·
युवक, महिला, बचत गट व
उद्योजकांसाठी हरित उद्योग उभारणीची सुवर्णसंधी
हिंगोली (जिमाका), दि. 14 : राज्यात वाढते शहरीकरण, पर्यावरण संवर्धनाची
गरज आणि हरित उद्योगांना मिळणारे प्रोत्साहन लक्षात घेता कचरा व्यवस्थापन
क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र
संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कुशाग्रा इनोव्हेशन्स फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृत-सक्षम' हा
विशेष उद्योजकता विकास उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत इच्छुक
युवक-युवती, महिला, महिला बचत गट, उद्योजक व व्यावसायिकांना योग्य व्यवसायाची
निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय अनुदान योजनांची माहिती, उद्योग
उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन तसेच उत्पादनांच्या
विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले
जाणार आहे.
कचरा व्यवस्थापन हे केवळ
स्वच्छतेपुरते मर्यादित नसून त्यामध्ये रिसायकलिंग, रिसोर्स रिकव्हरी
सेंटर (RRR), प्लास्टिक, कागद व काच पुनर्वापर, सेंद्रिय कचऱ्यापासून सेंद्रिय खत
निर्मिती, अगरबत्ती व धूपनिर्मिती यांसारख्या विविध शाश्वत
उद्योगांच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रातून स्वावलंबनाबरोबरच पर्यावरण
संरक्षणालाही मोठी चालना मिळणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना
प्रशिक्षणानंतर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहाय्य,
नेटवर्किंग तसेच बाजारपेठेशी जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे
हरित उद्योग क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त
ठरणार आहे.
'अमृत-सक्षम' उपक्रमामध्ये युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक संस्था तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या नागरिकांनी सहभागी होऊन ऑनलाइन नोंदणी करावी आणि हरित उद्योग क्रांतीचा भाग बनावे, अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली (मो. 7391065471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
******

No comments:
Post a Comment