष्ट्र आयोग' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सन 2026 ते 2047 या कालावधीत राज्यातील हरित आच्छादन वाढविण्याचा शासनाचा निर्धार असून, त्याअनुषंगाने आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ तसेच विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

ही मोहीम परिणामाधारित अंमलबजावणी आराखड्यानुसार राबविण्यात येणार असून, लागवड केलेल्या वृक्षांच्या दहा वर्षांच्या जतन व संवर्धनाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्व व वाढ सुनिश्चित होण्यास मदत होणार असून, राज्यातील हरित आच्छादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि पर्यावरणीय मूल्य वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

हिंगोली जिल्ह्यास 7 लाख 98 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्व विभागांनी आपापल्या वाट्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून वृक्षलागवडीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजार 815 हेक्टर पोटखराब जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात यावे.

सध्या विविध यंत्रणांकडे सुमारे 11 लाख रोपे उपलब्ध असून, त्यापैकी जास्तीत जास्त रोपे प्राधान्याने ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागास आवश्यकतेनुसार रोपांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर सोपविण्याचे नियोजन करावे. तसेच 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गतही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून जनसहभाग वाढविण्यात यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.


*******

मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा; जबाबदारीत कसूर केल्यास होणार कार्यवाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 




हिंगोली (जिमाका), दि. 1 : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. या मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी दिले. 

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज (दि. 1) जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चोंडेकर, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, श्रीमती प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व बीएलओंना या मोहिमेसंदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदार पडताळणीचे काम अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन अर्जांचे वितरण, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारणे, 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबरदरम्यान हरकतींवरील सुनावणी घेणे आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. या महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिला.

******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 26 मिमी पाऊस

 

• जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी

 


  हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 41.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 4.3 मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 32.4 (205.8), कळमनुरी 29 (145.9), वसमत 28 (118.3), औंढा नागनाथ 41.7 (136) आणि सेनगाव तालुक्यात 4.3 (104.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 01 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 143.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 18.1 अशी आहे. हिंगोली तालुक्यातील नरसी (77.8 मिमी) व वसमत तालुक्यातील आंबा (65 मिमी)या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  

*****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि.01: हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर, सी.आर.गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 *****